विकल्प संगम: आशांचे संगम (in Marathi)

By अनुराधा अर्जुनवाडकर on May 4, 2016

ऊर्जा, शेती, पाणी अशा विविध क्षेत्रांत पर्यायी काम करणाऱ्या गटांना प्रथम विभागीय स्तरावर आणि पुढे जाऊन राष्ट्रीय स्तरावर एकत्र आणण्याचे विकल्प संगमचे उद्दिष्ट आहे.

"सकाळी चहा-कॉफी ऐवजी प्यायला काय दिले असेल त्यांनी आम्हा सर्वांना? गरमागरम नाचणीचे सत्व!!" विकल्प संगम कार्यक्रमाहून नुकतेच परतलेले माझे तरूण सहकारी उत्साहाने सांगत होते. आपापल्या क्षेत्रात वेगळ्या वाटेने जाऊन साऱ्यांसाठी काही मिळवू पाहणारे जवळ जवळ शंभर जण अशा कार्यक्रमांसाठी, दोन-चार दिवसांपुरते एका ठिकाणी रहायला येतात, आणि आपले अनुभव कथन करून पुढे एकत्रितपणे काय करता येईल, या बाबत चर्चा करतात, योजना आखतात.

विकल्प म्हणजे पर्याय. विविध क्षेत्रांत पर्यायी विचाराने कार्य करणाऱ्या गटांना आधी विभागीय स्तरावर, व नंतर पुढील टप्प्यात राष्ट्रीय स्तरावर, एकत्र आणण्याचे मूळ उद्दिष्ट संगम आयोजित करण्यामागे आहे. निसर्ग व नैसार्गिक संसाधनांचे संवर्धन, उपजीविका, शिक्षण, कला, आरोग्य, माध्यमे, समाज व न्याय व्यवस्था, अशा विविध क्षेत्रांतील गटांना एकत्रितपणे आपल्या अनुभवांची व साहित्याची मोकळेपणाने देवघेव करत परस्परांकडून शिकण्याची उत्तम संधी देणारा विकल्प संगम हा एक मंच आहे. आपल्या सांस्कृतिक विविधतेचा उत्सव साजरा करत सशक्त व उज्ज्वल भविष्याची आशा धरून सारेजण कार्यरत होतात.

तेलंगणातील 'टिंबक्टू कलेक्टिव' येथे पार पडलेले विकल्प संगम संमेलन.  फोटो - अशीष कोठारी

सामान्य लोकांच्या गटांनी स्वबळावर काय काय साध्य केले आहे, याविषयी अनेक गोष्टी मला सहकाऱ्यांकडून ऐकायला मिळाल्या. तेलंगणातील मेडक जिल्ह्यातील पास्तापूर येथील अल्पभूधारक दलित शेतकरी नाचणी, ज्वारी इत्यादी पौष्टिक व कमी पाणी लागणारी पिके घेऊ लागले. आणि ते सेन्द्रीय धान्य आपल्या परिसरात वितरीत करण्यासाठी त्यांनी प्रती-रेशन-व्यवस्था उभी केली आहे! कच्छ मधील काही शेतकऱ्यांनी इंग्रज-पूर्व परंपरेतील 'काला कपास'ला पुनर्जीवन दिले आहे. तिच्या कमी लांबीच्या तंतूंपासून काढलेले सूत स्थानीय हातमागांवर पुन्हा विणले जाऊ लागले आहे. कमी पाण्यावर सुद्धा चांगले उत्पन्न देणाऱ्या, कीटक-नाशके न लागणाऱ्या या सेंद्रिय कापाशीसाठी या शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळू लागला आहे! रासायनिक शेतीपद्धतीमधील वाढत्या उत्पादन खर्चाने पोळलेल्या विदर्भातील रावसाहेब दगडकरांना मासानोबू फुकुओका यांच्या 'एका काडातून क्रांती' या पुस्तकाने दिशा मिळाली आणि त्यांनी एकाच वर्षी आपली ११० एकर शेत जमीन नैसर्गिक शेतीखाली आणली (मराठीत वाचा)                              .

सरकार-पुरस्कृत रासायनिक शेती पद्धतीमुळे शेताचे होणारे नुकसान व शेतकर्याचे होणारे अतोनात हाल टाळण्याचे असे मार्ग ठिकठिकाणी अवलंबिले गेले तर!

आपले अन्न, आपली वस्त्रे, आपले नोकरी-व्यवसाय, मुलांचे शिक्षण, रहदारी, नगर-रचना - सर्वच बाबी तपासून बघण्यासारख्या आहेत. आपण जे खातो, वापरतो, मिळवो, बांधतो, त्याने स्वत:वर, इतरांवर, आणि भोवतालच्या हवा, पाणी व जमिनीवर कोणते परिणाम होतात? दुष्परिणाम कसे टाळत येतील? सारीच उत्तरे सोपी नाहीत, पण पर्याय शोधणारे अनेकजण आहेत, त्यांच्याकडून काय शिकता येते, हे पहायला हवे. अशा विचाराने देशात आतापर्यंत चार संगम पार पडले आहेत - तेलंगणातील अनंतपूर जिल्ह्यात, तमिळनाडुतील मदुराईजवळ, जम्मू-काश्मीर राज्यातील लदाखमध्ये, महाराष्ट्रातील वर्धा येथे व बिहारमध्ये बोध गयेत. (अधिक माहिती http://vikalpsangam.org/events/ वर पहावी.) पुढील काही संगमांचे नियोजन सुरु आहे.

विकल्प संगम उपक्रमाला दिशा देण्यासाठी देश-भरातील संस्था-संघटना-व्यक्तींनी स्वत:चा एक अनौपचारिक गट केला आहे. ही मंडळी वर्षाकाठी एकदा भेटून गेल्या वर्षातील कार्याचा आढावा घेऊन पुढील वाटचालीसाठी दिशा निश्चित करतात. अलिकडे पार पडलेला बोध गया तेथील संगम 'वीज - ऊर्जा' या विषयाला वाहिलेला होता. पर्यायांवर काम करणाऱ्या काही युवकांनी ठरवले की आपण आपल्या परीने विचार करून पुढील वाटचालीची दिशा ठरवली पाहिजे. लवकरच ते युवकांसाठीच असा एक संगम वर्ध्याला घडवतील. त्यानंतर गुजरात मध्ये भूज येथे एक संगम आयोजित केला जाईल. अन्न या विषयावरही यंदा एक संगम आयोजित केला जात आहे.

अशा प्रत्यक्ष संगमांखेरीज या उपक्रमांतर्गत एक वेबसाईट सुद्धा चालवली जाते (http://vikalpsangam.org). देशभरातील अशा पर्यायी उपक्रमांवरच्या गोष्टींबरोबरच अशा प्रकारचे वेगळ्या दृष्टीकोणातून केलेले विचार किंवा योजना, समारंभ-मेळावे, उपयुक्त पर्यायी उत्पादने (नैसर्गिक रंग, सेन्द्रीय पद्धतीने पिकवलेले धान्य, भाजीपाला) व सेवा मिळवण्यासाठी पत्ते, दृक-श्राव्य प्रस्तुती, पुस्तके, लेख, नियतकालिके, वगैरेंविषयी माहिती यावर मांडलेली आहे. आवश्यकतेनुसार योग्य त्या पानावर नेण्यासाठी इंग्रजी, हिंदी व तमिळ भाषांतून मार्गदर्शन मिळू शकते. वेबसाइटवरचा देशाचा नकाशा पाहून त्याच्या वेगवेगळ्या भागांतील खुणांद्वारे  त्या त्या भागातील निवडक गोष्टीं आपण वाचू शकतो. हे लेखन बहुतांशी इंग्रजीतून केले गेले असले, तरी अनेक गोष्टी मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगु, मल्याळमतमिळ भाषांतून लिहिलेल्या आहेत. सिक्कीम येथील आदिवासींची 'लेपचा' व मध्य भारतातील पाच राज्यांतील अनेक आदिवासी लोकांची 'हलबी' भाषासुद्धा वेबसाइटवर आहे - दोन गोष्टी या भाषांत अनुवादित केल्या गेल्या आहेत.

कोणत्या प्रकारच्या उपक्रमांना 'पर्यायी' म्हणावे, याबद्दल 'About' (किंवा 'परिचय') या पानावर विचार मांडले आहेत. यामागील तत्वज्ञान त्याच पानावरून 'पर्यायांच्या संदर्भात विचारांची चौकट (Alternatives Framework note)' या पानावर जाऊन वाचता येते. आपण सुद्धा अशा प्रकारच्या पर्यायी उपक्रमांबद्दल लेख /गोष्टी लिहून वेबसाइटसाठी पाठवू शकता - त्यासाठी ADD हे पान बघावे. वेबसाइटवरील मजकुराबद्दल दर महिन्याला इंटरनेटवरून विकल्प संगम न्यूजलेटर पाठवले जाते. वेबसाईटवर याबद्दल माहिती मिळेल. सध्या कल्पवृक्ष संस्थेतून वेबसाइट चालवली जाते. या शिवाय पर्यावरण-पूरक, समन्यायी इत्यादी प्रकारच्या पर्यायांवर काम करणाऱ्यांना एकमेकांशी इंटरनेट वरून चर्चा करण्यासाठी एक ई-ग्रुप सुद्धा उपलब्ध आहे (विकल्प संगम ई-ग्रुप : यात सहभागी होण्यासाठी लेखिकेला ई-मेल पाठवावी - anurivelihoods@gmail.com).

मिळून साऱ्याजणी द्वारा प्रथम प्रकाशन

लेखिकेशी संपर्क

मराठीत लिहिलेल्या गोष्टींची यादी याच पानावर पहावी)Story Tags: Traditional Knowledge, farming practices, alternative designs, collective power, commons, alternative approach, ecological sustainability, economic security, grassroots urban goverance, rural economy, urban issues, tribal, tribal education

Comments

There are no comments yet on this Story.

Add New Comment

Fields marked as * are mandatory.
required (not published)
optional
Stories by Location
Google Map
Events