कारपेक्षा बसचा वापर केला तर प्रदूषण १५ पट कमी (in Marathi)

By Sharmila DeoonJan. 19, 2022in Energy

साधारणपणे ३० कारमधून जितके प्रवासी जातात ते एका बसमध्ये सामावू शकतात. सर्वात घातक प्रदूषक म्हणजे पार्टिक्युलेट मॅटर, ज्याचे एका बसमुळे होणारे उत्सर्जन ४.० gm/km आहे. ३० कारमुळे होणारे ६३ gm आहे. एक कार २.१ gm/km पी एम उत्सर्जन करते. कारपेक्षा बसचा वापर केला तर १५ पट प्रदूषण कमी होईल. पण खात्रीशीर बस सेवा नाही ही लोकांची तक्रार आहे.
महाराष्ट्र सरकारने पंधराव्या वित्त आयोगाच्या अहवालातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठीच्या एकूण तरतुदीपैकी ८० टक्के निधी ई-बससेवेसाठी वापरण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, हे स्वागतार्ह आहे. तरीही नागरिकांनी अधिक चांगल्या बस सेवेची मागणी लावून धरली पाहिजे. बस संख्या वाढली पाहिजे, बस आरामशीर पाहिजेत, वारंवारिता, मार्ग विस्तार, वक्तशीरपणा यांतही सुधारणा व्हायला पाहिजे.

वाहनांची रहदारी आणि हवा प्रदूषण यांचा थेट संबंध आहे. जितकी वाहने जास्त, तितके उत्सर्जन जास्त, पुण्यातील एकूण प्रदूषणाच्या ४५ टक्के प्रदूषण हे वाहनांनी सोडलेल्या धुरांमुळे होते ही माहिती आय आय टी एम ने २०२१ च्या एमिशन इन्व्हेंटरी मध्ये नमूद केली आहे. पुणेकरांचे स्वतःच्या दुचाकी/चार-चाकीवरचे प्रेम सर्वपरिचित आहे. त्यामुळे ३४ लाख लोकसंख्येच्या या शहरातली नोंदणीकृत वाहनांची संख्या ३१ लाख एवढी आहे!

खाजगी वाहने वापरू नका म्हटले तर खात्रीशीर बससेवा नाही ही लोकांची तक्रार असते. पायी वा सायकलने जायचे तर रस्ते सोईचे पाहिजेत, बस / मेट्रो व्यवस्था सुरळीत हवी, हेही तितकेच खरे आहे. तसे झाले तरी पुणेकर त्यांचा वापर करतील का, हा प्रश्न आहेच. प्रत्येक शहराचे व्यक्तिमत्व असते, दुचाकीचे शहर ही पुण्याची ओळख बनली. लोकांनाही आपल्या स्कूटर, बाईकवर टांग मारून जायची सवय लागली. ही मानसिकता आता बदलायला हवी आहे. प्रदूषणाची समस्या ही वाहनसंख्या वाढल्यामुळेच उद्भवलेली आहे. प्रदूषणाची सर्वाधिक झळ वयस्कर माणसांना, लहान मुलांना, गरोदर स्त्रिया आणि त्यांच्य गर्भाला बसते. शिवाय मधुमेह, हृदयविकार, अल्झायमर्स, डिप्रेशन या व अशा, प्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या आजारांचा त्रास सर्व वयातल्या नागरिकांना होऊ शकतो. पार्किंगसाठी मर्यादित जागा, पर्यावरणकरांत वाढ, इत्यादी, सार्वजनिक वाहतूक सक्षम, सोयीस्कर करण्यासाठी आणि लोकांना स्वत:चे वाहन नेण्याऐवजी सार्वजनिक सेवेचा वापर करावा वाटेल इतकी ती आकर्षक, सोयीस्कर आणि सक्षम झाली पाहिजे.

प्रथम प्रकाशन दैनिक लोकमत, १९ जानेवारी २०२२

Story Tags: , , , ,

Leave a Reply

Loading...