रावसाहेब दगडकर : सहज सुलभ नैसर्गिक शेती (in Marathi)

By Shubhada PandhareonMar. 23, 2014in Food and Water

विदर्भातील श्री रावसाहेब दगडकर १९९० सालापासून नैसर्गिक शेती करत आहेत. रासायनिक शेतीपद्धतीमधील वाढत्या उत्पादन खर्चाने पोळलेल्या त्यांना मासानोबू फुकुओका यांच्या ‘एका काडातून क्रांती’ या पुस्तकाने दिशा दिली आणि त्यांनी एकाच वर्षी त्यांची ११० एकर शेती नैसर्गिक शेतीखाली आणली. केवळ ३-४ व्यक्तींच्या साह्याने ते ही शेती करतात. निसर्गात कमीत कमी ढवळाढवळ हे तत्व ते अवलंबतात. त्यांची जमीन व वातावरण अतिशय समृद्द असून प्रत्येक पिकाची उत्पादकता चांगली आहे. तर जाणून घेऊया त्यांच्या भाषेतील या “सहज शेती” विषयी.

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्‍यातील उसळगव्हाण हे एक लहानसे खेडे. ७३ वर्षांचे रावसाहेब दगडकर सुमारे ४०-४५ वर्षापासून या गावात शेती करत आहेत.

श्री दगडकर हे शास्त्र शाखेचे पदवीधर. त्यांनी शिक्षणानंतर लगेचच शेतीमध्ये लक्ष घातले. त्यांनी शेती करायला सुरवात केली तो नेमका रासायनिक शेतीपद्धती प्रचलित होण्याचा काळ होता. त्यांच्याकडे वडिलोपार्जित ११० एकर शेती आहे. त्यामध्ये ते रासायनिक खते, कीटकनाशके वापरून पारंपारिक पिके घेत होते. सुरवातीची काही वर्षे त्यांना रासायनिक शेतीपद्धतीमध्ये चांगले उत्पादन मिळत होते. या शेतीपदतीमध्ये सुरवातीला एकरी १-२ बॅग रासायनिक खत वापरून व कीटकनाशकाची एखादी फवारणी करून चांगले उत्पादन मिळायचे. परंतु, वर्षागणिक रासायनिक खताची व फवारणीची मात्रा वाढत गेली व उत्पादन मात्र तेवढेच राहिले किंबहुना कमी होत गेले. याबरोबरच जमिनीचा कस कमी होत असल्याचेही जाणवत होते. प्रचंड उत्पादन खर्चामुळे घाट्याची शेती व्हायला ल्रागल्री. यातून मार्ग कसा काढायचा यासाठी त्यांचे वाचन, चिंतन, मनन सुरु होते.

त्याच सुमारास जपानमधील नैसर्गिक शेतीतज्ञ मासानोबू फुकुओका यांचे “One Straw Revolution / एका काडातून क्रांती” हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले. या पुस्तकामुळे ते प्रभावित झाले व रासायनिक शेतीपद्धती सोडून नैसर्गिक शेती करण्याचे त्यांनी ठरवले.

त्यांचा हा निर्णय प्रवाहाविरुध जाणारा होता. १९९० सात्री एकाच वर्षी त्यांनी संपूर्ण ११० एकर शेतीमधून रासायनिक खते व कीटकनाशके हद्दपार केली व निसर्गामध्ये कमीत कमी लुडबुड करण्याचे ठरवले. आपल्याजवळ असणारे फवारणीचे पंप इ. रासायनिक शेती पद्धतीमध्ये वापरात येणारी यंत्रसामग्री नातेवाईकांना तशीच देऊन टाकली.

नैसर्गिक शेतीपद्दतीची सुरवातीची काही वर्ष उत्पादन अल्प होते. परंतु खते, कीटकनाशके व मजूरीच्या खर्चात बचत झाल्याने उत्पादन खर्च कमी झाला व कोणताही तोटा झाला नाही. वर्षागणिक जमीन, वातावरण समृद्ध होत गेले व ५-६ वर्षातच कमी उत्पादन खर्चात रासायनिक शेतीपद्धतीइतके उत्पन्न मिळू लागले.

श्री दगडकर सांगतात, “सद्यस्थितीत आम्ही रासायनिक खते वापरणाऱ्यांपेक्षा पुढे आहोत. सोयाबीन एकरी ७-१० क्विंटल, गहू एकरी १०-१५ क्विंटल, कापूस १०-१५ क्विंटल अशा सगळ्याच पिकात विशेष काही न करता चांगला उतारा मिळतो.”

शेती

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्‍यातील उसळगव्हाण येथे त्यांची वडिलोपार्जित ११० एकर शेती आहे. शेती २ तुकड्यात विभागलेली आहे. पैकी २० एकराचा एक तुकडा गावापासून काही अंतरावर आहे तर उर्वरित ९० एकर गावाजवळ आहे. शेतीमध्ये थोडक्या क्षेत्रासाठी बारमाही पाण्याची सोय आहे. तिथे २ हेक्‍टरवर आंबा तसेच उन्हाळी भुईमुग, तीळ अशी पिके घेतली जातात. उर्वरित क्षेत्रात खरीप व रबी पीक घेतले जाते.

त्यांच्याकडे जमिनीला काही उतार आहे. त्यासाठी त्यांनी शासकीय योजनेअंतर्गत आडवे बांध घालून घेतले आहेत. शेतीमध्ये त्यांनी उतार पाहून प्लॉट पाडले आहेत. त्याला बांधबंदिस्ती आहे. त्यामुळे मृदा व जलसंधारण होते. पण ते याहीपुढे जाऊन म्हणतात, “आम्ही तणाची शेती करतो, त्यामुळे तण मातीला जाऊच देत नाही व जमिनीची धूप होत नाही.” ‘तण वाढवा व पाणी जिरवा” हा त्यांचा मंत्र आहे. ते सांगतात की, तणांमुळे वाहत्या पाण्याचा वेग मांदावतो, ते जागीच मुरण्याचे प्रमाण वाढते. गाळ वाहून जात नाही व जरी ज्यादा पाणी शेताबाहेर पडायचे असल्यास ते नितळ व स्वच्छ बाहेर पडते.

हवामान

त्यांचेकडे उन्हाळ्यात कमाल तापमान ४५ डिग्रीच्या सुमारास तर किमान १६-१७ डिग्रीच्या सुमारास असते. हिवाळ्यात कमाल तापमान २५-३० डिग्री तर पावसाळ्यात कमाल तापमान ३० डिग्रीपर्यंत असते.

त्यांचेकडे सुमारे ४० इंचापर्यंत पाऊस पडतो.

माती

त्यांच्या शेतातील माती पूर्णपणे काळी नाही. काही मुरूममिश्रित आहे. जमिंनीतून पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो. त्यांचेकडील मातीची खोली जास्त नाही, शिवाय ती जागोजागी वेगवेगळी आहे. तरीही जास्तीत जास्त ३ फूट खोली आहे. बाकी मुरूम आहे.

बांध-बंदिस्ती

शेतामध्ये बांध आहेत व बांधावर भरपूर झाडे आहेत. बहुतांश सर्व झाडे अपोआप आलेली आहेत. त्यांच्या मते झाडे मुद्दामहून लावायची गरज नाही. पक्ष्यांमुळे किंवा इतर कारणाने बी पडून रोप उगवते, आपोआप उगवलेली झाडे फक्त तोडली नाहीत, धुरे जाळले नाहीत की त्याची चांगली वाढ होते. कडूनिंब, बांबू, हिवर, कासर अशी झाडे त्यांच्याकडे दिसून येतात.

खते

त्यांच्याकडे काही म्हशी, गायी व शेळ्या आहेत. त्यांच्यापासून मिळणारे शेणखत पावसाळ्याच्या आधी जमिनीत आवश्यकतेनुसार टाकले जाते.

परंतु त्यांच्या वापरातील मुख्य खत म्हणजे तण व पीकांचे अवशेष. पूवी ते तण बैलजोडीला मागे आडवी फळी लाऊन झोपवायचे, आता ते त्यासाठी रोटाव्हेटरचा वापर करतात. रोटाव्हेटरच्या वापरामुळे हे काम सोपे झाले आहे असे ते सांगतात.

नैसर्गिक शेतीच्या सुरवातीची काही वर्षे

१९९० साली त्यांनी संपूर्ण ११० एकर शेती क्षेत्रातील रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर पूर्णपणे बंद केला. त्यांनी कोणतेही तण काढले नाही. तणाबाबत त्यांनी फुकुओकांचे तत्त्व कटाक्षाने पाळले, “तण कितीही असो, कोणतेही असो ते केवळ मुख्य पिकाच्या वर जाणार नाही याची काळजी घ्यायची व ते तण जास्तीत जास्त जमिनीत टाकायचे.” यामुळे कोणत्याही पीकाला कसलाही धोका होत नाही असे ते म्हणतात.

ते सांगतात, “लोकांचा असा समज आहे की तण जजमनीचा कस खाते. परंतु जमिनीवर उगवणारी प्रत्येक वनस्पती जमिनीतून केवळ ३-५% अन्नांश घेते व उर्वरित ९५-९७% गरज बाह्य वातावरणातून भागवल्या जातात. शिवाय कोणत्याही वनस्पतीचे अवशेष जेव्हा आपण जमिनीवर टाकतो, म्हणजे जिथे वनस्पती वाढली तिथेच ती गेली, तिची अशा पदतीने पुनर्प्रक्रिया (recycling) झाली तर जमिनीचा कस कमी होण्याचे काहीच कारण नाही.”

आच्छादन

ते सांगतात, “आम्ही तण बाहेर न फेकता तिथल्या तिथे टाकल्याने आम्हाला बाहेरून कोणत्याही निविष्ठा आणून टाकण्याची गरज पडत नाही. आमची जमीन सदैव हिरव्या किंवा वाळलेल्या गवताने आच्छादित असते. जमिनीत सूक्ष्मजीव मोठ्या प्रमाणावर असून त्यांचे खाद्य असणारा सेंद्रीय कर्ब आमच्या जमिनीत मुबलक प्रमाणात आहे. सेंद्रीय कर्ब काही दिवसात कमी होतो, त्याचे प्रमाण एका टप्प्यापुढे जास्त वाढविता येत नाही. परंतु जमिनीवर सतत आच्छादन करत राहिले, पीक व तणांचे अवशेष टाकत राहिले तर सेंद्रीय कर्ब कमी पडत नाही. यामुळे जीवाणू सक्रीय राहतात, त्यांची संख्या वाढते व परिणामी जमिनीची सुपीकता वाढते तसेच जमीन सदैव भुसभुशीत राहते.”

यासोबत तणांच्या आच्छादनाबाबत ते सांगतात, “सध्याच्या प्रचलित तण व काडीकचरा विरहित स्वच्छ शेतीमध्ये जमिनीमध्ये सूक्ष्म मुल्यद्रव्यांची कमतरता निर्माण होते. प्रत्यक्षात तणे जमिनीला जास्तीत जास्त सूक्ष्म मूलद्रव्ये देतात, त्यामुळे त्यांच्या शेतात त्यांना सूक्ष्म मुल्यद्रव्यांची कमतरता जाणवत नाही.”1

तण नियंत्रण

तणांबात ते सांगतात, “प्रत्येक ऋतूत निरनिराळी तणे दिसून येतात, ऋतू संपला की ते तणही संपते. तसेच काळानुरूप तणांचे प्रकार बदलतात, जसे की पूर्वी गाजरगवत मोठ्या प्रमाणावर होते, आता ‘चुमुकाटा’ या तणाने त्याला मागे टाकते आहे. कोणत्या तणाची किती उंची होऊ शकते याचा अभ्यास केला पाहिजे. अशा वेळी आपले पीक जर तणापेक्षा उंच असेल तर काळजी व घाई करण्याची गरज नाही, त्यामुळे पिकाचे कोणतेही नुकसान होत नाही. तण तिथेच दाबल्यास तिथेच अवशेष राहतील व आच्छादन होईल. याउलट इतर शेतकरी तण काढून धुऱ्यावर टाकतात, त्यामुळे कस बाहेर जातो.”

त्यांच्या शेतात खुरपणी, निंदण हा प्रकार विशेष नाही. केवळ कमी उंचीच्या पिकात तण मुख्य पिकाच्या वर जाणार नाही एवढेच त्याला कापून त्याचे आच्छादन केले जाते.

झाडे

त्यांच्याकडे साधारण १/३ शेतजमिनीवर झाडे आहेत. आंबट चिंच, विलायती चिंच, बाभूळ अशा त्या भागातील झाडांच्या स्थानिक जाती धुऱ्या-बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात आहेत.

झाडांमुळे त्यांना बराच फायदा झाला आहे. ते सांगतात, “झाडांमुळे पक्ष्यांचे प्रमाण वाढते. पक्ष्यांमार्फत कीड नियंत्रण होत असल्याने कोणत्याही फवाऱ्याची गरज भासत नाही. तसेच झाडांमुळे वारा अडविला जातो परिणामी जमिनीतील व वातावरणातील आर्द्रता टिकून राहते.”

गांडुळे

त्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणावर गांडुळे दिसून येतात. त्यांच्या वाढीसाठी त्यांनी विशेष कोणतेही प्रयत्न केले नाहीत. परंतु जमिनीत मोठ्या प्रमाणावर सेंद्रीय कर्ब उपलब्ध असल्याने नैसर्गिकरीत्या त्यांचे संवर्धन होते आहे.2 गांडूळांचे त्यांना अनेक फायदे जाणवतात. त्यांच्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते व जमीन सच्छिद्र होते असे ते सांगतात.

त्यांच्या शेतात ट्रॅक्टरने पेरणी केली जाते तसेच गहू काढणीसाठी हार्वेस्टर वापरला जातो – अशा अवजड यंत्रामुळे जमीन दबली जाऊन मातीची घनता वाढणे, गांडूळासारख्या सूक्ष्मजीवांचे प्रमाण कमी होणे अशा बाबी होऊ शकतात अशी शंका येणे स्वाभाविक आहे. याबाबतीत ते सांगतात, “ते जमिनीमध्ये ट्रॅक्टरचा वापर उन्हाळ्यात जमीन कोरडी असताना तसेच हार्वेस्टरचा वापरही पीक पूर्ण सुकून गेल्या जमीन कोरडी असताना करतात. अशा वेळी गांडूळासारखे जीव जमिनीच्या खालच्या स्तरात गेलेले असतात. शिवाय जमीन कोरडी असल्याने तिच्यावरून अवजड यंत्रसामग्री फिरली तरी तिची घनता विशेष वाढत नाही.”

वाळवी

त्यांच्या शेतात वाळवी मोठ्या प्रमाणावर दिसून येते. त्यांच्या मते जमिनीवरील कोरड्या आच्छादनाचे बारीक करण्याचे काम वाळवीमुळे चांगल्या प्रकारे होते.

संजीवकांचा वापर नाही

त्यांनी शेण-गोमुत्र-गुळ याचे किंवा अन्य प्रकारचे सांजीवक कधीही वापरत्रे नाही. ते सांगतात, “आमची फुकुओकांची पदत आहे. यात बाहेरून काहीही आणून टाकायचे नाही. निसर्गातच ‘विपुलाची सृष्टी’ असताना बाहेरून काही टाकण्याची गरज नाही. ज्याला वेळ आहे, ज्यांच्याकडे मनुष्यबळ आहे त्याने जीवामृत इ. चा वापर करावा. आम्हाला वेळही नाही व आम्ही त्याकडे लक्ष देत नाही. शिवाय यासारख्या गोष्टी करायच्या तर मनुष्यबळ हवे, म्हणजे मजुरीच्या खर्चात वाढ होते.”

मशागत

निसर्गात कमीतकमी ढवळाढवळ हे फुकुओकांचे तत्त्व ते वापरत असले तरी त्यांनी मशागतीला पूर्णपणे फाटा दिलेला नाही. शिवाय ११० एकर एवढे मोठे शेतीक्षेत्र असल्याने व त्यांच्या भागात मजुरांची कमतरता असल्याने ते ४५ एच पी चा ट्रॅक्‍टर वापरतात.

ते जास्त खोल नांगरट करत नाहीत. मशागतीसाठी ते २ पावरीचा जास्त खोल जाणारा नांगर कधीही वापरत नाहीत, ते केवळ ३ पावरीचा नांगर वापरतात.

ट्रॅक्टरचा वापर केवळ जमीन कोरडी असताना केला जातो. तसेच पाऊस पडण्यापूर्वीच ट्रॅक्टरदवारे पेरणी केली जाते.

त्यांचेकडे एक बैलजोडी आहे. पावसाळ्यात किवा अन्य वेळी जमिनीत ओलावा असताना काही काम करावायचे झाल्यास बैलजोडीचा वापर केला जातो.

पाणी व्यवस्थापन

शेतीच्या वापरासाठीचे पाणी कमी क्षार असलेले (soft) व चवीला चांगले आहे. त्यांच्या भागात कॅनाल असल्याने शेतातील भूजलपातळी २५ फुटांवर आहे.

साधारण ४० इंचापर्यंत पाऊसमान आहे व शेतातील जमीन सच्छिद्र असल्याने पडणारा जास्तीत जास्त पाऊस जमिनीत मुरतो. याबाबत त्यांचे निरीक्षण असे की, “पावसाच्या काळात आमच्या शेजारच्या शेतीतून गठूळ पाण्याचे पाटच्या पाट वाहत असतात. वाहणारे पाणी आपल्या जमिनीचा कस, सुपीक माती घेऊन जात आहे याची या शेतकऱ्यात्रा जाणीवही नसते. याउलट आमच्या शेतातून सहसा पाणी बाहेर वाहून जात नाही व जरी गेले तरी ते स्वच्छ, नितळ पाणी असते.”

त्यांच्याकडे विहिरीतून सिंचन केले जाते. व प्रामुख्याने तुषार सिंचन व अल्प प्रमाणात पाटाने पाणी दिले जाते. त्यांनी ठिबक सिंचन काही काळ वापरल्रे परंतु ठिबक पाईप स्वच्छतेसाठी असिडचा वापर करावा ल्रागणे ई. काही मर्यादांमुळे त्यांनी ठिबकचा वापर बांद केला आहे.

त्यांच्याकडे शेततळे नाही परंतु यावर्षी शेततळे करण्याचा त्यांचा विचार आहे.

सिंचनासाठी तीन एच पी ची मोटर व अडीच इंची पाईप वापरला जातो.

हिवाळ्यात गव्हाला ४ ते ५ पाणी, चन्याला 3 ते ४ पाणी दिले जाते. उन्हाळ्यामध्ये भुईमुग व तिळाला पाणी दिले जाते. तसेच आंब्याला बहार धरण्याआधी पाणी दिले जाते.

त्यांच्या मते कापसाचे पीक पाण्यासाठी संवेदनशील आहे. त्याला जास्त पाणी बाधक ठरू शकते.

पीकपद्धती

ते काही वर्षापूर्वीपर्यंत ज्वारी, मुग, उडीद अशी पारंपारिक पिके खरीपात करत असत. परंतु मागील काही वर्षात जंगलक्षेत्र कमी झाल्याने त्यांच्या भागात डुक्कर, हरीण इ. वन्य प्राण्यांमुळे पिकाचे नुकसान वाढले आहे. त्यामुळे सध्या ते खरीपात मुख्यतः सोयाबीन व तूर घेतात. रबीमध्ये गहू व चना घेतात. याशिवाय यावर्षी त्यांनी एक एकर क्षेत्रात पहिल्यांदाच मोहरीचे पीक घेतले आहे. उन्हाळ्यामध्ये भुईमुग, तीळ घेतले जाते व यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर गवारगमची लागवड केली आहे. याशिवाय काही क्षेत्राव कापूस घेतला जातो. आंबा क्षेत्र २ हेक्टरवर आहे.

सोयाबीन सुमारे ६०-७० एकरवर असतो. व त्याचा किमान ६ क्विंटल एकरी उतारा मिळतो. सोयाबीनमध्ये तुरीचे मिश्र पीक घेतले जाते. साधारण ६ एकरच्या क्षेत्रात ५ एकर सोयाबीन व १ एकर तूर असे मिश्र पीक असते व त्यामध्ये १० क्विंटल तूर निघते.

गहू ४-५ एकरावर असतो व त्याचे एकरी किमान १० क्विंटल उत्पादन मिळते.
चना ७-८ एकरावर असतो व त्याचे एकरी किमान ५ क्विंटल उत्पादन मिळते.
२ एकरावर उन्हाळी तीळ असतो व त्याचे प्रती एकरी १ क्विंटल उत्पादन मिळते.
१ एकरावरील भुईमुगाचे ६-७ क्विंटल उत्पादन मिळते.

१९९० मध्ये आंबा लागवड केत्री आहे. रतना, दशहरी, केशर, पायरी, बारमासी या जाती त्यांच्याकडे आहेत. त्यांनी कोयांची लागवड करून त्यानांतर त्यावर कलम केले आहे. आंब्याची वाढ होत असल्याने दरवर्षी उत्पादन वाढत जाते. तरीही आंब्यापासून एक लाखाचे उतपन्न मिळते. त्यांचेकडील रतना व बारमासी या दोन्ही आंब्यांना वर्षातून दोनदा बहार येतो.

ते थोडक्या क्षेत्रावर नॉन-बीटी कापूस करतात व त्याला कोणत्याही निविष्ठा देत नाहीत. त्याचे एकरी १० क्विंटल उत्पादन मिळते, परंतु मजुरीचा खर्च इ. कारणांमुळे कापूस लागवड परवडत नाही असे ते सांगतात.

बियाणे

त्यांचेकडील बहुतांश बियाणे स्थानिक आहे. त्यांचेकडे तुरीचे पिढ्यानुपिढ्या चालत आलेले बियाणे आहे. ही तूर कमी दिवसात येणारी असून चवीला अतिशय उत्कृष्ट आहे असे ते सांगतात.

अनेक वर्षांपासून ते गव्हाचे लोकवन जातीचे बियाणे वापरत आहेत.

सोयाबीनचे बाबत काही बियाणे विकत आणले जाते तर काही घरचे मागील वर्षीच्या पिकातील वापरत्रे जाते .

बियाणे निवड व साठवण

बियाणे निवड करताना बारीक बियाणे काढून टाकले जाते.

बियाणे साठविण्यासाठी ड्रमचा वापर केला जातो. कीड नियंत्रणासाठी ते कडूनिंब पाला किंवा अन्य काही वापरत नाहीत. ते सांगतात, “तुरीचे बियाणे उन्हाळ्यात पाण्यातून काढून चांगले वाळवून साठवून ठेवले तर कीड लागत नाही. तसेच गव्हामध्येही काणीसारख्या रोगाचा नायनाट करायचा असल्यास बियाणे पाण्यातून काढून पक्के वाळवावे व साठवून ठेवावे.”

पेरणी

ते पेरणीपूर्वी बीजसंस्कार करत नाहीत. तसेच त्यांच्या मते विशिष्ट नक्षत्रावर पेरणी चांगले असले तरी नक्षत्रापेक्षा मजूर महत्त्वाचा असतो व अपेक्षित नक्षत्रावर मजूर मिळत नाहीत. त्यामुळे ते पाऊस पडण्याआधीच ट्रॅक्टरने पेरणी करून घेतात.

तुरीसारख्या पीकाला सूर्यप्रकाश जास्त लागतो. कोणतेही पीक दक्षिणोत्तर पेरले तर पीकाला सूर्यप्रकाश जास्त मिळतो, त्यामुळे पेरणी करताना ती दक्षिणोत्तर करण्याचा प्रयतन असतो, परंतु ते सर्व शेतात जमत नाही असे ते सांगतात .

मिश्रपिके

ते केवळ सोयाबीन व तूर हे मिश्र पीक घेतात. ते सांगतात, “मजुरांच्या अभावी ते ट्रॅक्‍टर तसेच गहू कापणीसाठी हार्वेस्टर वापरत असल्याने त्यांना मिश्र पीक घेणे सोयीस्कर होत नाही.”

पशुधन

त्यांच्याकडे २ म्हशी, ४-५ गायी, २ बैल व १० शेळ्या आहेत. घराच्या वापरासाठी दुध व गोबर गॅससाठी शेण उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी पशुपालन केले आहे. ही सर्व जनावरे गावठी आहेत, त्यामुळे त्यांच्यापासून मिळणारे दुध व शेण हे दोन्हीही चांगले असते असे ते सांगतात. दररोज साधारण २०० किलो शेण मिळते.

चाऱ्यासाठी शेतातून जे काही निघते उदा. तुरीची गुळी इ. चा वापर केला जातो, बाहेरून काहीच विकत आणले जात नाही. या जनावरांचा आहार अतिशय कमी असतो असे ते सांगतात.

जनावरांना लसीकरण केले जाते. गावठी जनावरांना आजार विशेष नसतात, काही किरकोळ आजार झाल्यास दवाखान्यात उपचार केले जातात.

मनुष्यबळ

ते स्वतः व त्यांचा मुलगा श्री नितीन दगडकर हे संपूर्ण ११० एकर शेतीचे व्यवस्थापन बघतात, श्री दगडकर हे अर्धवेळ उपलब्ध असतात. दररोज साधारण ३ माणसे काम करतात. ट्रॅक्टरसाठी एक ड्रायव्हर आहे. केवळ सोयाबीन काढणीच्या काळात ते चंद्रपूरहून मजूर बोलावतात. या भागातील मजुरीचा दर पुरुषांसाठी २०० रु. व महिलांसाठी १०० रु. असा आहे. परंतु वेळेवर मजूर उपलब्ध होत नसल्याने त्यांनी काही प्रमाणात यांत्रिकीकरण केले आहे.

शेतीविषयक वाचन

ते नियमीतपणे “बळीराजा” व “गोडवा” या मासिकांचे वाचन करतात.

प्रयोग

कमी खर्चात काय-काय करता येईल याबाबत त्यांचे चिंतन व प्रयोग सुरु असतात.

आंबा बागेतील गवत झोपविण्यासाठी ते पूर्वी बैलजोडीला मागे आडवी फळी लाऊन त्याच्या साह्याने गवत दाबून झोपवत असत. सध्या रोटाव्हेटर असल्याने त्याची गरज भासत नाही.

तसेच पूर्वी ते वांगी घेत असत. त्यावेळी पिकलेली वांगी ते गाईना खायत्रा घालीत. पावसापूर्वी ते शेणखत शेतात टाकले जाई. एका वर्षी शेतात वांग्याची जोमदार रोपे दिसून आली, त्याच वेळी त्यांनी वाफ्यावर वांग्याची रोपे केली होती. या मुद्दामहून केलेल्या वाफ्यावरील रोपांपेक्षा शेणखतातून पडलेल्या बियांची रोपे अधिक जोमदार होती. त्यामुळे त्यांनी पुढील वर्षी पिकलेली वांगी गाईंना खायला घातत्री. त्यानंतर पडलेल्या शेणाच्या गोवऱ्या जपून वाळविल्या व रोपे करण्यासाठी त्या गोवऱ्या चुरून वाफ्यावर टाकल्या. या प्रयोगातही रोपांची वाढ जोमदार दिसून आली. त्यामुळे त्यानंतर ते वांग्याची रोपे तयार करण्यासाठी याच पद्धतीचा अवलंब करतात.

विक्रीव्यवस्था

ते आपल्या मालाची घाऊक विक्री करतात. त्यांच्या परिचयाचे श्री मोर हे त्यांचा शेतमाल विकतात.

आंब्याचा वर्ध्याला काही ठरलेला ग्राहक वर्ग आहे. उर्वरित आंबा अमरावतीला मार्केटच्या दराने विकला जातो.

जीवनशैली

कुटुंबाला लागणारे सर्व अन्न-धान्य ते शेतीतून पिकवतात. दररोजच्या भाजीपाल्याची परसबागेत लागवड केली आहे. ते मातीच्या घरात राहतात व स्वयंपाकासाठी गोबर गॅस चा वापर केला जातो.

त्यांचा मुलगा श्री नितीन दगडकर यांनी ५ वर्षापासून शेतीची धुरा सांभाळली आहे.

शेतीविचार

ते स्वानुभवाने सांगतात की निसर्गात जास्त लुडबुड केली मग ती भले मशागत किंवा अन्य स्वरुपात असो, की फायदा न होता नुकसानच होते. याबाबत ते आपला मिरची पिकाचा अनुभव सांगतात.

ते पूर्वी मिरचीचे पीक घ्यायचे. एके वर्षी मिरचीचे पीक उत्तम आले होते परंतु हिवाळ्यात आठवडाभर जोराची हवा व पाऊस आल्याने हे पीक लोळले. हवेचा झोत पूर्व-पश्‍चिम असल्याने मिरचीच्या पूर्वेकडील मुळ्या तुटल्या व ती एकावर एक पडली. एरव्ही अशा परिस्थितीत ते साधारण २ दिवसानंतर मिरचीची रोपे उभी करून तिला माती लाऊन उभी करत. यामुळे पुन्हा वारा आल्यावर ही रोपे दुसऱ्या बाजूला पडत व या प्रक्रियेत रोपे कमजोर होऊन बरीच मिरचीची झाडे वाळून जात असत. परंतु यावेळी त्यांनी सर्व गोष्टी निसर्गावर सोडून द्यायचे ठरवले. साधारण ७-८ दिवसांनी त्यांना दिसून आले की काही रोपांनी आपले शेंडे वर काढले आहेत आणि जमिनीवर पडलेल्या कांडीवर अनेक फांदया फुटल्या आहेत. त्यांची वाढ झाल्यावर मिरचीचा पूर्व-पश्‍चिम असा तास तयार झाला. यावेळी जेवढी मिरची जमिनीला टेकली तेवढीच खराब झाली, बाकी सर्व उत्तम होती. शिवाय त्यावर्षी त्यांना दरवर्षीपेक्षा सव्वा पट जास्त उत्पादन मिळाले.

श्री दगडकर आपल्या शेतीला सहज शेती म्हणतात. ते म्हणतात, “जर सहज इतके चांगले पीक येते, तर अधिक मजूर, अधिक निविष्ठा व निसर्गामध्ये अधिक ढवळाढवळ कशाला करायची?”

– शुभदा पांढरे ([email protected])

https://youtu.be/4nxdZhqzECU

पत्ता: श्री रावसाहेब दगडकर, मु. पो. उसळगव्हाण, ता. धामणगाव (रेल्वे), जि. अमरावती, महाराष्ट्र


Shri Raosaheb Dagadkar has been practicing natural farming since 1990. Before that year, he used to employ chemicals and pesticides on his 110 acre farm, but having been badly affected by the sky-rocketing expenditure this involved, he turned to natural farming under the influence of Masanobu Fukuoka’s book ‘The One Straw Revolution’. Since he converted all his farmland to natural farming, he has been able to manage the entire area with the help of only 3 or 4 people. Avoiding most interference in the natural growth, he has improved the quality of soil and gets a good yield for all his crops.

Watch a short documentary on Raosaheb Dagadkar (Marathi). It was prepared for the Kisan Magazine (Marathi language) by the Dryland Farming group.

Contact:

Shri Raosaheb Dagadkar,
At Post Usalgavhan,
Tal. Dhamangaon (Railway),
Dist. Amravati, Maharashtra

Contact the author: Shubhada Pandhare

Story Tags: , , ,

Leave a Reply

Loading...