फासेपारधी आणि तणमोर (in Marathi)

By अनुवाद – परीक्षित सूर्यवंशी (मूळ लेखिका नीमा पाठक ब्रूम, सृष्टी बाजपेयी )onSep. 02, 2019in Environment and Ecology

विकल्प संगम साठी केलेला अनुवाद

(विकल्प संगम साठी लिहिलेला मूळ लेख ‘Phasepardhi’s and the Lesser Florican)

माळरानात उभे राहून हिंमतराव कांजरा पवार वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज काढत होते. सुरुवातीला त्यांनी मादी पावसाळी लाव्याचा आवाज काढला. काही क्षणातच नर पावसाळी लावा त्यांच्याकडे धावत येतांना दिसला. “तुम्हाला किती पक्ष्यांचे आवाज काढता येतात?” या आमच्या प्रश्नावर त्यांनी फक्त स्मितहास्य केले आणि आम्हाला आमचे उत्तर मिळाले, नक्कीच अगणित! “ओह”, दूर क्षितिजावर मावळत्या सूर्याकडे शांतपणे पाहत हिंमतराव म्हणाले, “कौस्तुभ तुझी दुर्बीण काढ”. त्यांनी दाखवलेल्या  दिशेला आम्हीही नजर रोखून पाहिले पण आम्हाला काहीच दिसले नाही, सूर्यप्रकाशाने आमचे डोळे दिपले होते. “हो… हो… मला वाटतं तो आहे तिथे!” आपल्या दुर्बीणीतून पाहत कौस्तुभ म्हणाले आणि आमच्या धमन्यांत उत्साह संचारला. आम्ही महाराष्ट्रातल्या वाशीम जिल्ह्यातील कांजरा लाड तालुक्यात आलो होतो – नर तणमोराचे मनोहर प्रणयाराधन नृत्य पाहण्यासाठी. तणमोर हा पक्षी माळरानात, शेत जमिनीत आणि खुरट्या वनांत राहतो. १९९८ साली, वन विभागाला फासेपारध्यांच्या मदतीने येथे झालेल्या मादी तणमोराच्या दुर्लभ पुनर्दर्शनाबद्दल आम्ही ऐकून होतो. पुढे या पक्ष्याच्या संरक्षण-संवर्धनात संवेदना संस्थेच्या कौस्तुभ पाढरीपांडे यांच्यासह या समाजाने केलेल्या कामाबद्दल आणि त्यांच्या अमूल्य पारंपारिक ज्ञानाबद्दलही ऐकले होते. आम्ही या ठिकाणी तणमोर (Lesser florican), माळराने (grasslands) आणि फासेपारधी समाज यांच्यातील परस्परसंबंध समजून घेण्यासाठी आलो होतो.

विदर्भातील माळरानात आढळून आलेला तणमोर या संकटग्रस्त प्रजातीचा पक्षी. छायाचित्र : कौस्तुभ पाढरीपांडे

आम्ही अडाण्यासारखे आकाशात पाहत होतो, काहीच दिसत नव्हते आणि कोठे पाहावे हे सुद्धा समजत नव्हते.

“पक्षी ओळखण्याच्या तुमच्या कौशल्याचे गुपित काय आहे?” आम्ही हिंमतरावांना विचारले.

“माझ्याकडे माझी साधने आहेत.” हिंमतराव म्हणाले. “जशी तुमच्याकडे दुर्बीण आहे तसे माझ्याकडे दोन डोळे आणि दोन कान आहेत… मी कित्येक किलोमीटरपर्यंत पाहू शकतो आणि खूप दूरवरच्या पक्ष्यांचे आवाज ऐकू शकतो.”

आपल्या ६३ वर्षांच्या आयुष्यात हिंमतरावांनी खूप सारे पक्षी पाहिले होते. त्यांचा सगळ्यात आवडता पक्षी होता तणमोर, फासेपारध्यांच्या भाषेत कलचीडो. त्यांची सगळ्यात तीव्र इच्छा होती माळढोक पक्षी पाहण्याची. “१९७२ मध्ये दहा वर्षांचा असतांना मी पहिल्यांदा कलचीडो पाहिला. त्यानंतर अनेकदा पाहिला. त्यामुळे जेव्हा वन अधिकारी माझ्याकडे ‘तणमोर कोठे दिसेल’ से विचारत आले तेव्हा त्यांना तो दाखवणे माझ्यासाठी काही अवघड नव्हते.” पुढे उपहासात्मक हसत त्यांनी आम्हाला हेही सांगितले की, तो पक्षी दाखवल्याबद्दल वन विभागाने त्यांना बक्षीसाचे वचनही दिले होते, जे आजपर्यंत पाळले गेले नव्हते. वन विभागाच्या भेटीनंतर लवकरच कौस्तुभ पाढरीपांडे यांनीही या ठिकाणाला भेट दिली, यातून फुलत गेलेल्या त्यांच्या ओळखीचे रुपांतर आजच्या गाढ मैत्रीत झाले. हिंमतराव, त्यांची मुले आणि त्यांच्या संपर्कातील फासेपारधी समाजातील इतर मंडळी आता कलचीडोची शिकार करत नसल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. उलट ते आता कौस्तुभसोबत या पक्ष्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवतात.

आपल्या प्रशिक्षित गायीसोबत फासेपारधी जमातीची व्यक्ती. या गायीचा वापर शिकारीसाठी केला जातो. छायाचित्र: कौस्तुभ पाढरीपांडे

विदर्भातील तणमोरांची स्थिती जाणून घेण्यासाठी एका प्रकल्पावर काम करत असतांना नागपूरचे  छंदिष्ट पक्षीप्रेमी आणि निसर्ग संवर्धक (कन्झर्वेशनिस्ट), कौस्तुभ १९९७ साली या भागात आले. या प्रकल्पासाठी पूर्वी प्रकाशित केल्या गेलेल्या अहवालाचा अभ्यास करतांना, कौस्तुभ आणि त्यांच्या टीमला या भागात मोठ्याप्रमाणावर तणमोर आणि माळढोक असल्याच्या ब्रिटिशांच्या नोंदी आढळून आल्या. अनेक ब्रिटीश शिकाऱ्यांनी आपल्या स्वगतात (मोनोलॉग) हा पक्षी शोधण्यात मदत केल्याबद्दल फासेपारध्यांसोबत कृतज्ञताही व्यक्त केली होती. कौस्तुभ यांनी तेच करायचे ठरवले आणि अकोल्यातील मासा गावच्या हिंमतरावांना भेटले. त्यांच्यामार्फत ते या समाजातील इतर लोकांनाही भेटले. या भेटी आणि संवादांतून कौस्तुभ यांना समजले की, तणमोराची घटती संख्या ही काही फक्त पर्यावरणीय समस्या नाही, ती एक सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समस्या देखील आहे आणि या सर्व समस्या एकमेकांमध्ये खोलवर रुतलेल्या आहेत. त्यानंतर कौस्तुभ यांनी संवेदना या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली आणि फासेपारध्यांसोबत तणमोर संवर्धन आणि माळरान पुनरुज्जीवनावर काम करायला सुरुवात केली. त्याचबरोबर फासेपारधींना उपजीविकेचे पर्याय आणि आत्मसन्मानाचे जीवन मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करायचे ठरवले. या प्रश्नांवर काम करावे असे त्यांना का वाटले असेल?

माळरान – एक शोषित, दुर्लक्षीत परिसंस्था

भारतात, माळराने ही एक अतिशोषित आणि दुर्लक्षित परिसंस्था आहे. अनेकदा माळरान परीसंस्थेच्या परिसरांना पडीक जमीन समजून तिचा वापर वन विभागाकडून वृक्षलागवडीसाठी किंवा शहरीकरण आणि औद्योगिकीकरणा सारख्या माळरानास हानिकारक उपक्रमांसाठी केला जातो. नाही तर धनदांडग्यांकडून ती जमीन नांगराखाली तरी आणली जाते. चुकीच्या समजुतीतून माळरानांवर केल्या जाणाऱ्या कोरडवाहू शेतीचीही तीच दुर्दशा आहे.

या अव्यवस्थापनाची, शोषणाची, माळरानांच्या ऱ्हासाची आणि कोरडवाहू शेतीची पाळेमुळे वसाहतवादी ब्रिटीशांच्या स्वातंत्र्यपूर्वकालीन धोरणांमध्ये आढळतात. मेंचेस्टर येथील कॉटन मिल्ससाठी लागणाऱ्या कापसाच्या लागवडीसाठी पश्चिम विदर्भातील वाशीमची काळी जमीन ब्रिटिशांसाठी खूप महत्त्वाची होती. यासाठी मोठ-मोठ्या कुरणांचे रुपांतर कापसाच्या शेतांत करण्यात आले, परिणामतः कोरडवाहू शेती, गुरे आणि कुरणे यांच्या परस्परसंबंधांवर आधारित उपजीविका नष्ट झाल्या.

रासायनिक आणि एकपीक पद्धतीवर आधारित धोरणांमुळे माळरानांचा हा ऱ्हास स्वातंत्र्यानंतरही सुरूच आहे. कोणत्याही प्रकारच्या मदतीअभावी पारंपारिक पद्धतीने शेती करणे शेतकऱ्यांसाठी अशक्य झाले आहे. पारंपारिक शेतीत ज्वारी-बाजरीसारखी धान्ये, तूर-मुगासारख्या डाळी आणि तेलबियांसारख्या पिकांचे भरपूर वैविध्य होते. आर्थिक अडचणींत सापडलेल्या या शेतकऱ्यांसमोर आपली जमीन विकण्याशिवाय किंवा बीटी कापूस आणि सोयाबीनसारख्या व्यावसायिक पिकांची लागवड करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.

तणमोर – माळरानातील एक संकटग्रस्त प्रजाती

तणमोर आणि माळढोकसारख्या पक्ष्यांचा अधिवास असलेल्या माळरान आणि कोरडवाहू शेतजमिनींचा विनाश हे या पक्ष्यांची संख्या कमी होण्याचे एक प्रमुख कारण आहे. बीटी कापूस आणि सोयाबीनसारख्या पिकांवर फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांचा स्थानिक वनस्पती आणि प्राण्यांवर गंभीर दुष्परिणाम झाला आहे, ज्यात कीटक आणि धान्य खाणाऱ्या पक्ष्यांचाही समावेश आहे. फासेपारधी समजाखेरीज अन्य समूह, जे कुठलेही विधी-निषेध मानत नाहीत, बेसुमार शिकार करतात अश्यानेही या पक्ष्यांना मोठा धोका संभवतो.

फासेपारधी – एक सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या शोषित समाज

दुसरीकडे, फासेपारधी हे ऐतिहासिक काळापासून सामाजिक भेदभाव आणि बहिष्काराचे बळी ठरले आहेत. पारंपारिकरित्या भटके शिकारी जीवन जगणाऱ्या फासेपारध्यांना गुन्हेगार जमाती अधिनियम, १८७२ अंतर्गत ब्रिटिशांनी ‘गुन्हेगार जमात’ म्हणून अधिसूचित केले. स्वातंत्र्योत्तर १९५२ साली त्यांना अनधिसूचित करण्यात आले आणि त्यांच्यावरील गुन्हेगारीपणाचा ठसा पुसून टाकण्यात आला. परंतु अकोला जिल्ह्यातील वडाळा गावचे कुलदीप राठोड म्हणतात, त्याप्रमाणे “त्यामुळे लोकांचा दृष्टीकोन बदलला नाही.” त्याचबरोबर फासेपारधी मागास राहण्याची इतरही अनेक कारणे आहेत, ज्यात, १९७२च्या वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत विनापरवाना शिकारीवर आलेली बंदी; शासकीय धोरणांत भटक्या जीवनपद्धतीला उपजीविकेचे साधन म्हणून मान्यता नसणे; त्याच पारंपारिक जीवनपद्धतीमुळे संचित संपत्ती नसणे; आसपासचे जंगल आणि माळरानावर मालकी नसणे आणि प्रवेश बंदी असणे यांचा समावेश आहे. सामाजिक भेदभावाने पिचलेल्या, गुन्हेगार ठरवण्यात आलेल्या आणि त्यांना माहित असलेला जगण्याच्या एकमेव साधनावर अर्थात शिकारीवर अवलंबून असलेल्या फासेपारध्यांना आयुष्यभर वन विभाग आणि पोलिसांपासून जीव वाचवत पळण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

कुठल्याही पुराव्याशिवाय पोलिसांनी फासेपारधींना उचलून नेल्याची आणि आजही ते तुरुंगात खितपत असल्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्रातील लोक देतात. “समाजातील आमची प्रतिमा बदलणे आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवणे या उद्दिष्टांसह आम्ही संवेदनासोबत काम करत आहोत.” आपल्या कुक्कुटपालन शेडजवळ बसलेले कुलदीप सांगत होते. “आमच्याबद्दल आणि आमच्या शिकार करण्याच्या पद्धतींबद्दल खूप सारे गैरसमज आहेत. पारंपारिक शिकारी असणे म्हणजे गुन्हेगार असणे नव्हे. आमची शिकार नेहमीच्या शिकारीसारखीनसून शिकारीसंबंधी खूप सारे नियम आणि पारंपारिक विधी-निषेध आम्ही कटाक्षाने पाळतो.” कुलदीप याचे म्हणणे खरेच होते. या भागातील फासेपारधी अजूनही शिकारीसाठी बांबू आणि घोड्याच्या केसांपासून (खंदारी) बनवलेला पारंपारिक फास वापरणे, प्रजनन आणि पोषण काळात मादी आणि पिल्लांची शिकार न करणे, इत्यादी नियमांचे पालन करतात. “सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकजण शिकारी बनू शकत नाही. त्यासाठी तुमच्याकडे तल्लख बुद्धी, तीक्ष्ण नजर आणि सावध कान तसेच क्षणात निर्णय घेण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.” आम्ही आमच्या नेत्यांची निवड या गुणांवरून करायचो. चांगले शिकारी हे बहुदा चांगले नेतेही असायचे कारण ते मादक पदार्थ आणि अनैतिक कृत्यांपासुन दूर राहायचे. “जे पापणी लवताच पक्षी कोठे आहे हे सांगू शकतात आणि जे नियमांचं पालन करतात त्यांनाच शिकारी म्हणून समाजात स्वीकारले जाते.” हिंमतरावांनी अभिमानाने सांगितले.

सामुहिक ज्ञाननिर्मितीतून समग्र रूपांतरण

कालांतराने, जस-जसे कौस्तुभ फासेपारधींना समजून घेऊ लागले आणि त्यांच्यातल्या काहींशी त्यांची मैत्री घट्ट होऊ लागली, तस-तसे त्यांच्या लक्षात यायला लागले की, तणमोर, त्यांचे पुनरुज्जीवन आणि सन्मानजनक जीवनासाठीचा फासेपारध्यांचा संघर्ष या बाबींचा एकमेकांशी अत्यंत जवळचा संबंध आहे. हिंमतरावांच्या मदतीने कौस्तुभ यांनी हळूहळू अधिकाधिक फासेपारधींशी – मुख्यत्वे तरुणांशी – संपर्क वाढवला,  आणि सुरु झाला ज्ञानाच्या सह-निर्मितीचा प्रवास!

हे काम २००१ मध्ये सुरु झाले आणि २००५ पर्यंत कौस्तुभ आणि फासेपारधी तरुणांनी कित्येक संशोधनात्मक अभ्यास निबंध (exploratory studies) लिहिले. यातील पहिला जन जैवविविधता नोंदवही (पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर) तयार करण्यासाठी लिहिण्यात आला. यात पक्ष्यांचे क्षेत्र सर्वेक्षण (फील्ड सर्वे) करणे, त्यांचे संरक्षण करणे तसेच त्यांच्या संख्येवर आणि अधिवासावर लक्ष ठेवणे, तसेच या पक्ष्यांशी संबंधित पारंपारिक ज्ञान आणि प्रथांविषयी तपशीलवार नोंदी करणे या बाबींचा समावेश होता. या संपूर्ण प्रकल्पादरम्यान, तरुणांमध्ये निष्कर्षांवर नियमितपणे औपचारिक तसेच अनौपचारिक चर्चा घडवून आणण्यावर कौस्तुभ यांनी भर दिला. या प्रकल्पांतर्गत यातील काही तरुणांना थोडेसे मानधनही देण्यात आले, यामुळे अशी चर्चा सुलभ झाली.

फासेपारधी आणि उपजीविकेसाठी शिकार यावर चर्चा

यातील पहिली चर्चा होती ती, ते शिकार करत असलेल्या प्रमुख पक्षी प्रजातींशी त्यांचे संबंध आणि या पक्ष्यांची चर्चेच्या वेळी, भूतकाळातील आणि भविष्यातील संभाव्य संख्या, या विषयावर.

वर्तमानातील आपली सामाजिक-आर्थिक परिस्थिती समजून घेण्यासाठी तरुणांच्या दृष्टीने ही चर्चा खूप महत्त्वाची होती कारण भविष्यात ती आणखीनच बिकट होत जाण्याची शक्यता होती. या चर्चांनी तरुणांना त्यांच्या स्वतःच्या प्रथा आणि परंपरा समजून घेण्यास आणि त्या योग्यप्रकारे मांडण्यास मदत केली. यात पक्ष्यांच्या संख्येवर लक्ष ठेवण्याच्या पारंपारिक तंत्राचाही समावेश आहे. या चर्चांमधून पुढे हेही लक्षात आले की या पक्ष्यांची संख्या खरोखर कमी होत आहे. असे होण्यामागील अनेक कारणे हीफासेपारधींनी शोधून काढली ज्यात, अधिवास विनाश, कीटकनाशक आणि तणनाशकांचा बेसुमार वापर, आणि फासेपारधी नसलेल्या आणि शिकारीसंबंधी कोणतेही विधी-निषेध न पाळणाऱ्या लोकांकडून हौशीसाठी आणि पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी केली जाणारी शिकार यांचा समावेश होता.

वडाळ्यातील तांडा पंचायत बैठक, छायाचित्र: साहेबराव राठोड

यातूनच पुढेया पक्ष्यांचे आणि उपजीविकेसाठी शिकारीवर अवलंबून असलेल्या फासेपारध्यांचे भवितव्य यावरील चर्चा जन्माला आली. पक्ष्यांची सध्याची घटती संख्या पाहता तिच्यावर पुढील पिढीची उपजीविका भागणार नाही हे स्पष्टच होते. याचवेळी बाह्य घटकांचा विचार करता, या पक्ष्यांची संख्या पुरेशी राखणे पूर्णपणे फासेपारध्यांच्या हातात नव्हते. या गोष्टी लक्षात आल्यामुळे तरुणांनी स्वतःसाठी आणि पुढील पिढीसाठी उपजीविकेच्या इतर पर्यायांवर चर्चा करण्यास आणि ते शोधण्यास सुरुवात केली.

आर्थिक दौर्बल्य, अंतर्गत असमानता आणि फासेपारधींसोबत होणारा सामाजिक भेदभाव यांच्या कारणांचा शोध घेण्यासाठी झालेली चर्चा

दुसरी चर्चा ही फासेपारध्यांसोबत होणाऱ्या सामाजिक भेदभावाबरोबरच समूहांतर्गत स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाणे, आर्थिक अधिकार नसणे आणि कमजोर नेतृत्व अशा बाबींच्या मुळाशी जाणारी होती. सुरुवातीच्या चर्चांमध्ये, तरुणांना त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती कमजोर असण्याचे कारण “त्यांच्या समाजातील नेते राजकीय पक्षांशी संबंधित नसणे” हे वाटले. यावरून राजकीय नेते खरोखर लोकांच्या हितासाठी काम करतात का यावर दीर्घ चर्चा झाली. यातूनच “समूहांतर्गत प्रभावी आणि चांगल्या नेतृत्वाची (राजकीयच असायला हवे असे नाही)” गरज ओळखली गेली. वयस्कर मंडळींनी नेत्याची निवड ही एक महत्त्वपूर्ण पारंपारिक प्रक्रिया असल्याचे आणि समूहाच्या नेत्यांची निवड विशिष्ट गुणांवरून केली जात असल्याचे सांगितले, ज्यात खालील गुणांचा समावेश आहे :

१.      निष्पक्षपाती आणि न्यायीपणा

२.      समजुतदारपणा

३.      प्रामाणिकपणा

४.      उदारता

५.      स्वार्थासाठी काम न करता सर्वांच्या हितासाठी काम करणे

त्यांच्या समूहाच्या सध्याच्या नेत्यांमध्ये हे गुण आहेत का यावर तरुणांनी चर्चा करायला सुरुवात केली. फासेपारधींची पारंपारिक जात पंचायत असते जी मुख्यत्वे वाद-विवाद निवारणाचे काम करते. शासन, नैसर्गिक संसाधने, रोजगार किंवा सामाजिक भेदभाव अशा विषयांवर जात पंचायतीत क्वचितच चर्चा होत असे. महिला आणि तरुणांना त्यात कोणत्याच प्रकारे सहभागी करून घेण्यात येत नसे. शिवाय, गेल्या अनेक वर्षांपासून ही पदे अनुवांशिक बनली होती, नेत्यांमध्ये कोणतेच नेतृत्व गुण नव्हते, ते दारुडे, भ्रष्ट आणि प्रलोभनांना सहज बळी पडणारे होते. महिलांच्या बाबतीत तर ही परिस्थिती आणखीनच विषण्ण करणारी होती. अनेक जुलमी प्रथांनी युक्त अशा गंभीर सामाजिक भेदभावाला त्यांना तोंड द्यावे लागत होते, ज्याची परिणती सामाजिक अन्यायात होत होती. जात पंचायत तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या निर्णय प्रक्रियेतून त्यांना वगळले जात होते. या समस्यांवर उपाय शोधू शकेल आणि महिला तसेच तरुणांना सामावून घेईल अशा एका नवीन संस्थात्मक संरचनेची गरज तरुणांना जाणवली.

वडाळ्यातील तरुण आणि मुले गवत ओळखण्यासाठी वनस्पतींचा संग्रह (हर्बेरिअम) तयार करत आहेत. छायाचित्र: कुलदीप राठोड

परिवर्तनाला सुरुवात

अशाप्रकारे गेल्या दशकभराच्या चर्चा आणि संवादातून जी ज्ञाननिर्मिती झाली त्यातून चार महत्त्वाच्या प्रक्रिया सुरु झाल्या :

१.      समूहाने तणमोर आणि त्यांच्या अधिवासावर लक्ष ठेवणे, त्या परिसराचे नाकाशे तयार करणे (मॅपिंग) आणि संरक्षण करणे

२.      समूहाधारित माळरान पुनरुज्जीवन कार्यक्रम राबवणे

३.      फासेपारधींची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सामुहिकरीत्या प्रयत्न करणे

४.      स्वयं-सक्षमीकरण आणि समूहांतर्गत पारंपारिक निर्णय प्रक्रियांना बळ देऊन पुन्हा कार्यरत करणे (त्यांना चालना देणे)

तणमोरांचे समूहाधारित निरीक्षण आणि संरक्षण

या भागातील फासेपारधी राहत असलेल्या १३ गावांजवळील माळरानावर राहणाऱ्या पक्ष्यांची झपाट्याने घटत चाललेली संख्या आणि त्यांच्या अधिवासांचा होणारा ऱ्हास लक्षात घेता, फासेपारधी तरुण येथील तणमोरांचे संरक्षण आणि त्या परिसराचे नाकाशे तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्याला कोणाला तणमोर दिसेल तो लगेच त्याच्या संपर्कातील इतरांना आणि कौस्तुभ यांना माहिती देतो. हे दुर्मिळ पक्षी साधारणपणे नराच्या प्रणयाराधन नृत्या वेळीच दिसततात, हे नृत्य जोडीदार मिळेपर्यंत एकाच ठिकाणी सुरु असते आणि  वर्षानुवर्षे तो नर त्याचं ठिकाणी येत असतो. समूह सदस्य अशी ठिकाणे शोधून त्यांच्यावर लक्ष ठेवतात आणि त्यांचे रक्षण करतात. तणमोरांचा ६०% अधिवास हा खाजगी शेतजमीनी आहेत (ज्यांची मालकी फासेपारधींकडे नाही) यामुळे या जमिनीच्या दीर्घकालीन सुरक्षिततेची हमी देणे अवघड  आहे. परंतु काही वेळेस ती जागा गुप्त ठेवून तर काही वेळेस जमीन मालकाशी वाटाघाटी करून तणमोर संरक्षणाचे प्रयत्न सुरु आहेत. फासेपारध्यांच्या गावांपैकी वडाळासारख्या गावांनी हळूहळू या संकटग्रस्त जातीच्या पक्ष्यांची शिकार पूर्णपणे थांबवण्याची शपथ किंवा फासेपारधींच्या भाषेत सांगायचे झाल्यास पल्टी घेतली आहे.

समूहाधारित माळरान पुनरुज्जीवन कार्यक्रम

१३ गावांपैकी कानशिवणी, पाराभवानी, पिंपळगाव आणि वडाळा या गावांनी आपल्या माळरानांच्या आणि वनांच्या पुनरुज्जीवनास सुरुवात केली आहे. आम्ही भेट दिलेल्या वडाळा गावात २८ कुटुंबांनी माळरान आणि काटेरी वनाचे मिश्रण असलेल्या आसपासच्या १०० हेक्टर वनजमीनीचे संरक्षण आणि पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आणि पुढे वनविभागानेही त्यांच्या संयुक्त वन व्यवस्थापन (जेएफएम) योजने अंतर्गत या उपक्रमाला पाठींबा दिला. “वनविभाग आणि फासेपारधी यांच्यात परस्पर आदरयुक्त सहकार्य घडून येण्याची महाराष्ट्रातील ही कदाचित पहिलीच वेळ असेल.” कौस्तुभ सांगत होते. या पुनरुज्जीवन कार्यक्रमामुळे गवताचे उत्पादन वाढले, मातीची गुणवत्ता सुधारली, सरपण, रानफळे, औषधी वनस्पतींची उपलब्धता वाढली आणि चाऱ्याच्या विविध प्रदेशनिष्ठ प्रजातींत भरपूर वाढ झाली. “वडाळा माळरानात सध्या ४७ पेक्षा जास्त प्रजातींच्या गवताचे रक्षण केले जात आहे, ज्यात इतर ठिकाणी दुर्मिळ बनलेल्या परंतु तणमोरासारख्या माळरान पक्ष्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पवन्या, मार्वेल, कुंदा आणि हराळी या प्रजातींचाही समावेश आहे.” कुलदीप म्हणाले.

गेल्या काही वर्षांत, माती आणि ओलावा संवर्धनासाठी तसेच ‘चॅक डॅम ’ बांधण्यासाठी ’पाणी फाउंडेशन’नेही मदत केली आहे. मोठ्यांच्या मदतीने गावातील मुलांनी वेगवेगळ्या प्रकारची रानफळे, प्रदेशनिष्ठ चारा प्रजाती आणि स्थानिक औषधी वनस्पतींच्या २०,००० रोपांची रोपवाटिका सुरु केली आहे. “वनविभागाने अकोला जिल्ह्यात वृक्षलागवडीवर १३ कोटी रुपये खर्च केल्याचे वर्तमानपत्रात वाचले. आम्ही हे काम कुठल्याही आर्थिक मदतीशिवाय श्रमदानाच्या आधारावर करत आहोत. अनेक  स्थानिक प्रजाती असलेली आमची रोपवाटिका अधिकसमृद्ध, वैविध्यपूर्ण आणि यशस्वी आहे.” पुनरुज्जीवित होत असलेल्या माळरानातून आम्हाला फिरवून आणतांना कुलदीप सांगत होते. “आमच्या गावातील एकूण वनक्षेत्र हे २७३ हेक्टर असून त्यापैकी १०० हेक्टर क्षेत्र आम्ही पूर्णपणे संरक्षित केले आहे, उरलेल्या क्षेत्राचा आम्ही केवळ निर्वाहापुरता संयमपूर्वकवापर करतो.” ते पुढे म्हणाले. या जंगलाच्या संरक्षणासाठी गावाने अनेक नियम आणि कायदे तयार केले आहेत, जसे, संपूर्ण गावाचा एकच सामाईक मेंढपाळ आहे जो सर्वांची गुरे चारायला नेतो आणि ती संरक्षित क्षेत्रात घुसणार नाहीत याची काळजी घेतो. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठावला जातो, बाहेरच्यांना संसाधने चोरण्यापासून रोखले जाते – ज्यामुळे काहीवेळेस संघर्ष आणि पोलीस केसेसही झाल्या आहेत.

संरक्षित क्षेत्रातील आपल्या चाऱ्यासह वडाळा गावातील तरुणांचा गट छायाछित्र : कुलदीप राठोड

“या जंगलांवर आमचा कोणताच कायदेशीर अधिकार नसल्यामुळे आमच्या भवितव्याविषयी अनिश्चितता वाटत असून संरक्षणात अनेक अडचणी येत आहेत. यासाठी वन संरक्षण कायदा २००६ अंतर्गत आम्ही लवकरच दावा दाखल करणार आहोत,” कुलदीप सांगतात.

सामाजिक-आर्थिक बदलाच्या दिशेने

“समाजातील कलंकित प्रतिमा आणि अहोरात्र छळणारी वनविभागाकडून पकडले जाण्याची भीती –  यांसारख्या बाबींचा विचार करता एखादा फासेपारधी क्वचितच उपजीविका म्हणून शिकारीवर अवलंबून राहील किंवा त्याच्या मुलांनी तसे करावे अशी इच्छा बाळगेल.” माळरानात भेटलेली स्मिता (नाव बदलले आहे) सांगत होती. काहींनी आठवडी बाजारांत स्वस्त प्लास्टिकच्या वस्तू विकण्यासारखे फिरते व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे तर काही कापूस वेचणी तसेच पशुपालनातील आणि शेतातील मजुरीची कामे करत आहेत. उदा. १००% फासेपारधी गाव असलेल्या वडाळा गावात २८ कुटुंबांपैकी १९ कुटुंबे अल्पभूधारक (५ एकरपेक्षा कमी जमीन असलेले) असून २३ कुटुंबांतील सदस्य फिरते व्यवसाय किंवा मजुरी करतात. अल्पभूधारक कुटुंबांच्या मते शेती हा रोजगाराचा सर्वांत अनाकर्षक पर्याय आहे. अनेकदा शेतात कामाला लावलेल्या मजुरांचा रोजगार देखील शेतीतून निघत नाही. रोजंदारी आणि फिरत्या व्यवसायांतून चांगले उत्पन्न मिळते परंतु त्यासाठी लागणारी कौशल्ये प्रत्येकाकडे असतातच असे नाही.

चर्चेतील निष्कर्षांच्या आधारावर संवेदना संस्था आणि फासेपारधी तरुणांनी मिळून उपजीविकेत वैविध्य आणण्यासाठी अनेक पाउले उचलली, विशेषतः महिला आणि तरुणांसाठी. जवळपास १८ बचतगटांची स्थापना करण्यात आली, ज्यांनी विविधप्रकारच्या उपजीविका निर्मितीस आर्थिक मदत केली. उदा. पर्यावरणपूरक शेळी आणि कोंबडी पालन, दुग्ध व्यवसाय आणि चारा पुनरुत्पादन इत्यादी. गेल्या काही वर्षांत सर्व बचतगटांनी मिळून जवळपास ४,००,००० रुपयांची रक्कम उभी केली आहे आणि वेगवेगळ्या सदस्यांनी ७,००,००० रुपयांचे कर्ज मिळवून त्याची परतफेडही केली आहे.

पुनरुज्जीवित माळरानात आता चारा आणि पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेती आणि पशुपालन शक्य झाले आहे. चारा आणि दुधाच्या विक्रीतून वडाळासारख्या गावांचे उत्पन्न वाढले आहे. वडाळ्याच्या माळरानाचे पुनरुज्जीवन करणाऱ्या येथील २८ कुटुंबांच्या एकूण वार्षिक उत्पन्नात यामुळे २,००,००० रुपयांची भर पडली आहे.

सामाजिक-राजकीय बदलाकडे

निर्णय घेणाऱ्या संस्थांमध्ये परिवर्तन घडवून आणल्याशिवाय सामाजिक बदल घडू शकत नाही हे चर्चेतून तरुणांच्या लक्षात आले होते. फासेपारधींमध्ये पारंपारिक अशी ग्रामसभा नव्हती आणि आधी सांगितल्याप्रमाणे जात पंचायत ही दिवसागणिक भ्रष्ट आणि अकार्यक्षम होत चालली होती. यामुळे वडाळा गावासह १३ गावच्या तरुणांनी महिला आणि तरुणांचा सहभाग असलेल्या तांडा पंचायती स्थापण्याचे ठरवले (यांपैकी ३-४ चांगल्याप्रकारे कार्यरत असून बाकीच्या स्वयं-सक्षमीकरणावर काम करत आहेत). या तांडा पंचायती पंचायत राज व्यवस्थेअंतर्गत पंचायतींशी जोडल्या गेल्या आहेत. जात पंचायत ही जातीच्या स्तरावर होती तर तांडा पंचायती या तांडा स्तरावर स्थापण्यात आल्या आहेत, त्यांत तांड्यातील सर्व प्रौढांचा समावेश असून सर्वांना निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. प्रत्येक तांडा पंचायत ११ सदस्यांच्या कार्यकारी समितीची निवड करते, ज्यात ५०% महिला सदस्य असतात. या सदस्यांच्या कामकाजावर गावकरी समाधानी नसल्यास ते त्यांना कधीही बदलू शकतात. तांडा पंचायतींचे नियम हे भेदभावरहित पारंपारिक मूल्ये आणि आधुनिक लोकशाही मूल्ये यांचे मिश्रण आहेत. उदा. मौखिक नियमांची पारंपारिक पद्धत सुरु आहे परंतु महिला आणि तरुणांचा सहभाग नवीन आहे. “आम्ही सर्वानुमते निर्णय घेतो परंतु कधीकधी आमच्यात थोडे मतभेद होतात तेव्हा बहुमताचा निर्णय मान्य केला जातो.” तांडा पंचायतीच्या उत्क्रांतीबद्दल बोलतांना कुलदीप सांगत होते.

पर्यावरण शिक्षण कार्यशाळेदरम्यान शालेय आणि आदिवासी मुले नकाशावर चारा उत्पादन नोंदणी करायला (मॅपिंग) शिकतांना. छायाचित्र : साहेबराव राठोड

२००० साली तरुणांनी युवक गटाची स्थापना करण्याचेही ठरवले. टिटवा, मासा, वडाळा आणि कानडी या गावांनी त्यांच्या गावात युवक गटांची स्थापना केली आहे. या युवक गटांनी अभ्यास, चर्चा आणि उपरोक्त सर्वच उपक्रमांत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी हळू-हळू त्यांच्या सांस्कृतिक परंपरा, लोकगीते आणि लोककथा समजून घेण्यास आणि त्यांचे दस्तावेजीकरण करण्यासही सुरुवात केली आहे. घरगुती हिंसा, जातीभेद, तरुण नेतृत्व असे सामाजिक मुद्दे निवडून हे तरुण तांडा पंचायतींच्या बळकटीकरणात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. युवक गटातील सर्व सदस्य हे तरुण असून त्यात स्त्रियांचाही समावेश आहे. विदर्भातील सर्व ६८ फासेपारधी गावांतील युवकांना जोडून सामुहिक ज्ञानार्जन आणि सक्षमीकरणावर काम करण्याचा ध्यास या युवक गटांनी घेतला आहे.

प्रयत्नांना मान्यता

२०१२ मध्ये माळढोक संवर्धन योजनेत फासेपारधींच्या पारंपारिक ज्ञानाचा समावेश करण्यात यावा – ही कौस्तुभ यांची विनंती स्वीकारून केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालय आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांनी माळढोक पक्ष्यांची संख्या पूर्ववत करण्यासाठी कृती योजना (Bustard Recovery Programme) तयार करायचे ठरवले. २०१४ साली माळढोक संवर्धनासाठी वन विभागाकडे एका योजनेचा मसुदा सादर करण्यात आला. संवेदनाच्या मदतीने फासेपारधींनी ही योजना तयार केली होती. फासेपारधींच्या पारंपारिक ज्ञानावर एखाद्या संवर्धन योजनेचा मसुदा तयार करण्याएवढा विश्वास ठेवण्याची शासनाची ही कदाचित पहिलीच वेळ असेल.

वडाळातील सामुदायिकरीत्या संवर्धित माळरानावरील प्रादेशिक कार्यशाळेदरम्यान वन विभाग कर्मचाऱ्यांनी माहिती घेण्यासाठी भेट दिली. छायाचित्र : साहेबराव राठोड

इंडिया बायोडायव्हर्सिटी अवॉर्ड

२०१२ सालच्या हैदराबाद येथील जैव-विविधता परिषदेत (कॉन्फरन्स ऑफ पार्टीज[1]), सामुदायिक पुढाकार किंवा  ‘कम्युनिटी स्टीवर्डशीप’ या श्रेणीत प्रथम प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन वडाळा गावच्या प्रयत्नांचा गौरव करण्यात आला. तत्कालीन पर्यावरण मंत्र्यांच्या हस्ते यावेळी वडाळा गावच्या प्रतिनिधींना गौरविण्यात आले.

असे असले तरी, बदलाची ही प्रक्रिया दीर्घकालीन स्वरुपाची आहे. फासेपारधी, तणमोर आणि माळरानांना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. माळरान आणि तणमोर यांच्या भवितव्याविषयी तुम्हाला काय वाटते असे विचारल्यावर हिंमतराव म्हणतात, “इमारतींनी आपले पोट भरेल? आपण जिवंत राहू शकू? मला नाही वाटत.” तणमोर हे पक्षी अजूनही अतिसंकटग्रस्त अवस्थेत आहेत, माळरानेही भू-माफिया आणि उद्योजकांच्या राक्षसी हावेचा घास ठरत आहेत, तणमोरांना हानिकारक असेलेल्या एकपीक पद्धतीला शासकीय धोरणांचा पाठींबा मिळत आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनातून या उध्वस्त परिसंस्थेला नव्याने उभारण्याचे फासेपारध्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, हाच या निराशाजनक परिस्थितीत एक आशेचा किरण आहे. त्यांचे आणि तणमोरांचे भविष्यातील अस्तित्व टिकविण्यासाठी, फासेपारधींना वन हक्क कायद्यांतर्गत त्यांनी संरक्षित केलेले जंगल राखण्याचे किंवा त्यातील संसाधनांचा उपयोग करण्याचे अधिकार मिळोत हीच आशा आहे.

लेखिका कल्पवृक्ष संस्थेच्या सभासद आहेत.

प्रथम इंग्रजीत ‘विकल्पसंगम’ या संकेतस्थळावर प्रकाशित :

/article/neema-shrishtee-florican-hunters/#.XMFtczAzbIU

*     *     *[1] आंतरराष्ट्रीय जैव-विविधता करारावर हस्ताक्षर करणाऱ्या देशांचे अधिवेशन 

Story Tags: , , , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published.

Loading...
Kishore Wankhade November 20, 2019 at 10:14 am

लोकसहभागातून तणमोर आणि गवताळ प्रदेशाच्या संवर्धनासाठी होत असलेले कार्य प्रशंसनीय आहे. या परिसराला व येथील कार्यकर्ते व लोकांना भेटायला मी नक्की येईल.
किशोर वानखडे,
अध्यक्ष, बहार नेचर फाउंडेशन, वर्धा

%d bloggers like this: