पिठोरी शिरसगाव ते सँटियागो – रोहिणीचा ‘गोल’ (in Marathi)

By वंदना खरे (Vandana Khare)onJun. 14, 2015inSociety, Culture and Peace

Photo credit: Homeless World Cup

मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात असलेले पिठोरी शिरस हे अगदी छोटं गाव. जेमतेम २००० लोकवस्तीच्या या गावातली दहावीत शिकणारी रोहिणी पाष्टे हजारो किलोमीटर दूर असलेल्या दक्षिण अमेरिकेतल्या सँटियागो शहरात जाऊन फुटबॉल खेळून आली! मराठवाड्यातल्या खेड्यात आजही साधारणपणे कुठलीही बाई डोक्यावर पदर घेतल्याखेरीज घराबाहेर पाऊल टाकत नाही! जालना जिल्हा तर आजवर बालविवाह आणि बालमजुरीच्या निमित्तानेच कुप्रसिद्ध झालेला होता! या दुष्काळग्रस्त जिल्ह्यामध्ये बहुसंख्य घरामध्ये मुलींना शाळेत घातलेच जात नाही आणि साधारणपणे बाराव्या तेराव्या वर्षीच मुलींचे लग्न लावून टाकले जाते. अनेक मुलींचा तर लहान वयातच बाळंतपणाच्या चक्रात अडकून अपमृत्यू होतो. अशा पार्श्वभूमीवर याच जालना जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातल्या एखाद्या मुलीला फुटबॉलसारख्या पुरुषी समजल्या जाणार्‍या खेळात एवढे प्राविण्य मिळवता येणे ही मोठीच आश्चर्याची गोष्ट आहे; नाही का? मग रोहिणीने एवढी मोठी सातासमुद्रापार उडी कशी मारली?

पिठोरी शिरस गावातल्या एका गरीब घरातल्या तीन भावंडापैकी रोहिणी ही सगळ्यात धाकटी मुलगी! घरची जेमतेम दोन एकर शेती – त्यातच रोहिणीच्या वडिलांचा अकाली मृत्यू झाला! रोहिणीची आई – सुशीलाबाई लोकांच्या शेतावर मोलमजुरी करून कसेबसे दिवस ढकलत होती. त्यामुळे मुलीना शाळेत घालण्याची चैन त्याना परवडण्यासारखी नव्हती. रोहिणीच्या मोठ्या बहिणीचे चौदाव्या वर्षीच लग्न लावून टाकावं लागलं होतं. तिच्या मोठ्या भावाला आजोबांनी शिक्षणासाठी आपल्या घरी नेलं, पण रोहिणीला मात्र चौथीत शाळा सोडावी लागली. जरी सुशीलाबाईंनी रोहिणीला यापुढे शिकवायचे नाही असे ठरवले असले तरी रोहिणीची शिकायची आवड मात्र कमी झाली नव्हती. पण रोहिणीच्या शेजारच्या काकाना अंबडला नव्यानेच सुरू झालेल्या कस्तुरबा गांधी विद्यालयाची माहिती समजली नसती, तर कदाचित रोहिणी देखील आई सोबत मोलमजुरी करत राहिली असती. सुशीलाबाईंनी तर कधी गावाबाहेर पाउलही टाकलेले नव्हते, त्यामुळे मुलीला शाळेच्या निमित्ताने बाहेरगावी पाठवणे त्यांच्या अगदी जीवावर आले होते! पण या शाळेत रोहिणीच्या शिक्षणाची विनामूल्य सोय होईल असे लक्षात आल्यावर मात्र त्यांनी मन घट्ट करून तिला ३० किलोमीटर लांब असलेल्या निवासी शाळेत घातले.

बारा वर्षांची रोहिणी पहिल्यांदाच घरापासून दूर राहणार होती – नवीन माणसे, नवीन जागा यामुळे काही काळ तिला फार अस्वस्थ वाटत असे. ती शाळेत कुणाशी बोलत नसे, वर्गातही मागेमागे राहत असे. पण खेळाच्या तासाला शाळेतल्या शेख सरांनी तिच्यातले गुण हेरले आणि तिला खेळात जास्त भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. शाळेतल्या राधा शिंदे या अव्वल खेळाडू मुलीची तिच्याशी मैत्री करून दिली. राधा शाळेमध्ये रोहिणीची ताईच बनली. खेळ आणि अभ्यास या दोन्हीत रोहिणीला तिचे सतत मार्गदर्शन मिळत गेले आणि रोहिणीचे नैपुण्य वाढत गेले. सुरुवातीला ती खो-खो खेळत असे आणि धावण्याच्या शर्यतीत भाग घेत असे. नंतर, राधाचा खेळ पाहून तिच्याप्रमाणे फुटबॉल खेळायला सुरुवात केली. रोहिणी गेल्या चार वर्षांपासून खो-खो आणि फुटबॉल खेळते आहे. तिने वेगवेगळ्या सामन्यांसाठी राज्यभर शाळेचे प्रतिनिधित्व केले आहे. मागच्या वर्षी ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत सतरा वर्षा खालील गटातही शाळेने दुसरा क्रमांक मिळवला होता. रोहिणीचा या सामन्यातला खेळ पाहून ‘स्लम सॉकर’ संस्थेच्या प्रतिनिधींनी तिची विशेष दखल घेतली. ‘स्लम सॉकर’ ही संस्था देशभरात वंचित वर्गातील मुलामुलींना खेळांच्या माध्यमातून विकासाच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी काम करते. फुटबॉल खेळण्यामुळे आत्मविश्वास बळकट होतो आणि सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बाबतीतली निर्णयक्षमता वाढीस लागते असा ‘स्लम सॉकर’ संस्थेचा विश्वास आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीतले समाजाचे जुने पुराणे मतप्रवाह बदलून सर्वांना विकासात सक्रीय सहभाग घेता यावा यासाठी ही संस्था खेळाच्या माध्यमातून प्रयत्न करते. देशभरात या दृष्टीकोनातून या संस्थेतर्फे विविध उपक्रम चालवले जातात. तिला या संस्थेतर्फे नागपूरला विशेष प्रशिक्षण दिले आणि ‘होमलेस फुटबॉल वर्ल्ड कप’ खेळण्यासाठी भारताच्या संघात तिची निवड झाली! जगातल्या ७० देशातून अगदी आव्हानात्मक परिस्थितीत जगणारी ५०० पेक्षा जास्त मुलेमुली हा आगळा वेगळा वर्ल्ड कप खेळायला आली होती. त्या सामन्यांसाठी रोहिणीला दक्षिण आफ्रिकेतल्या चिले देशात सँटियागो शहरात जायला मिळाले. रोहिणी म्हणते , मी तर विमान कधी पाहिले सुद्धा नव्हते! आपल्याला विमानात बसून परदेशी जायला मिळेल असे मला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते!

कारण अंबड मधल्या शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी गावात रोहिणीला कुठलेही मैदानी खेळ खेळायची संधी मिळालेली नव्हती. इतकंच नव्हे तर दोन वर्षे शाळेत जायला मिळालेले नव्हते. कस्तुरबा गांधी विद्यालयात येणार्‍या बहुतेक शिक्षणात तीन चार वर्षांचा खंड पडलेला असतो. अशा मुलींना पुन्हा शिक्षणाची गोडी लागावी यासाठी अंबडच्या शाळेतले शेख सर क्रीडा शिक्षणाचा कौशल्याने उपयोग करतात. ते म्हणतात, मी जेव्हा या मुलींना धावायला, उड्या मारायला सांगतो किंवा व्यायाम करवून घेतो तेव्हा सुरुवातीला त्या नुसत्याच हसत राहतात किंवा लाजतात. एकदा तर मी जेव्हा खेळाचे युनिफोर्म त्यांना दिले तेव्हा त्या खोलीतून बाहेर यायला देखील तयार नव्हत्या. पण त्याना प्रोत्साहन देण्यासाठी मी त्यांना आपल्या देशातल्या खेळाडूंच्या गोष्टी सांगतो, ‘चक दे ‘ सारख्या फिल्मस् दाखवतो. हळूहळू जेव्हा त्यांचा खेळातला आत्मविश्वास वाढत जातो तसतशी त्यांची अभ्यासातही प्रगती होत जाते. शाळेच्या टीममध्ये खेळणार्‍या एकाही मुलीचे परीक्षेतले मार्क कमी झालेले नाहीत. … असे शेख सर मोठ्या अभिमानाने सांगतात. ते मुलींना विविध आंतरशालेय स्पर्धांसाठी तयार करतात आणि आवर्जून भाग घ्यायला लावतात. ‘आपण जरी लहानशा गावात रहात असलो तरी आपण राज्यातल्या कुठल्याही शाळेतल्या कुठल्याही खेळाडू पेक्षा कमी नाही’ हा विचार त्यांनी मुलींच्या मनावर बिंबवलेला आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळे शाळेच्या टीमने विविध सामन्यात सातत्याने यश मिळवलेले आहे.

रोहिणी म्हणते, आमच्या शाळेत अभ्यासा इतकेच महत्त्व खेळाला दिले जाते. या शाळेत प्रवेश मिळाला म्हणूनच मला खेळायची संधी मिळाली. आता खेळाची इतकी आवड लागली आहे की सुट्टीमध्ये देखील शाळा सोडून घरी जावेसे वाटत नाही. या शाळेच्या टीममध्ये खेळणार्‍या सगळ्याच मुलींची हीच भावना आहे. कारण जरी सुट्टीच्या दिवसात घरी गेल्यावर गावातल्या मुलीनी एकत्र येऊन फुटबॉलचा सराव करायला शाळेतून सांगितले असले तरी अजूनही मुलींच्या घरातूनच तशी परवानगी मिळत नाही. ‘मुलीच्या जातीने घरात राहावं आणि चार कामं उरकावीत’ असंच अजूनही गावातल्या माणसांना वाटते. रोहिणीच्या आईलाही वाटत असे की पोरीच्या जातीने असे उघड्यावरचे मैदानी खेळ शोभत नाहीत. खरे तर, गावातली मुलेदेखील फारसे मैदानी खेळ खेळत नसत. पण आता रोहिणीची आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी निवड झाल्यानंतर गावाला खेळाचे महत्त्व हळूहळू पटायला लागलेले आहे. गावात रोहिणीचा आणि शाळेतले कोच रफिक शेख यांचा सत्कारही झाला. त्यावेळी सरांनी गावातल्या मुलांना फुटबॉल भेट दिला आहे! तेव्हापासून गावातल्या मुलांनी माळावर फुटबॉल खेळायला सुरुवात केली आहे. आधी सांगितल्याप्रमाणे मुली मात्र खेळत नाहीत. मी जेव्हा रोहिणी सोबत तिच्या घरी गेले तेव्हा गावात रोहिणीचे अभिनंदन करणारी पोस्टर्स ठिकठीकाणी लावलेली दिसत होती. गावाला रोहिणीचे खूपच कौतुक वाटते. आज गावात रोहीणीकडे एक आदर्श मुलगी म्हणून पाहिले जाते. आपल्या मुलींच्या शिक्षणाविषयी मुलींचे पालक तिचा सल्ला घेतात. रोहिणीच्या मोठ्या भावालाही तिचा फार अभिमान वाटतो. एकेकाळी रोहिणीला शाळेत पाठवायला कचरणारी आई आता म्हणते; रोहिणी जेव्हा शिकून स्वत:च्या पायावर उभी राहील, तेव्हाच तिच्या लग्नाचा विचार करू. माझ्यासारखे हाल तिच्या नशिबी यायला नकोत.

कधीही न पाहिलेल्या लोकांमध्ये आणि पूर्ण अपरिचित वातावरणात जाताना रोहिणी देखील आधी घाबरली होती. ती सांगत होती, विमानात बसताना अगदी पोटात गोळा आला होता. पण आपण आपल्या देशातर्फे खेळतोय हे खूप छान वाटत होते! मला किती नवनवीन लोकांसोबत खेळायला दोस्ती करायला मिळाली आणि जेव्हा सामना संपल्यावर आपले राष्ट्रगीत वाजले तेव्हा तर अंगावर रोमांच उभे राहिले! देशाच्या फुटबॉल संघातून परदेशी खेळून आल्यापासून रोहिणीच्या व्यक्तीमत्वात एक निराळाच आत्मविश्वास जाणवतो आहे! सध्या तीचे वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार होत असतात. नोव्हेंबर महिन्यात तिला युनिसेफ कडून ‘नवज्योती पुरस्कार’ देण्यात आला. तेव्हा तिने सांगितले , फुटबॉल मुळे माझे आयुष्य बदलून गेले. नाहीतर कदाचित मीदेखील माझ्या बहिणीसारखी कमी वयात लग्न आणि मुलाबाळांच्या चक्रात अडकून पडले असते! पण आता माझ्यासमोर कुणीही माझ्या लग्नाचा विषय काढीत नाही. आपल्याकडे रीतीभातींच्या नावाखाली मुलींना अडाणी ठेवले जाते . माझ्या खेळातल्या यशामुळे मला अशा रूढीशी लढायचे एक शस्त्र मिळाले आहे. माझ्या सारखी संधी खूप सार्‍या मुलींना मिळाली पाहिजे म्हणून मीदेखील गरीब मुलांना खेळाचे प्रशिक्षण देणारी क्रीडा शिक्षिका होणार आहे!
रोहिणी आगे बढो, हम तुम्हारे साथ है|

लेखिकेशी संपर्क

हा लेख प्रथम मिळून सा-याजणी मासिकात प्रकाशित केला गेला.

Read Rohini Pashte’s story in English 

Story Tags: , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...
%d bloggers like this: