प्लास्टिकविरोधी लढाईला काडीचा आधार (in Marathi)

By अनुवादक अनुराधा अर्जुनवाडकर; मूळ लेखक पंकज सेखसरियाonOct. 25, 2017in Perspectives

महासागरात अधिक काय –  मासे की प्लास्टिक?  Photo Credit: AP

साध्यासुध्या काडीने प्लास्टिकविरूद्धच्या लढाईला तोंड फोडले असेल का?

आज तुम्ही जे कुठले पेय घेतले असेल – कोला, फळांचे रस, कोल्ड काॅफी किंवा लस्सी – ते पिण्यासाठी तुम्हाला त्यांनी काडी दिली असेल, नाही? सर्वत्र आढळणारी ही पांढरी, गुलाबी किंवा निळी नळी जणू अद्ययावत खाद्यसंस्कृतीचे, व ‘वापरा  व फेकून द्या (यूज अॅण्ड थ्रो)’ संस्कृतीचेही द्योतक झाली आहे. एखाद्या शहरात रोज वापरल्या जाणा-या अशा काड्यांचा, व त्याबरोबरच जगभरातील लहान-मोठ्या शहरांचा विचार केल्यास दिवसाला किती काड्या एकदाच वापरून फेकून दिल्या जात असतील, याचा अंदाज बांधता येतो.

ज्या सहजतेने आपण स्ट्राॅ मागून घेतो व टाकून देतो, तेवढ्याच स्पष्टपणाने  आपल्या या कृती मागचा आपला अविचार, व तिच्यामुळे होणा-या परिणामांचे प्रमाणही अधोरेखित होते.

केरळमध्ये दर दिवशी अशा 33 लाख काड्या वापरल्या जातात. अमेरिकेत ही संख्या दिवसाला 50 कोटी इतकी आहे. जगभरात अशा कोट्यावधी काड्या फेकून दिल्या जात असतील. यांतील ब-याचशा समुद्रांत पोहोचत असतील. दर वर्षी समुद्र किना-यांच्या सफाई अभियानांच्या दरम्यान सर्वाधिक प्रमाणात गोळा कल्या जाणा-या दहा प्रकारच्या कच-यात अशा काड्यांचा नेहमीच समावेश असतो.

जगातील एकूण प्लास्टिक निर्मिती व वापरामध्ये अशा कोट्यावधी काड्यांचे प्रमाण थोडकेच असले तरीही यांच्यामुळे अनावधानाने जगभरात एका अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्लास्टिक विरोधी मोहीमेचा पाया घातला गेला आहे.

प्लास्टिक स्ट्राॅला विरोध केला जाऊ लागल्यानंतर काही काळाने, म्हणजे साधारण दोन वर्षांपूर्वी या मोहिमेने जोम धरला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ

2015 मध्ये प्रसिद्ध झालेल्या काॅस्टा रिका देशातील एका विडिओमुळे मोहीमेला विशेष जोम चढला.  ऑलिव रिडले जातीचे एक समुद्री कासव यात दिसते. त्याच्या नाकपुडीत प्लास्टिक स्ट्राॅ रुतलेली आहे. 

एक प्राणीशास्त्रज्ञ ती रुतलेली काडी पकडीने उपटून काढण्याच्या प्रयत्नांत असताना कासवाच्या नाकातून रक्त वाहू लागलेले दिसते. जवळजवळ पाच मिनिटे चाललेल्या या प्रयत्नांनंतर चार इंच लांबीची काडी बाहेर निघते. ती त्या प्राण्याच्या शरीरात किती खोलवर घुसली होती, हे स्पष्ट दिसत असल्याने जगात खळबळ झाली. सोशल मीडियांवर आतापर्यंत सव्वा कोटी लोकांनी हा विडिओ पाहिला असेल. त्यातून प्लास्टिक काडी विरोधी चळवळीला गति मिळाली.

तेव्हापासून बरीच प्रगती झाली आहे. प्लास्टिक प्रदूषण युती (plastic pollution coalition www.plasticpollutioncoalition.org) यांच्या अंदाजानुसार जगभरात जवळजवळ 1800 संस्थांनी अशा काड्यांवर बंदी घातली आहे किंवा मागणी केल्याशिवाय त्या देणे थांबवले आहे.

समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील असलेले स्वयंसेवक असे सांगत आहेत की वर्षभरापूर्वीपेक्षा अलिकडच्या काळात तेथे प्लास्टिकरद्दद काड्या मिळण्याचे प्रमाण घटले आहे. धातू व बांबूपासून स्ट्राॅ बनवण्याच्या उद्योगांना जरा चालना मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील चळवळीचे परिणाम आपल्या देशातही दिसू लागले आहेत. #refusethestraw (म्हणजे ‘काडीला नकार देऊ’) या जागतिक ऑनलाइन मोहीमेला प्रतिसाद देत याच वर्षी मुंबईतील हाॅटेल व बार व्यवसायांनी पण पेयांसह काडी देणे थांबवले आहे, किंवा त्या ऐवजी कागदी काडी देणे सुरू केले आहे.

जून महिन्यात जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केरळमधील हाॅटेल व्यवसायांनीही असाच निर्णय घेतला होता. नागरिकांच्या आग्रहामुळे त्या राज्यातील कझीकोडे शहराच्या नगरपालिकेनेही त्याच सुमाराला प्लास्टिक काड्यांवर बंदी घातली. हा असा एक विषय आहे जेथे ग्राहकाच्या निर्णयामुळे परिस्थितीत फरक पडू शकतो. 

अॅन्थ्रोपोसीन युगाचे द्योतक

शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीवर सध्या ‘मानवीकृत्यप्रभावाचे युग’ सुरू असून त्याचे एक चिन्ह प्लास्टिक प्रदूषण आहे (आण्विक चाचण्या, काॅन्क्रीट व पाळीव कोंबड्या ही इतर काही चिन्हे).

प्लास्टिकची निर्मिती व विसर्जन चढत्या प्रमाणात होत असतानाच हे ही लक्षात घ्यायला हवे की प्लास्टिकचे विघटन होत नाही, ते कधीच कुजू शकत नाही. जुलै 2017 मध्ये ‘सायन्स अॅडवान्सेज ‘ या नियतकालिकात प्रकाशित केल्या गेलेल्या एका लेखात असा अंदाज नमूद केलेला आहे की जगातील महासागरात सध्या 90 हजार दशलक्ष मेट्रिक टन एवढ्या वजनाचे प्लास्टिक असावे, व त्यांत प्रतिवर्ष 50 ते 130 लक्ष मेट्रिक टनांची भर पडत असावी. 

अशा परिस्थितीत 2050 सालापर्यंत आपल्या महासागरांत माशांपेक्षा प्लास्टिकच अधिक असण्याची दाट शक्यता दिसते. हा प्रश्न महाकाय व कालातीत असून या प्रदीर्घ युद्धातील पहिल्या लढाईला साध्यासुध्या काडीने तोंड फोडले आहे, असे दिसते.

‘The Last Straw that triggered the Battle against Plastic’ मूळ लेखाचे द हिंदू मध्ये प्रथम प्रकाशन

The Last Straw that triggered the Battle against Plastic (first published by The Hindu)

Story Tags: , , , , , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...
%d bloggers like this: