जिल्हा प्रशासन-ग्रामसभांमध्ये सामंजस्य करार : वनाधारित शाश्वत विकासासाठी होणार मदत (in Marathi)

PostedonMar. 03, 2022in Economics and Technologies


गडचिरोली ब्यूरो.  जिल्ह्यातील ग्रामसभांसाठी कौशल्य व क्षमता विकसनासंदर्भात कार्यक्रम हाती घेऊन गौणवनोपजांमधून त्यांच्या क्षमता व मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेण्यास सक्षम करणे, या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि विविध ग्रामसभांमध्ये सामंजस्य करार होणार आहेत. याची ऐतिहासिक सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयात आज, १६ फेब्रुवारी रोजी लेखा-मेंढा या ग्रामसभेपासून करण्यात आली.

ग्रामसभांचा सहभाग महत्त्वाचा
या ऐतिहासिक कामाच्या सुरुवातीला ग्रामसभांचे महत्त्व प्रमुख आहे. प्रशासनाबरोबर काम करताना त्या कच्च्या मालाचे संकलन सुलभ करणारी प्रमुख संस्था म्हणून कार्य करतील. प्रकल्पातील विविध उपक्रम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा परिवर्तन समितीला ग्रामसभा मदत करतील. स्थानिक स्तरावर जिल्हा परिवर्तन समिती आणि प्रकल्पाशी निगडित सर्व कार्याना पाठिंबा देणे आणि मदत करणे ग्रामसभेद्वारे होणार आहे.

अशी आहेत कराराची उद्दिष्टे

यामध्ये कौशल्य विकास, क्षमता विकसन संदर्भात संसाधनांचा विकास, परस्पर ज्ञानाची देवाणघेवाण करून दोन्ही पक्षांची क्षमता वाढविण्याचा उद्देश आहे. जिल्ह्यातील वनसंवर्धन समोर ठेवून शाश्वत विकासातून वनोपजांमधील उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीसह कार्यक्षम पुरवठा साखळी तयार केली जाणार आहे. गौण वनोपजांचे विपणन, वितरण, आणि वापर यामध्ये कार्यक्षमता वाढविण्यात येणार आहे. याचबरोबर वनसंवर्धन आणि चावस्थापन योजनेचे आराखडे तयार करणे, त्यांच्या अम्मलबजावणीसाठी ग्रामसभांना सक्षम करण्यात येणार आहे.

“प्रशासन व विविध ग्रामसभांमध्ये वनाधारित सर्वांगीण विकास साधण्यासाठी सामंजस्य करार केले जाणार आहेत. याची सुरुवात आज लेखा-मेंढा या ग्रामसभेपासून आम्ही करत आहोत. या करारामुळे सहभागी ग्रामसभांचे कौशल्य व क्षमता विकासासंदर्भात कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. तसेच गौण वनोपज संदर्भात संकलनापासून साठवण ते वितरण अशा घटकांबाबत ग्रामसभांना सक्षम करण्यात येणार आहे. हा प्रकल्प लोकसहभागातून पुढे नेण्यात येणार आहे. गोंडवाना विद्यापीठाकडून ग्रामसभा स्तरावर प्रशिक्षण देण्यासाठी एक मॉडेल तयार करण्यात येत आहे. आज ऐतिहासिक स्वरूपात वन आधारित सर्वांगीण विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात होत आहे.

संजय मीणा, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा परिवर्तन समिती

” आज झालेला सामंजस्य करार हा सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांसाठी सर्वसामान्यांसाठी लाभदायक आहे. शासन आणि ग्रामसभा मिळून या प्रकल्पात काम करणार आहेत. हा निर्णय ऐतिहासिक असून याचे आम्ही स्वागत करतो.

देवाजी तोफा, अध्यक्ष, लेखा-मेंढा ग्रामसभा

“हा निर्णय ऐतिहासिक आहे. जिल्हा परिवर्तन समितीचे अध्यक्ष आणि लेखा-मेंढा ग्रामसभेचे अध्यक्ष यांच्यात सामंजस्य करार झाला. आपल्या गावांचा विकास कोणीही निवडून न देता काम करणाऱ्या ग्रामसभा वनहक्क कायद्याने तयार झाल्या आहेत. गडचिरोली जिल्हा हा देशात सर्वात जास्त वनहक्क मिळालेला जिल्हा आहे. आज झालेल्या करारातून भविष्यात प्रशासन आणि ग्रामसभा मिळून शाश्वत विकासासाठी काम करणार आहेत. याची ऐतिहासिक सुरुवात जगप्रसिद्ध लेखा-मेंढातून होत आहे.

मोहनभाई हिरालाल, वृक्षमित्र गडचिरोली

जिल्हा परिवर्तन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी संजय मीणा व ग्रामसभेकडून देवाजी तोफा यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारामुळे वनाधारित शाश्वत विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. यावेळी वृक्षमित्र गडचिरोलीचे संयोजक मोहन हिराबाई हिरालाल, डॉ. रुपेंद्रकुमार गौर, डॉ. कुंदन दुफारे, केशव गुरनुले, बाजीराव नरोटे, संदेश दुग्गा, सचिन उईके उपस्थित होते. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी व नवीन संकल्पनांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिवर्तन समिती एकल केंद्र स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्वसाधारण आदिवासी जनतेचे जीवनमान उंचाविण्यासाठी तसेच आवश्यक रोजगार निर्मितीसाठी गौण वनोपज आधारित ग्रामसभेच्या समन्वयातून पुढे जाणारी ही योजना आखण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या संकल्पनेतून यामधल्या विविध ग्रामसभांना सामाविण्यात आले आहे. जैवविविधता संवर्धन व शाश्वत विकास या संकल्पनांना सोबत घेऊन आदिवासींच्या उपजीविकेच्या उन्नतीसाठी गौण वनोपजांवर आधारित हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

नवराष्ट द्वारा प्रथम प्रकाशन, १७ फेब्रुवारी २०२२

प्रशासन व ग्रामसभा में हुआ करार
अनोखी पहल  :  लेखा-मेंढा ग्रामसभा से ऐतिहासिक शुरुआत

Also read in English Gadchiroli Admin’s Initiative for development through gram sabhas

Story Tags: , , , ,

Leave a Reply

Loading...