१२० वर्षांपूर्वी रवींद्रनाथ टागोरांनी दीनो दान ही कविता लिहिली – एका मंदिराबाबतच ही कविता होती. तिचा बंगालीतून इंग्रजीत अनुवाद बनज्योत्स्ना लाहिरी यांनी केला. तो आनंद पटवर्धनांच्या भिंतीवर वाचला. त्याचा मराठी अनुवाद
…
“या मंदिरी देव नाही,” संत म्हणाला
राजा संतप्त झाला आणि म्हणाला,
“देव नाही? संतश्री, आपण नास्तिकासारखे का बोलत आहात ?
या सिंहासनावर अमूल्यरत्नांनी जडवलेली,
तेजःपुंज सुवर्णमूर्ती विराजमान झालेली पाहता आहात आपण,
तरीही मंदिर रिते आहे म्हणता?”
“रिते नाहीं, ते तर काठोकाठ भरलेले आहे… राजाच्या अहंतेने.
या जगासमोर, हे राजाधिराज,
तुम्ही देवाला नव्हे, तर स्वतःलाच मांडले आहे.” संत म्हणाला.
कपाळावर आठ्या चढवत राजा वादला,
“दोन दशलक्ष सुवर्णमुद्रा उधळल्या मी या गगनचुंबी मंदिरावर.
सर्व पूजा-अर्चनांची आवर्तने पूर्ण केली.
आणि तुमची ही प्राज्ञा ?
या भव्य मंदिरी देव नाही म्हणता?”
संत शांतपणे उत्तरला,
“मंदिर बांधले त्याच वर्षी…
तुमच्या बीस दशलक्ष प्रजाजनांना आवर्षणाने घेरले होते;
दारिद्र्याच्या खाईत पिचलेले हे भुकेलेले, निराधार लोक
तुमच्या दारी आले, तुमची करुणा भाकत …
हाकलून दिले गेले त्यांना,
ते गेले… वाटा नेतील तिथे,
जंगलात, गुहांत आसरा शोधात पळाले,
रस्त्याकडेच्या झुडुपांच्या आधाराने राहिले,
जुन्या पडक्या देवळांत राहिले…
त्याच वर्षी, राजाधिराज, जेव्हा तुम्ही
तुमच्या देवाच्या मंदिरावर वीस लक्ष सुवर्णमुद्रा उधळल्यात.
त्याच दिवशी देवाने सांगितले…
‘माझ्या शाश्वत आलयात, निळ्यागहि-या आकाशात,
असतात लाखो दिवे उजळलेले.
माझ्या मंदिराचा पाया असतो मूल्यांनी घडलेला,
सत्य, शांती, सहानुभाव आणि प्रेम या मूल्यांचा.
हा दरिद्री, दळिद्री कवडीचुंबक
जो आपल्या प्रजाजनांना आधार देत नाही,
तो मला घर देण्याची आकांक्षा बाळगतो ?’
त्याच दिवशी देवाने तुमच्या या मंदिराचा त्याग केला.
आणि तो गेला रस्त्यावर, झाडांखाली जगू पाहणाऱ्या गरीब लोकांमध्य.
भव्य महासागरावरचा फेस जसे बुडबुडे असतात निव्वळ,
तसे तुमचे हे भकास मंदिर आहे…
संपत्ती आणि अहंतेचा बुडबुडाच केवळ.”
संतप्त राजाने गर्जना केली
“ओहो:, यःकश्चित मूर्ख प्राण्या, या क्षणी माझ्या राज्यातून चालता हो.”
संत शांतपणे उत्तरला,
“याच जागेतून तुम्ही देवाला परागंदा केलेत,
आता हेच योग्य…
देवाच्या भक्तालाही हद्दपार करा.”
…
मूळ बंगाली कविता – रवींद्रनाथ टागोर
इंग्रजी अनुवाद – बनज्योती लाहिरी
First published by World of Poems (Facebook page) on Aug. 2020
अन्य इंग्रजी अनुवाद The Impoverished Gift by Prof. Monish Chatterji