सध्याच्या विकासाच्या पर्यायांचा पाठपुरावा करण्याचा निर्धार करून ‘महाराष्ट्र विकल्प संगम’ची सांगता (in Marathi)

By डॉ. तारक काटे व अन्यonNov. 01, 2015in Society, Culture and Peace

सेवाग्राम, वर्धा

पर्यायी विकासाचा शोध घेणाऱ्या व या संकल्पनेवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या सेवाभावी संस्था व व्यक्ती यांचा अंतर्भाव असलेल्या आणि २७ ते ३० ऑक्टोबर या काळात सेवाग्राम येथे सुरु असलेल्या ‘महाराष्ट्र विकल्प संगमच्या’ चर्चासत्रांची सांगता निसर्गाची शाश्वतता आणि सामाजिक-आर्थिक समानता व न्याय यावर आधारित मानवी कल्याण साधणाऱ्या संकल्पना व पद्धतींचा पाठपुरावा यापुढेही करणाऱ्या निर्धाराच्या संदेशाने झाली.

विकल्प संगमची सुरुवात २७ ऑक्टोबरला झाली. यात शेती व अन्न, पाणी, ऊर्जा, जंगल, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन, उपजीविका, शिक्षण, समुदायांचे हक्क, बालक व महिलांचे हक्क, माध्यमे, कला, शहरी व ग्रामीण भागांचे प्रश्न अशा विविध विषयांवर काम करणाऱ्या जवळपास १२० संस्था प्रतिनिधी व व्यक्तींचा सहभाग होता. या संगममध्ये सहभागी झालेल्या जवळपास २५ पेक्षा अधिक संस्थांपैकी बहुतांशी महाराष्ट्रातील होत्या तर काही मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड व दिल्ली येथून आलेल्या होत्या. या संगमचे आयोजन महाराष्ट्रातील १८ सेवाभावी संथानी मिळून केलेलं होते त्यात धरामित्र, सोपेकॉम, पर्यावरण शिक्षण केंद्र, वृक्षमित्र, जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय, आम्ही आमच्या आरोग्यासाठी, नर्मदा नवनिर्माण अभियान, चेतन विकास, जागृत महिला समाज, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, भंडारा निसर्ग मंडळ, विदर्भ निसर्ग संरक्षण संस्था, खोज, संवेदना, प्रयास ऊर्जा गट, केकेपीकेपी, स्वच्छ आणि कल्पवृक्ष या संस्थांचा समावेश होता.

य संगममध्ये गडचिरोली, चंद्रपूर, पुणे, अमरावती आणि इतर जिल्ह्यांमधील स्थानिक आदिवासी व पंचायतीमधील समुदायांचासुद्धा अंतर्भाव होता. या जिल्ह्यांमधील व इतर जिल्ह्यांमधील सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. या संगममध्ये महिला व युवकांची लक्षणीय उपस्थिती होती.

तीन दिवस चाललेल्या या चर्चासत्रातील पहिल्या दिवशी देशभर सुरूं असलेल्या विकल्प संगमच्या प्रक्रियेविषयी व उद्दिष्टांविषयी महत्त्वपूर्ण चर्चा झाली. देशातील शेकडो संस्था व विचारी व्यक्ती सध्या प्रचलित असलेल्या विकासाच्या प्रारुपाविषयी प्रश्नचिन्ह उभे करीत आहेत व ते कसे निसर्गविरोधी, देशातील विविध संस्कृतींविरोधी आणि जनसमुदायांविरोधी आहे हे नजरेत आणून देत आहेत. विकासाच्या या प्रारुपामुळे काही श्रीमंत लोक अधिकाधिक श्रीमंत होत आहेत तर गरीब लोक मात्र गरीबच राहत आहेत. विकासाचे हे प्रारूप नैसर्गिक संसाधनांची मोठ्या प्रमाणात हानी करीत असल्यामुळे आपल्या सगळयांच्या जगण्याचा मुलभूत आधारच नष्ट होत आहे. विकल्प संगम प्रक्रियेचा उद्देश विकासाच्या या प्रचलित प्रारूपाला पर्याय शोधणाऱ्या लोकांना एकत्र आणण्याचा आहे. विकल्प संगम विकासाच्या विविध क्षेत्रातील पर्यायांवर काम करणाऱ्या अशा लोकांच्या परस्पर संवादासाठी, अनुभवांच्या आदान प्रदानासाठी आणि परस्परांपासून शिकण्यासाठी व्यासपीठ मिळवून देते, परस्पर सहकार्याने एकत्रितपणे काम काम करण्यासाठी संधी देते आणि सामुहिक प्रयत्नांतून भारतासंबंधी अशी दृष्टी विकसित करण्याचा प्रयत्न करते की ज्याचा आधार पर्यावरणीय शाश्वतता, सामाजिक न्याय व समता असेल.

इतर दोन दिवस चाललेल्या चर्चेचा विषय मुख्यत: शेतीव्यवस्थापन, जंगलव्यवस्थापन, मत्स्य व्यवस्थापन, पशुपालन, अन्नस्वायत्तता व उपभोक्ता, उपजीविका, जल व्यवस्थापन, ऊर्जा व्यवस्थापन, शिक्षण व ज्ञानार्जन, जीवनशैली, माध्यमे आणि अर्थव्यवस्था हे होते. या सर्व विषयांच्या अनुषंगाने प्रचलित व्यवस्थेतील दोष व यांना पर्यायी असलेल्या व्यवस्थेतील फायदे यावर सोदाहरण विस्तृत चर्चा करण्यात आली. शाश्वत पद्धतीने शेती व मत्स्य व्यवसाय करणारे समुदाय आणि व्यक्ती, विकेंद्रित शासन, पर्जन्यजल संकलन व त्यावर आधारित जल व्यवस्थापन, वन संरक्षण व शाश्वत पद्धतीने वनोत्पादनांचा उपयोग, सामुदायिक रेडीओसह पर्यायी माध्यमे, सहभागी पद्धतीने जमाखर्चाचे अंदाजपत्रक, निसर्ग स्नेही जीवनशैली, निसर्गस्नेही कचरा व्यवस्थापन आणि गरिबांसाठी चांगल्या प्रतीचे जीवन व उदरनिर्वाह अशा विषयांवरील महाराष्ट्र व इतर प्रदेशांमधील यशस्वी उदाहरणे देण्यात आली.

या संगम मधील सहभागींना असे ठामपणे वाटले की ग्रामीण व शहरी समुदायांना मुलभूत गरजांच्या पूर्तीसाठी स्वयंपूर्णतेची गरज आहे जी आर्थिक स्थानिकता आणि थेट व सहभागी लोकशाही ह्यांच्या स्विकारातून मिळेल की ज्यात प्रत्येक व्यक्ती निर्णय प्रक्रियेत सहभागी असेल. तसेच या सह्बह्गी लोकशाहीमध्ये महिला, दलित, आदिवासी आणि इतर वंचित घटकांच्या सबलीकरणावर भर राहील, पारंपारिक ज्ञान व सुयोग्य प्रथा याची दखल घेतली जाईल, निसर्गाच्या मार्यदांचा मन ठेवला जाईल  आणि स्थानिक पातळीवरील मन, बुद्धी व शारीरिक श्रम यांच्या समन्वयातून शिक्षणाच्या व ज्ञानार्जनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. या संगममधील सर्व सहभागींनी जोरजबरदस्तीने जमीन बळकावण्याविरुद्ध तसेच खाणकाम, मोठी धरणे यासारख्या विध्वंसक विकास प्रकल्पांविरुद्ध, समुदायामधील तेढ वाढविणाऱ्या सांप्रदायिक शक्तींविरुद्ध, अनिर्बंध नागरीकरण, खाजगीकरण आणि व्यक्तिवादीपणाविरुद्ध लढण्याचा निर्धार केला.

      विकल्प संगम प्रक्रिया केवळ चर्चा करण्यासाठी नसून व्यावहारिक कृतीशीलतेसाठी देखील असल्यामुळे सहभागींचा कुंभारकाम, सुतकताई, कला, नृत्य, संगीत आणि इतर कृतींमध्ये देखील सहभाग होता. सेवाग्राम येथील गांधीजींच्या नईतालीम तत्वावर चालणाऱ्या आनंदनिकेतन या शाळेतील मुलांनी सहभागींना यापैकी काही कलाप्रवृत्ती शिकवण्यात शिक्षकांची भूमिका देखील बजावली. काही सहभागींनी प्रतिनिधींनी वर्धा व आसपासच्या परिसरात सुरु असलेल्या शाश्वत शेती व पर्यायी शिक्षण या संदर्भातील स्थळांना भेटी दिल्या.

      महाराष्ट्र विकल्प संगम हे देशात इतरत्र आयोजित करण्यात आलेल्या ( याआधी तेलंगणा, तामिळनाडू आणि लद्दाख येथे विकल्प संगमचे आयोजन झाले) अशा संगमापैकी चौथे आहे. सहभागींनी इतर राज्यांतील संगममध्ये सहभागी झालेल्या व्यक्ती व गटांबरोबर सहकार्य करून भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी निसर्गासोबत आणि परस्परांसोबत देखील सामंजस्याने राहता येण्यासाठीची शोधप्रक्रिया पुढे नेण्याचा निश्चय केला की ज्यात कोणीही आपल्या मूलभूत गरजांपासून वंचित होणार नाही व आपण सगळ्यांसाठी समता व न्याय मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असू.

सर्व सहभागींच्यावतीने प्रस्तुत खालील व्यक्तींद्वारा

डॉ. तारक काटे, धरामित्र, ९८५०३४१११२ ([email protected])

सुहास कोल्हेकर, NAP ९४२२९८६७७१ ([email protected])

अशीष कोठारी / राशी मिश्रा, कल्पवृक्ष ([email protected])

सतीश गोगुलवार, आम्ही आमच्या आरोग्यासाठी, ९४२२१२३०१६ ([email protected])

सर्व फोटो – अशीष कोठारी

लोकमत – हलो वर्धा दैनिकाच्या २९ ऑक्टोबर २०१५ च्या अंकात या विकल्प संगम चर्चासत्राविषयी प्रकाशित केली गेलेली बातमी वाचावी, किंवा येथे पहावी.

महाराष्ट्र टाइम्सने विकल्प संगम विषयी २५ ऑक्टोबर २०१५ रोजी प्रकाशित केलेली बातमी पहावी.

हिंदी भाषेतील वर्धा-यवतमाळ भास्करने विकल्प संगम विषयी २७ ऑक्टोबर २०१५ रोजी प्रकाशित केलेली बातमी पहावी.

Story Tags: , , , , , , , , , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...
%d bloggers like this: