इमली महुआ – स्वातंत्र्याची शाळा (शिक्षण, शिकणं आणि शाळा याविषयी चिंतन) (in Marathi)

By प्रयाग जोशीonOct. 31, 2017in Perspectives

Read this perspective in English Musings on Education, Learning and Schooling in the Context of Imlee Mahuaa School

वर्तमान संदर्भ

इमली महुआ विद्यालय नावाची एक छोटी शाळा छत्तीसगढ राज्याच्या दक्षिण भागातील कोंडागाव ह्या जिल्ह्याच्या ठिकाणापासून १७ किलोमीटरवर बालेंगापारा नावाच्या शांत खेड्यात वसलेली आहे. हा भाग बस्तर या नावानं ओळखला जातो. बालेंगापारातल्या ग्रामस्थांसाठी प्रस्तुत आणि अर्थपूर्ण शिक्षणाचा पर्याय उपलब्ध व्हावा या उद्देशानं ऑगस्ट २००७ मधे ह्या शाळेची सुरुवात झाली. NIOS किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षा संस्थान) यांनी ही शाळा प्रमाणित केली आहे. राज्य सरकारच्या शिक्षण विभागातही शिक्षणहक्क कायद्याखाली शाळेची नोंद झालेली आहे. शाळेचा खर्च आणि व्यवस्थापन एक सार्वजनिक विश्वस्त न्यास बघतो.

सध्या, म्हणजे जुलै २०१७मध्ये ह्या शाळेत ४५ मुलं-मुली शिकत आहेत. सगळ्यात लहान मूल ५ वर्षांचं आहे आणि सगळ्यात मोठं साधारण १७ वर्षांचं. बालेंगापारा, कोकोडी, जगडहिनपारा आणि कोदागाव – शाळेपासून साधारण ४ कि. मी. अंतराच्या आत असलेल्या ह्या गावांतून मुलं या शाळेत येतात. ४५ पैकी २७ मुली आहेत. ४१ विद्यार्थी मुरिया ह्या जमातीची आहेत; ३ अनुसूचित जातीतील आणि १ अन्य मागासवर्गीय आहे. निर्वाह शेती वा जंगलातील किरकोळ उपज गोळा करण्यावर ४३ विद्यार्थ्यांच्या कुटुंबांची उपजीविका आहे. ह्या सर्वांचं उत्पन्न दारिद्र्यरेषेखालीच आहे. उरलेल्या दोन मुलांचे वडील राज्य सरकारच्या शाळेत काम करतात. इमली महुआ शाळा विद्यार्थ्यांकडून कुठलीही फी घेत नाही.

इमली महुआ शाळेत पहिल्यापासून सगळ्या कर्मचाऱ्यांना शैक्षणिक कार्यकर्ता हा हुद्दा असतो. यात कमीत कमी ५०% महिला असाव्यात आणि ५०% मुरिया असावेत असं धोरण आहे. कोणीही नुसतं सफाई कर्मचारी किंवा नुसतं मदतनीस नसतं. बऱ्याच महिलांनी आणि मुरियांनी शाळेत शिकवलं आहे, मात्र त्यापैकी कोणी आजपर्यंत राहिले नाहीत. आज शाळेत एकूण ३ शिक्षक आहेत, सर्व पुरुष, कोणीही मुरिया जमातीतला नाही. कुंभारकामाचे शिक्षक कोंडागावजवळच्या कुम्हारपारात राहतात. दुसरे कोकोडीत राहतात. ते बी. एड. झालेले आहेत. तिसरा शिक्षक म्हणजे स्वत: लेखक. त्यानंही बी. एड. केलं आहे. शाळा सुरू करायची या उद्देशानं तो २००७ पासून बालेंगापारातच स्थाईक झाला.

सुरुवात

‘ज्या खेड्यात वीज नाही, टेलीफोन नाही, सर्वात जवळचं इस्पितळ ९० किलोमीटरवर; तिथल्या लोकांना चांगल्या शाळेची गरज नक्कीच जाणवत असणार’ अशी लेखकाची कल्पना असल्यानं ही शाळा सुरू करण्यात आली. २००७ साली पायाभूत सुविधांची इथे उणीव होती. आज २०१७ सालीही विजेचा खेळखंडोबा चालूच आहे. आता मोबाईल वापरणार्‍यांचा उत्साही समुदाय आहे, पण आरोग्यसेवेसाठी मात्र अजूनही मांत्रिक, गुनिया आणि नोंदणी नसलेल्या कॉम्पाऊंडर मंडळींवरच लोक अवलंबून आहेत.

मे २००७ च्या एका पावसाळी दिवशी बालेंगापारातले स्त्री-पुरुष, लहान-मोठे मोठ्या संख्येनं घोटुलमधे जमले. लेखकाला या गावात शाळा सुरू करायची होती,  त्याबद्दलचं त्याचं म्हणणं त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. मग आपापसात चर्चा करून त्यांनी लगेचच होकार दिला. पण त्यांचं म्हणणं होतं, शाळेत इंग्रजी मात्र शिकायला मिळालं पाहिजे. त्यांनी सुचवलं की चांगली जागा मिळेपर्यंत घोटुलमधे शाळा भरवा. लेखकासाठी राहायला घोटुलजवळचीच एक झोपडीही त्यांनी रिकामी करून दिली.

२२ ऑगस्ट २००७ रोजी इथे शाळेचं काम सुरू झालं. घोटुलच्या आवारात एक मातीची झोपडी, सभोवती बुटक्या भिंती, लाकडी खांब आणि गवती छप्पर असलेली सर्वांनी एकत्र येण्याची एक पडवी आणि मोकळं अंगण होतं. या सगळ्याला मिळून लाकडी कुंपण होतं. २०११ पर्यंत शाळेनं याच घोटुलचा वापर केला.

वस्तीतल्या सर्व तरुण मुला-मुलींना आदिवासी जीवनाचं शिक्षण देणारी संस्था म्हणजे घोटुल. शाळेत न जाणार्‍या मुलामुलींना किशोरवयापासून लग्न होईपर्यंत इथं प्रशिक्षण दिलं जायचं. मुलंमुली जेवण झालं की इथे जमायची, ती पहाटेपर्यंत राहायची. त्यात आदिवासी संगीत-नृत्य याबरोबरच गावानं एकत्र येऊन जी जी कामं करायची असतात त्या सगळ्याचं शिक्षण मिळत असे. शेती आणि जंगलातून किरकोळ उपज गोळा करण्यावर निर्वाह अवलंबून असणार्‍या साध्या, निसर्गाशी निगडीत अशा अर्थपूर्ण जीवनासाठी त्यांची तयारी व्हायची. असं जीवन अतिशय श्रम-आधारी आणि वस्तीतल्या सगळ्यांच्या सहभागावर अवलंबून असतं. बालेंगापारातलं घोटुल एप्रिल २०१० पर्यंत व्यवस्थित चालू होतं. आता त्याची जागा गावकऱ्यांच्या सभा, लग्नातली नाचगाणी आणि पर्यटकांची करमणूक करण्यासाठी वापरली जाते. 

नाव आणि अभ्यासक्रम

शाळेचं नाव सुरुवातीला ‘इमली महुआ नई तालीम शिक्षण केंद्र’ असं लांबलचक होतं. ‘नई तालीम’ हे शब्द लेखकाचा गांधी विचाराकडील कल दर्शवत होते. इमली आणि महुआ ह्या दोन वृक्षांना बस्तर आदिवासींच्या संस्कृतीत अतिशय आदराचं स्थान आहे.  त्यांच्या संस्कृतीत, स्वयंपाकात, श्रद्धांत, विधींत, उदरनिर्वाहात –  सगळ्यात ह्या वृक्षांना मानाचं स्थान आहे. ते प्रतिबिंबित करण्याच्या उद्देशानं ती नावं. दोनच वर्षात शाळेतली मुलं आणि प्रौढ, शालेय शिक्षण, शिकणं आणि शिक्षण यांचं अन्वेषण करू लागले. त्यात मोकळेपणा होता, स्वतःला दोषदर्शन होतं, परिसराचा संदर्भ, स्वतंत्र विचार, उत्क्रांत दृष्टिकोनही होता. या अन्वेषणात नई तालीमचीही तपासणी झाली. त्यामधले प्रस्तुत घटक कायम ठेवले, बाकी सोडून दिले. शिवाय लहान मुलांना एवढं लांबलचक नाव लक्षात ठेवणं कठीण वाटायला लागलं होतं. मग २०१२ मधे इमली-महुआ विद्यालय असं सुटसुटीत नाव निश्चित झालं.

श्रम-आधारित काम, कला, क्रीडा आणि अध्ययन या सर्व गोष्टींना समान महत्त्व आणि वेळ देऊ शकेल अशा अभ्यासक्रमाची व वेळापत्रकाची रचना शाळेतल्या प्रौढांनी केली. यासाठी लागणारी आर्थिक, भौतिक, मानवी संसाधनं उपलब्ध करून दिली. मुलांच्या बौध्दिक, मानसिक, शारीरिक प्रगतीबरोबर त्यांच्या सौंदर्यानुभवाचाही विकास सुकर करणं असाच त्यांचा उद्देश होता. शाळेत मुलांचं स्वागत करणारं मित्रत्वाचं वातावरण नेहमी ठेवलं. तिथे भीती आणि शिक्षेला कधीही स्थान नव्हतं. नीतीमूल्यांना धरून शिक्षण, स्पर्धा आणि परीक्षा यांनाही शाळेत कधी वाव मिळाला नाही. पुढे इथल्या शालेय जीवनात स्वातंत्र्य, जबाबदारी, परिणाम आणि सर्वसंमतीनं निर्णय घेण्याच्या प्रक्रिया जोडल्या गेल्या. तेव्हापासून सर्व मुलांनी आणि प्रौढांनी अभ्यासक्रमातले सर्व घटक आपापल्या वैयक्तिक गरजांनुसार निवडायला सुरुवात केली.

या अभ्यासक्रमामुळे वा अशा शालेय जीवनामुळे  विचक्षण, खुल्या, रूढ आचार-विचारांशी जुळवून न घेणार्‍या, स्वतंत्रपणे आचार व विचार करणाऱ्या, अंतर्दृष्टी असलेल्या, बुद्धिमान, कुठल्याही ठरावीक साच्यात न बसणाऱ्या मुलांच्या आणि प्रौढांच्या मुक्त मनाचं संगोपन व्हावं, अशी उमेद लेखकानं बाळगलेली आहे. 

या शाळेची भाषा कुठली?

‘शाळेत एकमेकांशी बोलताना विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी कुठली भाषा वापरावी? अमुक एका भाषेच्या निवडीमुळे शाळेतलं वातावरण बदलेल का? मुलांना या शाळेत इंग्रजी शिकायला मिळावं ह्या पालकांच्या इच्छेला कसा न्याय द्यायचा? मुलांच्या मातृभाषेचा शाळेची अधिकृत भाषा ठरण्यात काय भाग असावा? मुलांना अवगत असलेल्या भाषेतली अभ्यासाची पुस्तकं नसतील तर काय करायचं? माध्यमिक स्तरावरच्या परीक्षा कुठल्या भाषेत घ्याव्यात?’ दोन विद्यार्थी आणि तीन शिक्षक घेऊन जेव्हा २००७ च्या ऑगस्टमधे शाळा सुरू झाली तेव्हाच हे प्रश्न डोकं वर काढू लागले होते.

हल्बी आणि गोंडी या दोन भाषा इथल्या मुलांना येतात. या भाषांना स्वत:ची लिपी नाही आणि या भाषांमध्ये जवळपास काही पुस्तकंही मिळत नव्हती. सुरुवातीच्या तीनही शिक्षकांना या भाषा येतच नव्हत्या. त्या भाषा शिकून घ्यायला शिक्षकांना अजून वेळ मिळालेला नव्हता. तेव्हा सोय म्हणून आणि पालकांच्या इच्छेचा आदर म्हणूनही इंग्रजी भाषा हे माध्यम बरं पडेल असं ठरलं. मुलांना इंग्रजीत अगदी ‘बुडवलं’ तर ती इंग्रजी शिकतीलच असं सर्व शिक्षकांना वाटलं. आणि या कल्पनेला चांगलं यशही मिळालं, पण ते पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी मात्र इंग्रजी बोलू शकणारे दोन शिक्षक शाळा सोडून गेले. मग त्याऐवजी स्थानिक शिक्षक कामावर घेतले.  विद्यार्थ्यांची संख्या १५ पर्यंत वाढली.  त्यांना  सगळ्यांना हल्बी भाषा येत होती. इंग्रजी येत नव्हतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजीत ‘बुडवणं’ अशक्य झालं.

त्यानंतरचे सर्व शिक्षक स्थानिक होते. लेखकानं लवकरच हल्बी शिकून घेतली. मग लेखकासकट सगळे हल्बीच वापरू लागले. इंग्रजी शिकण्याचं आकर्षण संपलं होतं. मुलांना आणि स्थानिक शिक्षकांना रोजच्या आयुष्यात इंग्रजीचा काही उपयोगही दिसत नव्हता. मग इंग्रजीचा आटापिटा संपला. शिवाय हिंदी भाषा हल्बीला जवळची. त्यामुळे काही मुलं हिंदी शिकली, मोठी मुलं देवनागरीत छान लिहू लागली, देवनागरीतली पुस्तकं वाचू लागली; मग काही वर्ष हिंदीच शाळेची भाषा ठरली. २०१० साली जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्याकडे हिंदी माध्यमाची शाळा म्हणून नोंद झाली. पण तरी मुलं गरजेप्रमाणे आणि आवडीनुसार हिंदीव्यतिरिक्त इतर भाषाही वापरत असत. हल्बीचा वापर मुलांना जास्त आवडत असे त्यामुळे २०१६ मधे शिकवण्याचं माध्यम म्हणून हल्बीची नोंद झाली.

मुलं आणि शिक्षक हल्बीचा उपयोग करू लागल्यापासून त्यांच्यातलं संभाषण किती कसदार झालं हे पाहाणं मनोज्ञ होतं. लेखकासारखे तितकीशी हल्बी न येणारे असले तर संभाषणाचा दर्जा तितका मनोरम नसे. समान संस्कृती हेच त्या संभाषणांच्या रसपूर्णतेचं कारण असणार.

पण अलीकडे शिक्षक आणि विद्यार्थी या सर्वांनी विनंती केल्यामुळे लेखकानं एकट्यानं शक्य तेवढा इंग्रजीचा ‘पूर’ आणण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू केले आहेत. या पुराची संपूर्ण रचना इतकीच आहे की लेखक शाळेत सगळ्यांशी फक्त इंग्रजीमध्ये बोलतो. बाकीचे त्यांना सोयीचं वाटेल त्या कुठल्याही भाषेत प्रतिसाद देतात. ज्यांना चांगलं इंग्रजी समजतं ते इतरांना समजावून देतात. बरीच मुलं इंग्रजी पुस्तकं आणि शब्दकोश वगैरे वापरून अभ्यास करतात. इंग्रजी शिकवण्याचे वर्ग चालू राहावेत अशी मागणी मुलांनी मासिक सभांमधे केली आहे. यामधून त्यांचं बोलणं, वाचणं, लिहिणं, समजावून घेणं, शब्दकोश पाहणं, उच्चार ही कौशल्यं सुधारत आहेत.

हिंदी ही परीक्षांची भाषा आहे. पण मुलं आपल्या पालकांसाठी त्यांच्या शालेय कामाचा अहवाल आणि त्यांची दैनंदिनी हल्बीत, देवनागरीत तयार करतात. लेखकाशी हिंदीत आणि अन्य दोन शिक्षकांशी हल्बीत बोलतात. ३३ मुलं गोंडी भाषक आहेत. ती गोंडीचा आपापसात वापर करतात. रोजच्या बोलण्यात विद्यार्थ्यांमध्ये हिंदीचा वापर फारसा होत नाही. मात्र सभांमध्ये हिंदी आणि हल्बी असा दोन्हींचा वापर होतो. सभेच्या कामकाजाचा अहवाल हिंदी किंवा हल्बीत लिहिला जातो. उत्तराखंडातील मुन्सियारी गावातली ‘जंगली शाळा’ आणि कौसानीमधली ‘लक्ष्मी आश्रमशाळा’ इथल्या मित्रांना पत्रं हिंदीत लिहिली जातात. शाळेच्या वार्षिक संमेलनात, शाळेत वापरल्या जाणाऱ्या चारही भाषांमधे मुलं कार्यक्रम बसवतात, शक्य त्या सर्व भाषांचा वापर करून कविता म्हणणं, गोष्टी सांगणं, नाटकं बसवणं हे सर्व प्रकार अतिशय उत्साहानं करतात.

तर अशा तऱ्हेनं ही शालेय शिक्षणशास्त्राच्या  भाषेबद्दलच्या आदेशांचा मागमूसही नसलेली एक मुक्त जागा झालेली आहे. भीतीमुक्त वातावरण तयार होण्यासाठी भाषा हा प्रश्न अगदी हलक्या हातांनी सोडवायला व धरायला हवा हे प्रौढांच्या लक्षात आलेलं आहे. घरची भाषा हे लहान मुलांचं एकमेव साधन असतं. मातृभाषेखेरीजच्या दुसऱ्या भाषा वापरताना चुका होणारच. तेव्हा अशुध्द भाषा म्हणून हिणवायचं नाही. भाषेबद्दलचा कुठलाही आग्रह, सूचनांचा मारा नसला, तिच्या वापराबद्दलचं वास्तविक व संपूर्ण स्वातंत्र्य असलं तरच मुलं उत्सुकतेनं नवीन भाषा शिकतात, नवीन भाषा वापरून अनेक प्रयोग करतात.

आनंद, स्वातंत्र्य, जबाबदारी आणि परिणाम

एक परिपूर्ण अभ्यासक्रम शाळेत नीट राबवायचा, तर शाळेतला दिवस खूप मोठा होणार आणि मुलांचा घरातला वेळ कमी होणार हे लवकरच लक्षात आलं. दुसऱ्या वर्षापासूनच सोमवार ते शनिवार रोजचे ९ तास आवश्यक होते. आठवडी बाजाराला जाता यावं म्हणून शुक्रवारी शाळा अर्धा दिवस असते. उन्हाळ्यात एक महिना सुट्टी असायची. अधूनमधून येणाऱ्या सणांचीही सुट्टी असायची.    

प्रत्येक गटात सर्व वयाची मुलं असतील अशा प्रकारे मुलांची गटवार विभागणी केली होती. प्रत्येक गटाचं आठवड्याचं वेळापत्रक ठरलेलं होतं. त्यात सर्व प्रकारच्या कामांचा समावेश होता. शाळा झाडणं, पाणी आणणं, भाजीपाल्याची लागवड, स्वयंपाक, सूतकताई, भरतकाम, ग्रंथालय सांभाळणं अशी कामं आणि सर्व विषयांचा अभ्यास, स्वैर संभाषण, कुंभारकाम, गाणं, नाच वगैरे प्रयोगाधारित कला, चित्रकला आणि रंगकाम, गोष्टी सांगणं आणि भटकंती, योगासनं, खेळ आणि छोट्या सहली असं सगळं त्या वेळापत्रकात होतं. काही गोष्टी गटात करायच्या होत्या, काही सर्वांनी एकत्र बसून.

रोज ९ तास एकत्र राहिल्यानं सर्वांची आपापसात घट्ट मैत्री झाली होती. पण घरी जाऊन काम करावं लागणाऱ्या मुलांना हे डोईजड व्हायला लागलं. मुलं कधीच एकटी नसायची, नेहमी गटातच काम चालायचं.  शिक्षकांनी ठरवलेलं वेळापत्रक,  मुलांनी वेळेवर शाळेत यायला पाहिजे ही अपेक्षा आणि मुलांच्या गरजा आणि क्षमता यांचा मेळ काही बसेना. मुलांना घरी असणाऱ्या स्वातंत्र्याशीही हे सुसंगत नव्हतं. या परिस्थितीशी ज्यानं त्यानं आपापल्या कुवतीनुसार सामना केला.

आदिवासी घरांमधे मुलांना लहानपणापासून बरंच स्वातंत्र्य असतं. अमुक एक काम मुलांनी केलंच पाहिजे किंवा अमुक गोष्ट करता कामा नये असा पालकांचा आग्रह नसतो. मुलाकडे अगदी आवश्यक तेवढंच लक्ष पुरवून त्यांचे आईबाप आपल्या कामात व्यग्र असतात. आसपास मुलं खेळत असतात. मुलांना आपणहून एखाद्या कामात रस दिसला तर त्यांच्यासाठी त्या कामाला लागणारी अवजारं- छोटी कुऱ्हाड किंवा गलोल यासारखी- आणली जातात. मुलांना कामाची सक्ती केली जात नाही. हे शक्य होतं, कारण मुलांची खेळण्या-वावरण्याची ठिकाणं घराजवळ आणि म्हणून सुरक्षित असतात. मुलांनी शाळेत जावं अशी सक्तीही आदिवासी पालक करत नाहीत. शाळा आवडली नाही म्हणून मूल शाळेत जायला नकार देत असेल तर ‘नको जाऊ’ म्हणतात. असं स्वातंत्र्य नसणाऱ्या शाळेत जायला मुलं नाखूष असणार हे उघडच आहे.

मुलांच्यात अस्वस्थता आणि शाळेबद्दलचा कंटाळा वाढत चाललेला लेखकाला जाणवत होता. हजेरी कमी होऊ लागली होती. वर्गात एका जागी बसून शिकवण्याकडं लक्ष देणं कमी झालं होतं. मुलं वाढत्या संख्येनं लवकर घरी जायची परवानगी मागायला येऊ लागली. दुर्मुखल्या चेहर्‍यांची संख्या पूर्वी कधी नव्हे एवढी वाढू लागली. शाळा आवडते असं म्हणणारी मुलं कमी झाली. तातडीनं काहीतरी करायला हवं होतं.

सूरजमुखी ह्या वयानं सर्वात मोठ्या मुलांच्या गटाबरोबर एकदा काम सुरू होतं, एवढ्यात लेखकाला कुठल्यातरी कार्यालयीन कामासाठी गट सोडून बाहेर जावं लागलं. परत आल्यावर बघितलं तर सर्वांनी वेळेचा चांगला उपयोग केला होता. दंगामस्ती  गडबड काहीही झालं नव्हतं. कोणी अभ्यास केला, कोणी खेळले तर कोणी झोप काढली. पण दंगा नव्हता. सर्वांनी अगदी हसतमुखानं स्वागत केलं. ह्या अनुभवातून शिकून त्यांना अधिकाधिक वेळ त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी करण्यासाठी लेखकानं द्यायला सुरुवात केली. मुलं जबाबदारीनं वागत होती. आनंदात असल्याचं दिसत होतं. मग सूरजमुखीची मुलं लेखकाबरोबर त्यांचं आठवड्याचं वेळापत्रक ठरवण्यात भाग घेऊ लागली. कुठल्याही प्रौढाच्या देखरेखीशिवाय संबंध दिवस शाळेत छान रमून राहू लागली.

पूर्ण हजेरी, वक्तशीरपणा आणि आनंदी चेहरे हे सूरजमुखीचं वैशिष्ट्य इतरांना जाणवू लागलं.

आता या मुलांसारखं सगळ्यांनाच स्वातंत्र्य मिळावं का? त्यांच्या पालकांची प्रतिक्रिया काय येईल? मुलांनी नक्की किती वेळ शाळेत घालवावा? कसा घालवावा? शाळेत किती वाजता यावं आणि घरी किती वाजता जावं? आणि मुलं सगळं स्वत:चं स्वत: करू लागली तर शिक्षकांनी काय करायचं? आठवड्याची सुट्टी कोणत्या दिवशी असावी? मोठी सुट्टी केव्हा असावी? हजेरी आणि वक्तशीरपणाला किती महत्त्व द्यावं? शिक्षक आणि मुलांना शाळेकडून मिळणारे लाभ केवळ हजेरी आणि वक्तशीरपणा या दोन गोष्टींवरच अवलंबून असावेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोणी ठरवायची? थोडक्यात निर्णय प्रक्रिया कशी असावी?  

सगळ्यांनी ह्या प्रश्नांवर खूप खल केला. मग ठरलं की प्रत्येकाला एक मत या प्रकारे लोकशाही पध्दतीनं मतदान करून निर्णय घ्यावेत. आपला शाळेतला दिवस कसा घालवायचा हे ठरवण्याचं स्वातंत्र्य लहान मुलांना हळूहळू द्यावं असं ठरलं. अन्य सर्व उत्तरं ही लोकशाही पध्दतीनं मतं घेऊन ठरवली आणि नोंदवली गेली. ते वर्ष होतं २०१५. तेव्हापासून प्रत्येक विद्यार्थी दररोज आपण काय करायचं ते ठरवत आलेला आहे. मात्र मुलं त्यांच्या वेळेचं नियोजन कसं करतात, कुठल्या गोष्टीला किती वेळ आणि का देतात, याचं कुठलंही निश्चित स्वरूप आमच्या लक्षात आलेलं नाही. मात्र मुलं आपण निवडलेल्या गोष्टीत दिवसभर मग्न राहतात एवढं खरं!

मुलांना हे स्वातंत्र्य खूप आवडतं, हे त्यांच्या पालकांना अनेक सभांच्या वेळी सांगितलं. नव्यानं येणाऱ्या मुलांच्या पालकांना प्रवेश घेण्यापूर्वी या स्वातंत्र्याची कल्पना दिली जाते. पालकांनाही ते आनंदानं मान्य असतं.

मार्च २०१७ मध्ये ६० पैकी १५ मुलांनी आमच्या शाळेतून नावं काढून घेऊन  कोकोडी गावातल्या सरकारी शाळांमधे प्रवेश घेतला. यातली १४ मुलं कोकोडीत (राज्य-महामार्गाजवळ) राहणारी होती. यातल्या लहान वयाच्या मुलांना या शाळेत आणणारं कोणी नाही हे एक कारण होतं.  आमच्या शाळेत पुरेशा संख्येने शिक्षक नाहीत या कारणानं एकजण गेला, तर दुसरा एक त्याचा मित्र जातोय म्हणून गेला. अशीही शक्यता आहे की पूर्ण स्वातंत्र्याच्या वातावरणात आपला पाल्य ‘काहीच’ शिकत नाही असं त्या पालकांना वाटलं. यात गंमतीचा भाग म्हणजे सरकारी शाळेमध्ये काम करणारे आमचे पालक त्यांच्या मुलींना आमच्या शाळेत अजूनही पाठवतात.

आमचं स्वातंत्र्य आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतंय्, ती म्हणजे आपल्यासाठी असलेले निर्णय आपणच घ्यायचे, त्या निर्णयांना आपण जबाबदार रहायचं आणि वेळेचा नीट वापर करायचा.

मुलं जिथं फारच कमी पडतात, तेवढ्याच बाबतीत प्रौढांकडे मदत मागतात. यावरून ती फार चलाखीनं आणि हुषारीनं निर्णय घेतात हे दिसतं. आयुष्यात पुढे उपयोगी पडेल म्हणून काहीही शिकायला अगदी लहान वयाची मुलं नेहमी नकार देतात. किंवा काही विशिष्ट करीअरसाठीचं शिक्षण इथे आपल्याला मिळणार नाही, या कारणानं काही मोठ्या मुलांनी ही शाळा सोडलेली आहे. जसजशी मुलं मोठी होतात तसतशी सरकारी परीक्षा पार करावीशी वाटली तर, ती शैक्षणिक स्वरूपाच्या विषयांना जास्त वेळ देऊ लागतात. कोणत्या करिअरसाठी कुठल्या विषयांचा जास्त अभ्यास लागेल, सरकारी परीक्षा कशासाठी गरजेची आहे,  ते त्यांना बरोबर समजतं. चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकेल असा अभ्यासक्रम निवडण्याच्या पालकांच्या दबावाला ती बळी पडत नाहीत, अगदी निर्वाह शेती हे जीवितकार्यही निवडतात; आणि कधी कधी आमच्याच शाळेत शिकत राहण्याच्या त्यांच्या इच्छेसाठी, सरकारी परीक्षा देण्याचं त्यांच्या पालकांना कबूलही करतात. या सगळ्या निर्णयप्रकियेत त्यांच्या हुशारी, स्वेच्छा, जबाबदारी, आत्मविश्वास आणि चातुर्य या गुणांचं दर्शन होतं.   

आम्ही स्वातंत्र्य या विषयावर त्याच्याबरोबर येणारी जबाबदारी आणि परिणाम याबद्दल पुरेशी खोल आणि साकल्यानं चर्चा अद्याप करू शकलेलो नाही. कारण सध्या लहान मुलं जास्त संख्येनं आहेत आणि ही बौध्दिक, अमूर्त चर्चा त्यांना सहजपणे मानवणार नाही असं वाटतं. मात्र वेळोवेळी होत असलेल्या निर्णयांची अगदी सांगोपांग चर्चा आम्ही करतो. मग तो पावसाळ्यात ओल्या झाडांवर चढण्याचा विषय असो की घराभोवतीची भिंत बांधण्याच्या कामात मदत करण्यासाठी काही दिवस गैरहजर राहाण्याचा असो;  बराच काळ गोट्या खेळण्यात गढून जाण्याचा असो की सगळे मित्र  लांबच्या सहलीला निघाले असताना तिच्यात भाग न घेण्याचा असो. हे निर्णय विचारपूर्वक घेऊन त्यांचे परिणाम स्वीकारायला आम्ही शिकतो आहोत.

काम

कष्टाच्या कामांसाठी वेगळी नोकर माणसं नेमायची नाहीत, असा एक निर्णय आम्ही शाळा सुरू करतानाच घेतला होता. सर्व प्रौढांनी आणि विद्यार्थ्यांनीच ही कामं करायची असं ठरवलेलं होतं. शिवाय कोणाचं वय, शिक्षण, अनुभव कितीही कमी किंवा जास्त असो, सगळ्यांना एकच पगार मिळणार होता. आमच्यावर या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची वेळ कधी आली नाही.

आमचा दिनक्रम जसजसा बदलत गेला तसतशी कामं बदलत गेली. मुख्यतः ती रोटी, कपडा, मकान यासाठीची कामं आणि काही शालोपयोगी कामं असतात. त्यामध्ये  भाजीपाला पिकवणं, धान्य-भाज्या आणणं, पाणी भरणं, स्वयंपाक, केरवारे, अन्नाचं वाटप, आवाराची स्वच्छता नि डागडुजी, नव्या वर्गखोल्या बांधणं, सूतकताई, कपड्यांची दुरुस्ती, रुमालांवर भरतकाम, मातीची भांडी आणि खेळणी घडवणं, शेतातून माती आणणं, वाचनालयातल्या पुस्तकांना कव्हर घालणं, वाचनालय सांभाळणं, शिकवणं, बँकेची कामं, हिशोब लिहिणं, अहवाल  कागदपत्र तयार करणं व सांभाळणं अशी कामं असतात.

सध्या आमची अंदाजे २५ % मुलं युवावस्थेतली असल्यानं पुढं त्यांच्या ग्रामीण आयुष्यात उपयोगी पडतील अशी, आर्थिक स्वावलंबनास उपयुक्त कौशल्यं शिकवण्यावर आमचा भर आहे. अन्नपदार्थ तयार करणं, ते टिकवण्यासाठी करण्याच्या प्रक्रिया, कंपोस्ट खत, रोपवाटिका, सुतारकाम, शिवणकाम, विजेचं वायरिंग आणि दुरुस्ती, अशी कामं शिकणं सुरू आहे.

शाळेत आम्ही सगळेच ही कामं मनापासून करत असतो आणि काम चालू असताना मनमोकळ्या गप्पाही मारत असतो. पण मुलं आणि शिक्षकसुध्दा कधीही स्वत: होऊन कामं काढत नाहीत. मुलांना त्यांच्या इच्छेवर सोडल्यास सर्व वयाच्या मुलांची पसंती खेळ आणि भटकंती यालाच असते. मग त्यात त्यांच्या स्वतःच्या मूलभूत गरजाही बाजूला पडतात. एकदा शाळेच्या रोजच्या स्वच्छतेच्या कामासाठी  कोणकोण तयार होतंय ते मुद्दाम बघितलं तर १४ वर्ष वयाच्या दोन मुली आणि एक प्रौढ सोडता कोणीही तयार नव्हतं. मुलांची कामाप्रतीची ही भावना विचार करायला लावते. अशा पार्श्वभूमीवर मुलांना कामाची सक्ती करायला लावणं कितपत बरोबर आहे हाही प्रश्नच आहे. शाळेत अशी सक्ती करायची नाही अशा निर्णयाला आम्ही आलो आहोत.

एकत्र येऊन निर्णय

शाळेसंबंधी सर्व बाबींच्या निर्णयात सर्वांचा सहभाग असावा असा आमचा पहिल्यापासूनच प्रयत्न आहे. अगदी सुरुवातीला प्रौढ मंडळी चर्चा करत असू. लवकरच त्यात मुलांना सामील करायला सुरुवात केली. स्थानिक कार्यकर्त्यांना या पध्दतीची सवय नव्हती. त्यांना आपलं मत मोकळेपणी मांडायची सवय व्हायला बरीच वर्ष लागली. मुलांनाही ते हळूहळूच जमलं. अजूनही आपला विचार सर्वांसमक्ष करणं, तो मांडणं आणि त्या मागची कारणमीमांसा पुढे ठेवणं ही गोष्ट त्यांना थोडी कठीणच जाते. आपण होऊन काही प्रश्न उपस्थित करणं ही लांबची गोष्ट.

काही थोड्या लोकांनाच प्रश्न उपस्थित करून उत्तराच्या अनेक शक्यता वस्तुनिष्ठ पध्दतीनं मांडण्याचं काम करावं लागतं. मात्र हात वर करून आपलं मत दर्शवणं उत्साहानं पार पडतं. लहान वयाच्या मुलांनाही मत द्यायचा तेवढाच अधिकार असतो. बहुमतानं आलेला निर्णय घेतलाच पाहिजे अशी पद्धत नाही. अल्पमताचासुद्धा विचार करायचाच असतो. पण शक्यतो आम्ही एकमतानं निर्णय घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. तसं नाही झालं तरी प्रत्येकाच्या मताचा विचार होईल असा प्रयत्न असतो. ते शक्य होत नाहीये असं दिसलं तर निर्णय लांबणीवर टाकतो. सर्व निर्णयांची कागदोपत्री नोंद होते. दर वेळी अध्यक्ष म्हणून निवडलेल्या वेगळ्या विद्यार्थ्याची त्यावर सही होते. पुढच्या सभेत तो निर्णय वाचून पक्का केला जातो. अशा पध्दतीनं गेल्या काही महिन्यात पुढील निर्णय झाले –

१. वेगवेगळी कामं करत किमान एक तास सर्वांनी एकत्र घालवायचा.

२. शाळेत ज्यांनी निदान ३ वर्ष काढली आहेत अशा किमान १२ वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांसाठीच सायकली विकत घ्यायच्या.

३. शिष्यवृत्ती आणि हजेरी यांचा एकमेकांशी संबंध नको.

४. २०१६-१७ या शालेय वर्षापुरती उन्हाळ्याची सुट्टी रद्द करावी.

५. शाळा भेटीसाठी येणाऱ्या पाहुण्यांनी निदान एक आठवडा राहायला हवं.

सध्या आम्ही शाळेत कुठल्या दिवशी, कुठल्या वेळात यावं आणि त्या वेळी कायकाय करावं हे आपलं आपण ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य घेतलं आहे. आता शाळा सोमवार ते शनिवार १० ते ४ असेल, त्यातील ११ ते १ हा वेळ सर्वजण एकत्र असतील, असं एकमतानं ठरलं आहे. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला त्या महिन्यातले ‘अभ्यासाचे वर्ग’ ठरतील. ते ‘वर्ग’ कसे चालवायचे तेही सर्वानुमते ठरेल.

मुलं आणि प्रौढ सर्वजण मांडणी करू शकत नसले तरी सर्वजण मनापासून नीट ऐकून घेतात. आणि प्रत्येकाची गरज लक्षात घेऊन सर्वांचा विचार करणारी भूमिका ठरवतात. सुरुवातीला घेतलेली भूमिका बरोबर नव्हती असं वाटलं तर बदलायला लाजत नाहीत. अंतिम निर्णयात तेवढ्याच मनापासून सहभागी होतात. 

शाळा, समाज, शिकणं आणि शिक्षण

आम्हाला दिवसेंदिवस ही जाणीव प्रकर्षाने होते आहे की आमच्या कामाचं स्वरूप हे पालकांच्या अपेक्षा, आमच्या क्षमता आणि प्रत्येकाची आवड  निवड याच्या ताळमेळातून ठरणार आहे. बऱ्याच पालकांची अपेक्षा आहे की मुलांना हिंदी आणि इंग्रजी भाषा चांगल्या याव्यात आणि सरकारी परीक्षा पास होण्याएवढी तयारी शाळेत व्हावी. त्याशिवाय भविष्यात चांगला रोजगार मिळण्यासाठी उपयुक्त अशी कौशल्यं आणि गुणवत्ता शाळेतून मिळावी.

मुलांच्या अपेक्षा, प्रत्येकी वेगवेगळ्या आहेत आणि त्या मुलांच्या वाढत्या वयाबरोबर बदलतही राहातात. २०१७ च्या जानेवारीत आम्ही मुलांना ती शाळेत नेहमी करत असलेल्या गोष्टींपैकी सर्वात जास्त आवडणाऱ्या ३ गोष्टींची नावं घ्यायला सांगितली. खेळ आणि गोष्टीच्या पुस्तकाचं वाचन हे सर्वात आवडते उद्योग होते. घसरगुंडी, वाळूत खेळणं, बुध्दिबळ, गोट्या, कॅरम आणि ‘नमकचोर’ हे खेळ त्यांना जास्त आवडतात तर पेटी, बासरी, तबला वाजवायला शिकणं, गोष्टींची पुस्तकं आणि कोश वाचणं, इंग्रजी वाचायला शिकणं, सायकल चालवायला शिकणं आणि पावसात भटकणंही खूप आवडतं. प्रौढांच्या तुलनेत मुलं त्यांच्या वर्तमानात जगत असतात आणि त्याच्याशीच त्यांना घेणं असतं.

पालक व मुलं या दोन भागधारकांच्या या टोकाच्या अपेक्षांना कसं पुरं पडायचं हा नेहमीच आमच्या चर्चेचा विषय असतो. त्यातूनच दर वेळी मार्ग काढावा लागतो. उदाहरणार्थ पालकांच्या विनंतीनुसार आम्ही मुलांना गृहपाठ द्यायला लागलोय. पण त्याची सक्ती नाही हे पालकांना आणि मुलांना माहिती आहे. गृहपाठ तपासून तो केलाय का आणि कितपत चांगला केलाय हे पालकांना कळवलं जातं. गृहपाठ देण्याच्या सत्रात बरीच मुलं तो स्वीकारतात आणि बरीच स्वीकारतही नाहीत. मुलांचं स्वातंत्र्य आणि आनंद याला ढळ न पोचवता पालकांच्या अपेक्षांना पुरं पडण्याचा असा मध्यममार्ग आम्ही तयार केलाय.

“तुम्ही शाळेत अभ्यासाचे तासच मुळी घेत नाही तर मुलं तुमच्या शाळेत काही शिकतात तरी का?” असा प्रश्न नेहमी येतो.

काय आणि कसं शिकतात ती?

आमच्या मुलांकडे इतर शाळांमधल्या मुलांसारखीच माहिती, कौशल्य आणि अनुभव आहेत. प्रश्न विचारणं आणि त्यांची उत्तरंही स्वत:च शोधणं हे ती पुस्तकं वापरून, वर्गात बसून, सहलींमधून, खेळांमधून, भोवतीच्या मित्रांकडून आणि प्रौढांकडून शिकतात, शिवाय शोधक अनुभवांमधून आणि भवतीच्या जगातूनही शिकतात. काय शिकायचं, काय नाही, कोणाकडून, कुठं हे स्वत:च ठरवत ती जास्त जास्त स्वावलंबी होत आहेत.

अजून एक प्रश्न आम्हाला नेहमी विचारला जातो.  “इमली महुआतले विद्यार्थी पुढे मोठं झाल्यावर ‘मुख्य प्रवाहात’ कितपत मिसळू शकतील?” आमच्याकडे बरीच उत्तरं आहेत : एक म्हणजे ‘मुख्य प्रवाहात’ असंख्य वेगवेगळे प्रवाह असतात, तसाच आमचाही एक प्रवाह आहे. दुसरं म्हणजे, गेल्या दहा वर्षात ७५ मुलं शाळेतून बाहेर पडली आहेत आणि जवळच्या मोठ्या शाळांमधे गेली आहेत. तिथे त्यांची उत्तम प्रगती झाली आहे. आणि तिसरं असं की आमच्यातल्या काहींना असं वाटतं, अगदी तीव्रपणे वाटतं की तथाकथित मुख्य प्रवाहात मिसळण्याच्या फंदात आमच्या मुलांनी पडूच नये. उलट त्यांच्या जीवनामुळे मुख्य प्रवाहालाच काही खास दिशा मिळेल!

आमच्या शिक्षणाचा प्रश्न मात्र आम्हाला सचिंत करतो. हा प्रश्न फार थोड्यांनी आम्हाला विचारला. मुळात शिक्षण म्हणजे काय, ह्याबद्दल विचार केल्यावर वाटतं की आपण कसे घडलो आहोत, कसा विचार करतो, आपल्या भावना, आपला स्व, आपला इगो, अहंकार आणि त्याचे चतुर आणि चलाख आविष्कार; तसंच जगातल्या प्रत्येक गोष्टीशी असलेलं आपलं नातं हे सगळं जाणून घेणं, त्याबद्दल सतर्क असणं आणि बुद्धिमानपणानं रास्त कृती करू शकणं म्हणजे बहुतेक शिक्षण असावं!

आमच्या भोवती असलेली माणसं निसर्गाच्या खूप जवळ राहतात; त्यांना परंपरेनं निसर्ग समजलेला आहे. निसर्गाशी सुसंवाद राखत ती जगतात, अनेक शतकं ती निसर्गाशी सुसंगतपणे राहिलेली आहेत. जगाच्या पसाऱ्यातलं माणसाचं अस्तित्व किरकोळ आहे, याचीही त्यांना समज आहे. त्यांच्या गरजा साध्या आहेत. काहीही जमा करून साठवून ठेवावं अशी त्यांची वृत्ती नाही. त्यांना निसर्गाबद्दल सुज्ञ जाणीव आणि आदर आहे. उदा. हे लोक गुरं पाळतात पण त्यांचं दूध काढत नाहीत. ते दूध वासरांसाठी ठेवलं जातं. कोंबड्या मारून खाल्ल्या जातात, पण त्यांची अंडी खाल्ली जात नाहीत. बाजारात मिळणारी अनुत्पादक अंडी मात्र खातात. झाडं विकण्यासाठी पाडत नाहीत, घर बांधण्यासाठी गरज असेल तरच पाडतात.

ही माणसं एकमेकांबरोबर शांततेत राहतातच. पण त्यांना स्वत:शी शांत राहणंही जमलेलं आहे. कधीकधी दारूच्या नशेत भांडले तरी नशा उतरल्यावर त्यांचं परत एकमेकांशी छान जुळतं. कुटुंबांमध्ये शत्रुत्व राखणं किंवा कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी कोणाला मारून टाकणं हे त्यांना माहिती नाही. नग्नता त्यांना सहज स्वीकारता येते, त्यांच्यात लिंगाधारित हिंसा जवळजवळ नाही, कौटुंबिक कलह खूप कमी आहेत. लिंगाधारित भ्रूणहत्या वा बालहत्या अजिबात होत नाहीत. लोकसंख्येतील स्त्री  पुरुष प्रमाण स्त्रीच्या आधिक्याकडे झुकणारं आहे. माणसं खरोखरी समजदार, सर्वस्वीकारी, सहनशील आणि उदारमताची आहेत. प्रेमाचे स्त्री-पुरुष संबंध सहज असतात, त्यात फार खटाटोप करावा लागत नाही. लग्नाआधीचे संबंध-लग्नाशिवायचे संबंध-अनेक जोडीदार-लग्न-विच्छेद आणि पुन्हा लग्न; इतकंच काय घर सांभाळणारे पुरुष असतात. घरी, शेतात किंवा जंगलात स्त्रिया पुरुषांची आणि पुरुष स्त्रियांची कामं करत असतात. हे सर्व अगदी सहज होत असतं. नवऱ्याला सोडून आलेल्या स्त्रीला माहेरी आनंदानं आधार मिळतो, नवऱ्याकडे परत जाण्याची सक्ती नसते. आमच्या शेजारी राहणाऱ्या एका पुरुषाची नवी जोडीदारीण त्याच्यापासून गरोदर नव्हती, तरी तिच्या बाळंतपणाची उस्तवार तो करत होता. स्वत:चं आणि दुसऱ्याचंही आयुष्य काय किंवा मरण काय ही माणसं सहजपणे घेतात. मृत्यूच्या दु:खातून लगेच सावरतात, शारीरिक वेदना विनातक्रार सहन करतात. आणि भावनिक किंवा शारीरिक दु:ख झेपेनासं झालं तर झटक्यात आपलं जीवन संपवतात. हल्बी आणि गोंडी भाषेत इतर ‘प्रगत’ भाषांपेक्षा विशेषणं खूपच कमी आहेत. कुणाच्याही चारित्र्यावर सहजपणे डाग पडत नाही.  कुणाच्या चारित्र्याची तपासणीही कुणी करत बसत नाही. आणि त्यांच्या सभ्य समकक्षांपेक्षा ते कमी मतप्रदर्शी आहेत. 

तर, असा हा शाळेभोवतीचा समाज शांतताप्रेमी आणि आनंदी आहे. त्यांच्या ‘सुसंस्कृत भावंडापेक्षा’ वर्तमानात जगणारा. भोवतालाशी त्याचं नातं तुलनेनं जास्त संवादी आहे. लुबाडणूक करणारं नाही. तो खरंच ‘जगा आणि जगू द्या’ या विचारानं राहतो. त्याला ‘संस्कृती’ आहे.

आता त्याच्यावर काही प्रमाणात ‘विकासा’चा मारा होतोय. आणि त्याचा विशेषणं, तत्त्वं, मूल्यं, नीती आदिंशी अधिक संबंध येतोय. भूतकाळ नाहीतर भविष्य याबद्दलच्या चिंतनाशीही तो जखडला जातोय. तीच आपली संस्कृती आहे ना! आखीव शिक्षण, मुख्य प्रवाहात रोजगार मिळणं, वीज, टीव्ही, मोबाईल, रुंद रस्ते या गोष्टी इथंही पोचताहेत. त्याचा जबरदस्त परिणाम होईल, असं वाटतं. २०१७ मधे आमच्या गावात पहिल्यांदा भिंतीवरल्या वेधक घोषणा (ग्राफिटी) आल्या. लिंगाधारित ठोकळेबाज विचारसरणी, बाबा वाक्यं प्रमाणं, लिंगाधारित हिंसा किंवा गुन्हेगारी हेही लवकरच येईल असं वाटतं.

खरोखरीचं शिक्षण घडावं या दृष्टीनं आम्हाला मुलांच्या या सांस्कृतिक संपन्नतेचा फायदा होतोय. त्यांनी त्यांच्या मूळ संस्कृतीला सोडू नये एवढेच प्रयत्न केले तरी खरं शैक्षणिक काम होईल असं नेहमी वाटतं. त्यांच्याच संस्कृतीची किंमत त्यांना समजावी यासाठी प्रयत्न करावे लागतील, असं वाटतं. प्रगत जगाकडून येणाऱ्या वावटळीसमोर त्यांना त्यांच्या संस्कृतीची शहाणीव दाखवून द्यावी लागेल. आम्ही त्या प्रगत जगातले असलो तरी! त्या प्रगत जगासारखं वागायलाच हवं का, त्याची नक्कल करायलाच हवी का हे प्रश्न त्यांच्यासमोर वारंवार सहजपणे ठेवायला लागतील. हे अतिशय कठीण काम आहे. पण इमली महुआत खरं शिक्षण मिळावं यासाठी एवढं पुरेसं होऊ शकेल असं वाटतं.

लेखक  [email protected] इमली महुआ विद्यालयाचे संस्थापक शिक्षक आहेत

हा लेख प्रथम पालकनीतीने प्रकाशित केला

Story Tags: , , , , , ,

Leave a Reply

Loading...