या शिर्षकातल्या शब्दांचे नेमके नाते काय असा प्रश्न अनेकांना पडला असेल.यातला प्रत्येक शब्द हा केवळ शब्द नसून त्या संकल्पना आहेत व त्या समजून घेणे फारच महत्वाचे आहे. यातील प्रत्येक शब्दा पाठोपाठ आपल्याला आणखीन कोणकोणते शब्द आठवतात, जरा विचार करुन बघुयांत.
1.करोना विषाणू ….कोव्हीड 2019….पँंडेमिक…..सामाजिक आरोग्य…
सार्वजनिक आरोग्य व्यवस्था
2.पर्यावरण प्रदुषण…..जलवायु परिवर्तन (क्लायमेट चेंज)…क्लायमेट क्रायसिस…
हीट वेव्ह व प्रदुषणाचे आरोग्यावरील गाभीर दु:षरिणाम.
3.आर्थिक प्रगती….जी.डी.पी.(ग्राँस डोमेस्टीक प्राँडक्ट म्हणजेच सकल घरेलू उत्पादन …लाँकडाऊन…
….विकास(?) प्रकल्प…..पर्यावरणाचा -हास व विस्थापन …क्लायमेट क्रायसेस.
ही सर्व गुंतागुंत समजून घ्यायची तर आपण या सह-विचाराची सुरवात करुयात आपल्या अनुभवांवरुन.
गेली काही वर्ष आपण अनुभवत आहोत वाढते तापमान,अन् अवकाळी व एकदम धोधो पडणारा पाऊस,त्यामुळे येणारे फ्लँश फ्लडस् म्हणजे थोडाच काळ पण मोठ्ठा विनाशकारी पूर व त्यामुळे पिकांची नासाडी असे अनेक बदल.या सगळ्यांना आपण हवामान बदल म्हणजेच क्लायमेट चेंज असे म्हणायला लागलो.आता मात्र या विषयांत अधिक रस घेणारे धोक्याची घंटी वाजवित आपल्याला सांगू लागले आहेत की दिवसेंदिवस परिस्थीती क्लायमेट क्रायसिस म्हणावे एवढी भयावह झालेली आहे.ती अधिक बिघडून सर्वनाश होऊ नये म्हणून निदान स्लोडाऊन करण्याचा….विनाशाची गती कमी करण्याचा प्रयत्न करायचा तर आपण आपल्या देशातल्या व जगातल्या व्यवहारांमध्ये…व्यवस्थांमध्ये बदल करायला हवेत.खूप मोठ्या प्रमाणांत होणारे प्रदुषण, हवेतील कार्बनडायआँक्साईडची पातळी व पारटीकल काऊंट म्हणजे धूळ-धूर यांचे प्रमाण करायला हवे. याचा अर्थ असा की वाहतूक करणा-या वाहनांची चांगली देखभाल करणे व त्यांची संख्या मर्यादित करणे गरजेचे आहे,औद्योगिकीकरण,त्यातून होणारे प्रदुषण व सोबतचवाढत जाणारे शहरीकरण या सर्वाचा पुनर्विचार करायला हवा आगदी तातडीने.(लाकडाऊनच्या निमित्ताने याचा प्रत्त्यय आपण घेतला.)असे न केल्यास सजीवसृष्टी असलेला एकमेव आपला ग्रह आपली पृथ्वीच नष्ट होईल.याकडे अजूनही पुरेश्या गांभीर्याने बघितले जात नाही म्हणून जणू निसर्गाने स्वत:च आपले संतुलन पुन्हा मिळविण्याचा उपाय म्हणून की काय, कोव्हीड पँडेमिक “अवतरला” अन् सर्व जगभर अर्थ चक्र थोपविण्यांत आली गेले काही महिने.
आपण विसरुन गेलो होतो ते पक्षांचे किलबिलाट आपल्याला सुर्योदयाची चाहुल देऊ लागले.दिल्लीतrल हवा स्वच्छ झाली अन् गंगा यमुनांचे पाणी वाहू लागले.ठाणे ग्रामीण परिसरातली वाहनांची वरदळ थांबली अन् शांत रस्त्यांवर हरीण-काळविट सहपरिवार दिसू लागले.पूर्वी जंगल व्याप्त असलेल्या या परिसरावर जणू काही ते स्वत:चा पारंपरीक हक्कच सांगू लागले.
करोना….जानेवारी 2020च्या अखेरीस जागतिक स्तरावर ज्याचा वेगाने प्रसार होत असल्याच्या बातम्या तुमच्या आमच्यापर्यंत पोहचल्या तो हा नवा विषाणु. करोना व्हायरस नेमका आहे तरी कसा अन् तो आला असेल कुठून हे समजून घेऊ यांत.या विषाणूमुळे होणारा आजार 2019च्या शेवटाकडे लक्षांत आला म्हणून त्या विषाणूला (कोरोना व्हायरस डिसीज चा शाँर्ट फाँर्म म्हणून) कोव्हीड 2019 किंवा नाँव्हेल करोना व्हायरस असेही म्हटले जाते. याचे आणखीन एक नाव आहे एस् ए आर् सी-2(सार्क-2).या विषाणूचा संसर्ग झाल्यावर सीव्हीअर् अँक्यूट रेस्पीरेटरी सिंड्रोमची लक्षणे दिसतात पण या प्रकारच्या आजाराची काही वर्षांपूर्वी साथ आली होती त्यापेक्षा याचे वेगळेपण दर्शविण्यासाठी याला सार्क-2 असे म्हटले जाते. तर हा नवा विषाणू आला तरी कुठून हे समजून घेऊ यांत.
आपल्याला सर्दी-खोकला-ताप याचा त्रास देणारा फ्यूचा..इन्फ्यूएन्झा..हा करोनाचा जवळचा नातेवाईक म्हणता येईल. दोघेही आर् एन् ए व्हायरस व म्हणून त्यांत वारंवार अनुवंशिक बदल होण्याची शक्यता अधिक. करोना व्हायरस या विषाणू गटाचे वैशिष्ट्य असे की त्याला कवच असते त्यातून काही प्रथिनयुक्त काटेबाहेर आलेले असतात. करोना व्हायरसेस हे काही प्राण्यामध्ये आढळतात.
वटवाघूळ हा याचा मुख्य यजमान (होस्ट) असावा.वाढत्या जंगलतोडीमुळे दिवसेंदिवस वटवाघूळांची संख्याकमी होत असल्यामुळे नवीन यजमानाच्या शोधांत त्याने हे नवे ऊग्र रुप धारण केले असावे. 2019 अखेरीस चीनच्या वुहान प्रांतातील बाजारांत संसर्ग झालेल्या माणसापासून अनेक माणसांमध्ये पसरत धुमाकूळ घालतांना आढळला.
या नवीन ऊग्र रुपातील करोनासंदर्भांत आणखीन एक शक्याता सांगितली जाते ती अशी की, चीनच्या सीमा क्षेत्रांत वुहानजवळच अमेरिकेच्या पेंटँगाँनची जी एम् तंत्रज्ञान वापराची प्रयोगशाळा असून त्यांत जैविक शस्त्रास्त्रांचे (म्हणजे बायालाँजिकल वेपनस्) संशोधन चालते. कदाचित् चुकून(?) हा नवा ऊग्र विषाणू निसटला असू शकेल. अर्थांत या अतीगोपनीय व्यवस्थेची शहानिशा करणे अशक्य. मात्र मोदी-शहा सतत युध्दाची भाषा वापरतात, तेंव्हा ही शक्यता नाकारता येत नाही. सध्या आर्थिक एकाधिकारशाही गाजविणारा अमेरिका उदयोन्मुख प्रतिस्पर्धी चीनला अशा आधुनिक काव्याने जेरीस आणण्यास मागे पुढे पाहणार नाही असे सहज वाटावे या प्रकारचे काही सूचक प्रतिसाद अध्यक्ष ट्रम्प प्रसारीत करत असतात. तर असो…
क्लायमेट क्रायसेस, जंगलतोड व जनुकिय तंत्रज्ञानासारख्या नवनव्या तत्रज्ञानांचा अनियंत्रीत वापर यामुळे अशी उत्क्रांती विविध रोगजंतूंमध्ये होऊन नवनवीन आजारांना मानवाला सामोरे जावे लागण्याची शक्यता यातून अधोरेखित होते, हे निश्चित.
करोना संसर्ग व सामाजिक आरोग्य …
जगभरातील विविध देशांत वेगाने पसरलेल्या कोव्हीड आजाराची तीव्रता,मृत्यूची संख्या यामुळे समाजमानसांत मोठे भीतीचे सावट व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मास्क कुणी कोणते वापरायचे कुणाला मास्कची गरज नाही याबद्दलच्या सतत बदलत्या निकषांमुळे त्यांत भर पडली. टीव्ही अन् सोशल मिडियावरील अनअधिकृत बातम्यांचाही निश्चित वाटा आहे. मात्र हे सुध्दा खरेच की आम्हा अभ्यासकांकरिता व पेशन्टस् सांभाळणा-या सर्व यंत्रणेकरिता देखिल हा नोव्हेल करोना विषाणु अगदीच नवीन अनोळखी.त्याचे स्वरुप जसजसे उलगडत गेले तसतसे निकष बदलवणे क्रमप्राप्त ठरले. म्हणजे महागडे एन् 95 मास्क हे केवळ थेट पेशन्ट हाताळणा-या डाँक्टरस् नर्सेस अशांकरिताच आवश्यक आहेत, त्याचा त्यांना तुटवडा पडू नये याकरिता जाहीर करावे लागले. पुढे संसर्ग झाला पण लक्षणे दिसत नाहीत अशां लक्षणरहीत वाहकांकडून करोनाचा संसर्ग होतो, हे कळल्यावर सर्वांनीच साधे कापडी मास्क अथवा रुमाल बांधून नाक व तोंड झाकावे, त्या शिवाय घराबाहेर पडूच नये याचा आग्रह धरावा लागला. नवीन माहितीनुसार हा बदल आवश्यक म्हणून. ज्येष्ठ नागरिक, लहानमुले व विविध आजारांमुळे प्रतिकारशक्ती कमी झालेले अन्य यांना लक्षणरहीत वाहकांकडून (असिमटोमोटिक कँरिअरस् कडून) संसर्ग होण्याचा धोका अधिक म्हणून त्यांनी मास्क किंवा रुमाल बांधणे अत्यावश्यक.
अगदी सामान्यज्ञान अथवा शालेय विज्ञान आठवून थोडासा विचार केला तरी आपल्या सहजच लक्षांत येते की कोणताही रोगजंतू हा धर्म, जात, लिंग असा भेदभाव करत नाही मात्र आपली असमान समाजव्यवस्था व त्यांचे भिन्न प्रतिसाद यामुळे मिळमा-या अथवा नाकारल्या जाणा-या सेवा यांत मात्र या विविध घटकांचा मोठा प्रभाव दिसून येतो.दर्जेदार आरोग्य सेवापर्यंत पोहचताच न येणे व त्या न परवडणे यांत परिवाराची सामाजिक व विशेषत. आर्थिक परिस्थिती हा सर्वांत महत्वाचा मुद्दा ठरतो. मागील दशकभर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बजेटमध्ये सातत्याने कपात केल्यामुळे ती मोडकळीस आणण्यांत आली. या बरोबरच कार्पोरेट हाँस्पिटलचा पसारा वाढत गेला. परिणामत. गोरगरिबांना आरोग्य सेवा नाकारल्या गेल्या. अनेक परिवारांना एका सदस्याच्या गंभीर आजाराचा उपचार करतांना भूमिहीन व कर्जबाजारी होण्याची व दारिद्र्य रेषेखाली ढकलल्या जाण्याची पाळी आल्याचे विविध अभ्यासांतून जाहीर झाले आहे.
आर्थिक परिस्थिती जशी खालावते तशी आहारातील फळे, भाज्या व डाळी यांच्या प्रमाणांत घट केली जाते. एकंदर आहाराची मात्राही घटते. याचा परिणाम म्हणजे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. अशा उपाशीपोटी कोणताही व्यायाम कल्याने रोगप्रतिकारशक्ती कशी वाढणार ?
लाँकडाऊन काळांत मानसिक बळावर घर गाठू पाहणा-या अनवाणी पायपिट करित निघालेल्या असंघटित मजूरांचे-महिलांचे मृत्यू झाले त्यांची खरी आकडेवारी मिळाली तरी त्यांची नोंद भूकबळी म्हणून करण्याचा प्रमाणिकपणा शासन दाखवू धजणार का? ज्या समाजघटकांना दीर्घकाळ भूक सहन करावी लागते व आरोग्यसेवा परवडत नाहीत त्यांत सामान्यत: रोगजंतुचा प्रसार अधिक होतो याची जाणीव सत्तेत असणा-यांना नव्हती किंवा त्यांची परवाच नव्हती म्हणूनच “मध्यरात्रीपासून राष्ट्रीय लाँकडाऊन” अशी घोषणा रात्री आठवाजता करण्यांत आली, प्रशासनाला देखिल कोणतीही पूर्वसूचना न देता व लोक प्रतिनीधींनासुध्दा विश्वासांत न घेता.
हा निर्णय तज्ञांच्या सल्ल्याने घेतल्याचे नंतर सांगितल्या जात असले तरी, हे तज्ञ नेमके कोण हे गूढ कायम आहे. करोनाचे संकट हा पब्लीक हेल्थ चा प्रश्न असून आरोग्य क्षेत्रातील कुणीही असा संपूर्ण राष्ट्रीय लाँकडाऊनचा सल्ला दिला नसल्याचे स्पष्ट आहे. अचानक लाँकडाऊन सुरु झाल्यावर नाईलाजाने रेशन घ्यायला गेलेल्या वयस्क आदिवासीला ज्या पध्दतीने बेदम मारहाण करण्यांत आल्याचे प्रसंग घडले, त्यावरुन करोना पँडेमिक हा “लाँ अँड आंर्डर”चा प्रश्न असल्याप्रमाणे आदेश दिले गेल्याचे स्पष्ट होते. पोलिसांच्या व तथाकथित लेकप्रतिनीधींच्या संवेदनहीनतेच्या अगणित घटनांचा धिक्कार करावा तेवढा थोडाच.
करोनाच्या साथीला आळा घालण्याचा काहीही उपाय हाताशी नाही व आपली खिळखिळी सार्वजनिक आरोग्यव्वस्था येणा-या रोग्यांच्यावर इलाज करण्यास सक्षम करण्यासाठी वेळ मिळवण्याकरिता हा राष्ट्रीय लाँकडाऊन जाहीर करुन “घरीच रहा, सुरक्षित रहा”, … “दो गज की दूरी, है जरुरी” अशी भाषणबाजी करत, टाळ्या-थाळ्या, अतीकामाने बेजार डाँक्टर व नर्सेसवर हेलिकाँप्टरनधून फुलांचा वर्षाव अशा मूळप्रश्नांपासून जनतेचे लक्ष वळविण्याच्या कसरती केल्या गेल्या.
साथीच्या प्रसाराची गती कमी करण्यांत फिजिकल डिसटनसिंग म्हणजे दोन व्यक्तित अंतर राखणे याने नक्कीच मदत झाली खरी पण सोशल डिसटनसिंग वाढविण्याचा सत्ताधारी पक्षाचा अजेंडा मात्र चुकीच्या शब्दरचनेमुळे उघड झाला. माध्यमांना हाताशी धरुन तबलिगिंच्या नावाने बोंबा मारत धर्माच्या नावाने विद्वेश पसरविण्याचा प्रयत्न नंतर मागे घेणे भाग पडले व भाषा बदलावी लागली.
जून अखेर पर्यंतचा लाँकडाऊनचा आता पाचवा टप्पा संपत आला, 80 दिवसांचा दीर्घ काळ संपत आला मात्र करोना प्रसाराला म्हणावा तितका लगाम अजूनही घालता आलेला नाही. अखेर आता “करोनावर मात”, “करोनाला युध्दात हरवणारच” ही भाषा सोडून देत करोना सह जगायला शिकणे असे बदल करावे लागले.
करोनाच्या संकटाला सामोरे जाण्याची सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची तयारी नसतांनाही ज्या जिकीरीने व कष्टाने वैद्यकीय व स्वच्छता कर्मचा-यासह, रुग्णवाहिका चालक व आशा वर्करस् सारख्या अनेकांनी स्वत:चा जीव धोक्यांत घालून प्रयत्न केलेत त्या सर्वांना अगदी मन:पूर्वक सलाम. आशियातील सर्वांत मोठी झोपडवस्ती असलेल्या धारावीत करोनाला नियंत्रणांत आणण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यामुळे इतर वस्त्यांमधील कार्यकर्त्यांना आता संपूर्ण मुंबईतही साथ आटोक्यांत आणता येणे शक्य आहे हा विश्वास निर्माण झाला आहे.
करोना पँडेमिक व आर्थिक प्रगती…… करोनाचा उदय झाला त्यावेळी म्हणजे 2019च्या शेवटाकडे आपल्या देशाची अर्थ व्यवस्था खालावलेलीच होती. सी ए ए व एन् आर् सी विरोधांत देशभरातील तरुणाई महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो व भारतीय संविधान
घेऊन शाततामय मार्गानी खंबीरपणे उभी ठाकली होती.दिल्लीतील शाहीन बाग सत्त्याग्रहाला पाठिंबा म्हणून गावोगावी महिला रस्त्यावर उतरत होत्या. ही परिस्थिती हाताळणे कठीण होत असतांना करोनाला जागतिक महामारी म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आणि दमनकारी यंत्रणेला सर्व आंदोलनांना, विरोधाला थोपविण्याची नामी संधी मिळाली. करोना मागे सर्व आर्थिक-सामाजिक अपयश दडवणे सोपे होईल म्हणून सुटल्या सारखेही वाटले असेल.
मात्र हा नाँव्हेल करोना व्हायरस या आधीच्या स्वाईन फ्ल्यू ,इबोला यांच्यातुलनेत जास्तच चिवट निघाला.आज ही यावर रामबाण म्हणावे असे एकही औषध नाही. हायड्राक्सी क्लोरोक्वीन या मलेरियाकरिता वापरल्या जाणा-या औषधाचा कोव्हीडचे पेशन्ट हाताळणा-या आरोग्यकर्मचा-यांना प्रोफायलेक्टीक म्हणजे रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक म्हणून उपयोग झाला. तसेंच अगदी संसर्ग झाल्यावर सुरवातीच्या काळांत याचा उपयोग होऊ शकतो पण (गंभीर दुष्परिणामांची भिती असल्या कारणाने) ते फक्त डाँक्टरांच्या देखरेखितच घ्यायला हवे. नव्याने निघालेले रेमिसिडिन हे व्हेडीलेटरवर गेलेल्या रूग्णांचा जीव वाचविण्याची शक्यता वाढविते असे म्हणतात. साधारणपणे 60 टक्के जनतेला सौम्य आजार होऊन सामुहिक प्रतिकारशक्ती तयार होईपर्यंत साथ नैसर्गिक रितीने क्षमण्याची वाट बघण्याशिवाय पर्याय दिसत नाही. कारण लस तयार करण्याची कितीही चर्चा सुरु असली तरी किमान दीडदोन वर्ष लस उपलब्ध होण्याकरिता लागतात व आर् एन् ए विषाणूंच्या बाबतीत परिणामकारतेची शास्वती नाही, त्या पलिकडे औषध कम्पन्यांतील आर्थिक व राजकीय स्पर्धा. एच् आय् व्ही या एडस् च्या विषाणू विरोधात, दोन दशके उलटून गेली तरीही लस तयार होऊ शकलेली नाही.
दोनतीन महिन्यानंतर आर्थिक कंबरडे मोडले म्हणून लाँकडाऊन शिथिल करण्याचा आग्रह झाला पण वैद्यकीय दृष्टीने परिस्थिती सुधरलेली नाही. बंद केलेले उद्योग सुरु करायचे तर स्वस्तात काम करणारे स्थलांतरित असंघटित मजूर परत येतील याची शाश्वती नाही, त्यांचे थकलेले पगार देण्याचे आश्वासन पाळता येणार का अशा अनेक अडचणी आहेत. नवीन गुंतवणूक मिळविण्याकरिता म्हणत मजुरांच्या हक्कांचे संरक्षण करणारे सर्व कायदे मोडित काढण्याच्या प्रयत्न गेले वर्षभर सरकार करित होतेच पण खरेतर हा फक्त बहाना आहे, त्यामुळे गुंतवणूक वाढतांना दिसत नाही. पर्यावरणीय आघातांबद्दलच्या जनसुनवाई सारख्या गोष्टींना फाटा देत झटपट मान्यता देण्याचा, कोळसा खाणींना भरमसाठ परवाने वाटण्याचा सरकारने सपाटा लावला आहे पण अशा विनाशकारी प्रकल्पांच्या अट्टाहासापाई पर्यावरणीय संकट ओढवून घ्यायचे की लोकसहभागातून त्या त्या परिसरातील पर्यावरणाचे संवर्धन करत स्वस्थ मानवी समाजाचे हीत साधायचे ह्याचा प्राधान्याने विचार करायला हवा. जगभर असे अनेक प्रयत्न झालेले आहेत, त्यांचा स्विकार करण्याचे धाडस दाखविणे, आर्थिक प्रगतीची दिशा बदलविणे गरजेचे आहे.
प्रथम प्रकाशन आंदोलन शाश्वत विकासासाठी, जुलै २०२० अंकामध्ये