शैक्षणिक पदवीचा ‘स्मृती’दिन ! (In Marathi)

By नविन काळे (Navin Kale)onSep. 25, 2014in Perspectives

आपल्या देशाला एक नवीन मंत्रीमंडळ मिळाले. दरवेळी मंत्रिमंडळाच्या निवडीनंतर आपल्या देशात जे तऱ्हेतऱ्हेचे वाद होतात ते झाल्याशिवाय त्या संपूर्ण प्रक्रियेला पूर्णत्व येत नाही. आजच्या भाषेत बोलायचं तर ‘सर्कल कम्प्लीट होत नाही !’ यावेळीही विरोधकांनी आपली परंपरा जपत स्मृती इराणींच्या निवडीला विरोध केला. त्यांची शैक्षणिक पात्रता आणि त्यांना दिलेले खाते यांचा परस्पर संबंध लावत विरोधकांनी टीकेची झोड उठवली. या सगळ्या बातम्या वाचून खूपच गंमत वाटली. या लेखातून मला कोणाचीच बाजू मांडायची नाही. शैक्षणिक पात्रता नसूनही आपण नेमून दिलेल्या खात्यासाठी योग्य आहोत, हे माझ्यापेक्षाही स्मृती इराणी यांनी सिद्ध करावं. हा ‘विरोध फॉर सेक ऑफ विरोध’ होता हे अगदी खरं मानलं, तरी आपल्या भारतीय मानसिकतेची अक्षरशः कीव करावीशी वाटली. शैक्षणिक पात्रता आणि कर्तृत्व यांचा परस्परसंबंध लावावा हे आजच्या एकविसाव्या शतकातही कोणाच्या तरी मनात येतं आणि त्यावर वाद होऊ शकतात, हे खूपच दुर्दैवी आहे. अर्थात दोष त्या एका व्यक्तीचा नाही. आपण सगळेच थोड्याफार फरकाने तसे आहोत.

या प्रश्नाची मूळे आपल्या दस्तूरखुद्ध शिक्षणपद्धतीत सापडतात. ब्रिटीशांनी या देशात त्यांच्या व्यावहारिक सोयीसाठी एक शिक्षण पद्धती राबवली. शिकलात तर नोकरी लागेल – नोकरी लागली तर पैसे मिळतील इतकं सोपं समीकरण करून शिक्षण आणि अर्थप्राप्ती यांचा एकमेकांशी संबंध लावण्यात ब्रिटीश यशस्वी ठरले. ब्रिटिशांना त्यांच्या कामकाजासाठी माणसे हवीच होती. त्यामुळे ‘शाळा’ म्हणजे अक्षरशः ‘कारकून तयार करणारे कारखाने’ झाले. आपल्या देशाच्या अतिशय प्राचीन उज्वल शिक्षण परंपरेचा ऱ्हास सुरु झाला तो इथे. ब्रिटीश जाऊन आज इतकी वर्षे होऊनही आपण ती शिक्षण पद्धती जशीच्या तशी राबवतोय. अजूनही काही ठराविक शाखांमध्ये शिकलेला माणूस म्हणजेच ‘भरपूर शिकलेला माणूस’ हे आपण समीकरण करून ठेवलंय. असा माणूस समोर आला की नकळतपणे आपण एका अनामिक आदराने त्याच्याकडे पाहतो. वस्तुतः एखादा माणूस किती ग्रेट आहे हे ठरवणारे मापदंड त्याच्या प्रत्यक्ष जगण्यात असतात. पण निदान आपल्या देशात तरी, माणसाला मिळालेल्या शैक्षणिक पदव्या त्या माणसाचा मार्ग अनेक बाबतीत सुकर करत असतात. मग ती लग्नाची स्थळे असतील, नोकऱ्या असतील, पगारवाढीचे निकष असतील, काही महत्वाच्या हुद्द्यांवरील नेमणूक असेल, अर्थप्राप्तीच्या संधी असतील, मान-मरातब असेल…असू देत. ज्यांना ते मिळतंय त्याबद्दल माझ्या पोटात दुखत नाहीये. मला कळवळा वाटतो तो लौकिकार्थाने कमी शिकलेल्या – हुशार लोकांबद्दल !

कमी शिकलेल्या हुशार लोकांची ‘स्वतःला सिद्ध करण्यातच’ खूप शक्ती खर्च होत असते. ‘पदवी’ नावाचा ‘पासपोर्ट’ त्यांच्याजवळ नसल्याने अनेक ठिकाणी त्यांची अडवणूक होते. काहीजण तिथेच हरतात. या जालीम जगाच्या नियमांसमोर आपली मन तुकवतात. परंतु जगण्याच्या अपूर्व भट्टीतून तावून सुलाखून निघालेले काही मोजके या दुनियेला स्वतःपुढे झुकायला लावतात. त्यांच्या आजवरच्या झगड्याला फक्त एकाच गोष्टीचा परीसस्पर्श होतो, आणि अवघं जगणं सोन्याने उजळून निघतं. तो अद्भुत परीस फार कमी जणांना गवसतो. त्या परीसाचे नाव असते – ‘आपल्याला अवगत असलेल्या गोष्टीविषयी सार्थ आत्मविश्वास !

प्रसिद्ध तबला वादक थिरकवाँ साहेबांची एक गोष्ट ऐकली होती. एक कार्यक्रम संपवून ते काही मोजक्या उपस्थितांमध्ये गप्पा मारत बसले होते. सर्व उपस्थित लोक खूप शिकलेले, धनाढ्य, अतिशय प्रतिष्ठित वगैरे. आयोजक बिदागी घेऊन आले. थिरकवाँ साहेबांच्या हातावर त्यांची बिदागी ठेवण्यात आली. ‘अमुक अमुक बिदागी मिळाली’ असं लिहिलेल्या ठिकाणी सही करण्यासाठी त्यांच्या समोर कागद सरकवण्यात आला. अतिशय शांतपणे त्यांनी त्या कागदावर आपला ‘अंगठा’ लावला. हे पाहून उपस्थितांमध्ये कुजबुज सुरु झाली. ही गोष्ट थिरकवाँ साहेबांच्या लक्षात आली. उपस्थित लोकाकडे एक कटाक्ष टाकून ते म्हणाले, ‘आपल्यामध्ये डॉक्टर किती आहेत?’ काहींनी हात वर केले. ‘आपल्यामध्ये वकील किती आहेत?’ काहींनी हात वर केले. मग आपल्या खास अंदाजात मिस्कीलपणे त्यांनी विचारलं, ‘अब ये बताइये, आप मे से ‘थिरकवाँ’ कितने है ?’ सगळ्यांनी माना खाली घातल्या. आपल्याला अवगत असलेल्या कलेबद्दल सार्थ आत्मविश्वास असणे, याला म्हणतात !

ज्यांच्या साहित्यावर संशोधन करण्यात लोक आपली हयात घालवतात आणि थेट ‘पीएचडी’ वगैरे घेतात त्या तुकाराम, ज्ञानेश्वर, बहिणाबाई वगैरे मंडळींकडे कुठली पदवी मागणार आहोत आपण ? त्यांच्या ‘शैक्षणिक पात्रतेसंबंधी’ सवाल उठवायची हिंमत आहे कोणात?

भरपूर शिकलेल्या एका माणसाची गाडी एकदा रस्त्यात बंद पडते. काही केल्या ती सुरु होत नसते. तिथून एक अडाणी माणूस जात असतो. तो मदतीसाठी पुढे येतो. ज्ञानी महोदय त्या येड्या गबाळ्या रुपाकडे बघतात. त्याची खिल्ली उडवतात. तो माणूस म्हणतो, मला एक संधी द्या. चला, हेही करून बघूया, म्हणत महोदय गाडीपासून बाजूला होतात. त्या अडाणी माणसाच्या हातात गाडीचे ‘मॅन्युअल’ कोंबतात. त्याची मजा बघत बाजूला सावलीत बसून राहतात. अडाणी माणूस ‘मॅन्युअल’ उलटं सुलटं करून पाहतो. ते बाजूला ठेवून तो थेट गाडीच्या इंजिनमध्ये डोकं खुपसतो. थोड्या वेळाने गाडी सुरु होते. ज्ञानी महोदय अवाक होतात. त्याला विचारतात, ‘तुला ‘मॅन्युअल’ वाचता येत नसून तू गाडी दुरुस्त कशी केलीस?’
इंजिनमधील तेलाने काळे झालेले हात पुसत तो ‘अडाणी’ माणूस म्हणतो, ‘साहेब, या गरिबाला वाचता येत न्हाई. म्हणून मी थोडा ‘ईचार’ करू शकलो !’

स्मृती इराणी यांच्या निवडीवरून जो वाद सुरु झाला त्या दिवसापासून एक ‘वास्तू’ची सारखी आठवण येतेय.
मागच्या वर्षी या जागेला भेट दिली होती. जयपूरपासून १०० किमी अंतरावर तिलोनिया नावाचं एक छोटंसं गाव आहे. बंकर रॉय नावाच्या एका अवलियाने तिथे ‘बेअरफुट कॉलेज’ नावाच्या एका जादुई वास्तूची स्थापना केली आहे. त्याविषयीच तुम्हाला थोडक्यात सांगायचंय.

दिल्लीत शिक्षण पूर्ण करून बंकर रॉय यांनी भारत भ्रमण करायचे ठरवले. ते राजस्थान मधल्या या गावात आले. ‘आपण खूप शिकलोय तेव्हा इथल्या अशिक्षित लोकांना आपण शिकवू’ असं त्यांच्या अहंकाराला वाटलं. जसजसा त्यांचा या लोकांशी संबंध वाढला, तसतसं बंकर यांच्या लक्षात येऊ लागलं की वरकरणी अडाणी दिसणाऱ्या मंडळींकडे अनेक ज्ञान-कौशल्ये आहेत. तेव्हा याच लोकांकडूनच आपण काहीतरी शिकलं पाहिजे. यातूनच जन्म झाला – बेअरफुट कॉलेजचा. १९७५-८० च्या काळात निर्मिती झालेली ही वास्तू पाहण्यास आता जगभरातून लोक येतात. या प्रयोगास अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. संपूर्ण वास्तू शून्य विजेवर आणि शंभर टक्के सौर उर्जेवर चालते. या वास्तूमधील जेवणासकट सर्व सेवा सुविधा कमालीच्या साध्या. वायफळ खर्च नाही. माणसं अतिशय लाघवी व नम्र. अतिशय साधे सुती कपडे घातलेली ही माणसे बोलू लागली की नुसतं ऐकत बसावसं वाटतं. मध्यंतरी एका नेत्याच्या मुलाखतीनंतर ‘women empowerment’ हा शब्द विनोदाचा विषय झाल्याचे अनेकांना आठवत असेल. ‘women empowerment’म्हणजे काय हे अनुभवायचे असेल तर ‘बेअरफुट कॉलेज’ ला भेट द्यावी लागेल.दर वर्षी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ग्रामीण भागातील अशा सुमारे शंभर स्त्रियांना ‘सौरउर्जा उपकरणे’ बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. हे शिक्षण देणाऱ्या सर्व महिला या त्याच गावातील ‘सहावी सातवी’ च्या पुढे न शिकलेल्या महिला आहेत. राजस्थानी पारंपारिक वेशातील त्या महिला शिक्षिका आफ्रिकन देशातील महिलांना शिकवताना पाहून आपण अक्षरशः अवाक होतो. येस, नो, ओके या शब्दांच्या व्यतिरिक्त एकही ‘कॉमन’ शब्द माहित नसताना, केवळ खुणांच्या माध्यमातून आणि काही विशिष्ट संकेतांच्या माध्यमातून सुमारे सहा महिने हे शिक्षण चालू असतं. सोलर कुकर, सोलर हीटर, सोलर दिवे वगैरे उपकरणे महिलाच बनवतात आणि बाजारात यशस्वीपणे विकून दाखवतात. याच गावातील काही ‘कमी शिकलेल्या’ (?) महिला दंतवैद्यकशास्त्र शिकून ‘रूट कॅनल’ वगैरे करतात हे पाहून आपल्याला चक्कर यायची बाकी असते. या कॉलेजचं स्वतःचं एफएम रेडियो स्टेशन आहे. सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास असे रोज कार्यक्रम असतात. ज्या लोकांकडे बघून ती धड बोलतील की नाही अशी शंका यावी अशी माणसे ते रेडियो स्टेशन अतिशय शिताफीने चालवतात. एक एक धक्के पचवत बेअरफुट कॉलेजची सैर चालली होती. शेवटचा षटकार अजून बाकी आहे, याची कल्पना नव्हती. एका संगणकासमोर काही उपकरणे घेऊन एक स्त्री बसली होती. वय अंदाजे पन्नास. डोक्यावर घुंघट. त्यातून डोकवणारे सगळे केस पिकलेले. मी विचारलं, ‘आप क्या कर रही हो?’ अतिशय आत्मविश्वासाने समोरून उत्तर आलं – ‘मै रेडियो एडिटिंग कर रही हुं’…मी विचारलं, ‘आपके सामने जो मशीन्स है, उसके बारे मे आपको सब मालूम है?’ त्या स्त्रीने जे उत्तर दिलं, ते केवळ बेअरफुट कॉलेजच्या तत्वज्ञानाचं एका वाक्यात सार नव्हतं, तर आपल्या सर्वांच्या ‘शैक्षणिक अहंकाराला’ मारलेली चपराक होती. ती स्त्री म्हणाली, ‘ये बटन पे क्या लिखा है वो मै पढ नही सकती | पर ये बटन दबाने के बाद क्या होता है, वो मुझे मालूम है !’

आपण थोडंफार शिकलो, आता आपली पुढची पिढी शिकतेय. त्या स्त्रीने जे सांगितलं, नेमकं तेच आपल्या शिक्षणातून हरवून गेलंय. मार्क, टक्के, मेरीटलिस्ट, अॅडमिशन वगैरे बाजारू कल्लोळात ‘खरं शिक्षण’ बाजूलाच पडलंय. मार्क, टक्के वगैरे गोष्टींना कमी लेखायचा उद्देश नाही. पण त्यातच फार अडकून गेलोय आपण. इंग्रजी आलं पाहिजे ते शेक्सपिअर वाचायला नव्हे, तर नोकरीच्या इंटरव्ह्यूमध्ये उत्तरं द्यायला. विज्ञान आलं पाहिजे ते या विश्वातलं कुतूहल शमवायला नव्हे, तर माझं ‘अॅग्रीगेट’ वाढवायला. संस्कृत आलं पाहिजे ते माझ्या परंपरेच्या पाउलखुणा शोधायला नव्हे, तर ते स्कोरिंग आहे म्हणून. शिकायचं असतं ते जगण्यातलं ‘शहाणपण’ (wisdom) मिळवायला. हे सगळं विसरून आपण इतके हीन आणि दीन कधी झालो? शिकण्याला आत्मविश्वासाचे व रोकड्या व्यवहाराचे पंख फुटले की काय चमत्कार घडू शकतो हे सांगणारं बेअरफुट कॉलेजचं उदाहरण पुरेसं बोलकं आहे.

‘बेअरफुट कॉलेज’ला जाण्यापूर्वी त्याविषयी अधिक जाणून घ्यायला मी ‘राजस्थान पर्यटन’ कचेरीत गेलो होतो. तिथल्या अधिकाऱ्यांकडे या जागेविषयी चौकशी केली. त्यांना कुणालाच ‘बेअरफुट कॉलेज’ माहित नव्हतं. त्यांनी माझ्यासमोर जयपूर येथील आपल्या स्वतःच्या मुख्यालयाला फोन लावला. त्यांनाही कुणाला स्वतःच्याच राज्यातील ‘तिलोनिया’ किंवा बेअरफुट कॉलेजविषयी काहीही माहिती नव्हती. या देशात काही भलं काम करायचं असेल तर कुठून सुरुवात करावी लागणार आहे, याची ही एक झलक होती. ‘बेअरफुट कॉलेज’च्या गेटमधून बाहेर पडलो तेव्हाच मनाशी पक्क ठरवलं – यापुढे या वास्तूचा प्रसार आणि प्रचार जमेल तसा आणि जमेल तिथे, आपण स्वतः करायचा. गेलं वर्षभर मी ते करतोय.

(आज हे सगळं ‘मज्जानो मंडे’ मध्ये शेअर करायची संधी दिली, याबद्दल मी स्मृती इराणी आणि त्यांच्या विरोधकांचे आभार मानतो.)

First published on Navin Kale’s blog (archive)

Story Tags: , , ,

Leave a Reply

Loading...