विकल्प संगम (in Marathi)

By राजन इंदुलकर onMay. 06, 2016in Society, Culture and Peace
विकल्प संगम वर्धा
विकल्प संगम वर्धा; फोटो अशीष कोठारी

सन १९९० च्या दशकात भारत जागतिकीकरणाच्या प्रभावाखाली अधिकृतपणे दाखल झाला. त्या आधीच खरे तर ती प्रक्रिया सुरू झाली होती, तिला देशभरातून प्रश्न विचारले जात होते, विरोध केला जात होता. तरीही राज्यकर्ता वर्ग जागतिकीकरणाच्या बाबतीत ठाम होता असे म्हाणण्यापेक्षा त्याच्या हितसंबंधात पुरता अडकलेला होता. त्यामुळे विरोधाला न जुमानता भारतात जागतिकीकरण झालेच. शिवाय आपला राज्यकर्ता वर्ग त्याच्या या भूमिकेमागे समाजमानस उभे करण्यात यशस्वी देखील झाला होता. कारण त्याने ‘विकास’ नामक एक अत्यंत भ्रामक पण आकर्षक असे पालुपद देशात सर्वमान्य केले होते, आजदेखील आहे. विकास म्हणजे नेमके काय? कशाला म्हणावे विकास? विकास नेमका कुणाचा? कसा? कशाच्या बदल्यात? या साऱ्या प्रश्नांची तड न लावताच के पालुपद देशात रुजविण्यात या राज्यकर्त्या वर्गाला आणि त्यामागील आर्थिक हितसंबंधांना यश मिळाले आहे. दुसऱ्या बाजूला, जागतिकीकरण अटळ आहे, ते नाकारणे हा असमंजसपणा आहे, करंटेपणा आहे आणि म्हणूनच जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत सामील होऊन त्या अंतर्गत सुधारणांचा विचार करणे अधिक शहाणपणाचे आहे असे म्हणणारा एक मोठा विचार प्रवाहही आपल्या देशात निर्माण झाला आहे. त्याच्या भूमिकेत व्यावहारिक दम आहे हे सुद्धा तितकेच खरे आहे.

मात्र या तथाकथित विकासामुळे म्हणजेच आधुनिक भाषेत जागतिकीकरणामुळे एक प्रकारची सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक इ. विविध स्तरावरील दरी प्रचंड आकारात वाढते आहे ते आता उघडपणे दिसत आहे. याकडे दुर्लक्ष कसे करावे? या जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे पर्यावरणीय घटकांचा सार्वत्रिक विनाश होत आहे. अनेकानेक लोकसमूहांचे सक्तीचे विस्थापन होत आहे. सर्वसामान्य लोकांच्या जीविका-उपजीविकांचा, जीवनाधारांचा ऱ्हास होत आहे. आर्थिक वाढीचा अविचारी फुगवटा निर्माण झाल्याने समाजात प्रचंड प्रमाणात तणाव निर्माण होत आहेत. सर्वच औपचारिक क्षेत्रांना एकाच दिशेने नेण्याचा अट्टाहास असल्याने या सर्व समस्या अधिकच गहिऱ्या होत चालल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकूणच समाजाची मानसिकता साचेबद्ध होत चालल्याने ही कोंडी फोडणे अधिकच आव्हानात्मक ठरत आहे. अशा स्वरूपाची आव्हाने आता एकविसाव्या शतकात पाय रोवताना आपले खरे रूप दाखवीत आहेत.

अशा गुंतागुंतीच्या आणि निराशाजनक पार्श्वभूमीवर अतिशय आशेची बाब म्हणजे या प्रचलित विकासाच्या साचेबद्ध झालेल्या प्रारूपाला आव्हान देणारे विकल्पांचे / पर्यायांचे प्रयास सर्वत्र केले जात आहेत. समग्र म्हणजेच पर्यावरणीय, सामाजिक, आर्थिक दृष्टीने मानवी जीवन समृद्ध व्हावे हा या प्रयासाचा ध्यास आहे. चिरयू शेत, पशुपालन, मत्स्यव्यवसाय, जंगलाधारित उपजीविका, लोक-तांत्रिक बाजार, कामगारांच्या नियंत्रणाखालील उत्पादन, समाजाभिमुख शिक्षण व आरोग्य, विविध सांस्कृतिक लोकसमूहातील शांती व सामंजस्याकरताचे प्रयत्न, लिंग-धर्म-पंथ इ. पलिकडील समता, लोकतांत्रिक निर्णयपद्धती, संतुलित ग्रामीण जीवन, शहरी जीवनातील स्वास्थ्य इ. विविध पातळ्यांवर हे पर्याय मांडले जात आहेत. यातील अनेकांची सुरुवात काही प्रचलित व्यवस्थेला आव्हान देण्याच्या हेतूने किंवा पर्याय उभे करण्याच्या उद्देशाने झालेली नसेलही. कदाचित ह्या केवळ काही मूलभूत तत्त्वांवर आधारित जीवनपद्धती जगण्याच्या रीती असतील. तसेच यातील अनेक कल्पना आणि जीवनपद्धती या दीर्घकाळापासून अस्तित्वात आणि कार्यरत असतील तर काही नवीनही असतील. तरीही हे सर्व पर्याय अत्यंत स्वागतार्ह तर आहेतच, शिवाय आश्वासकही आहेत.

खेदाची आणि चिंतेची बाब म्हणजे असे पर्याय बऱ्याच अंशी कसदार असूनही आजवर सुटे-सुटे राहिले आहेत. इतके की, त्यांची साधी एकमेकांना माहितीसुद्धा नाही. या पर्यायांचे फारसे दस्तऐवजिकरणसुद्धा झालेले नाही. एक प्रकारच्या एकांतवासात राहिल्याने सर्वसामान्य जनतेशी त्यांचा संवादही राहिलेला नाही. ‘आम्ही बरे आणि आमचे काम बरे’ अशा मानसिकतेत ते अडकलेले आहेत. त्यामुळे प्रचलित ‘विकास’व्यवस्थेचा भ्रम त्यांना तोडायचा आहे असे जर म्हटले तर तेवढे सामर्थ्य त्यांच्यामध्ये कसे येणार? – हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहेच. म्हणूनच अशा पर्यायांना एकमेकांशी जोडणे गरजेचे असते. हे जोडण्याचे काम काहीजण आस्थेने करीत असतात, पर्याय मांडण्याइतकीच गरज मानून. जसे की, प्रसिद्ध भाषा तज्ज्ञ गणेश देवी हे अलिकडच्या काळात ‘भाषा संगम’ ही प्रक्रिया चालवीत आहेत. शिवाय आरोग्य, शिक्षण, शेती, विस्थापन अशा विविध मुद्द्यांवर अनेक मंच सामुहिकपणे देशभरात उभे आहेत. मात्र त्यांचे अस्तित्व त्या त्या मुद्द्यांभोवतीच आहे. व्यापक आव्हानांना सामोरे जाण्याची, समाजपारीवर्तनाची व्यूहरचना त्यांच्यापाशी नाही.

या पार्श्वभूमीवर अलिकडच्या दोन-तीन वर्षांपासून ‘विकल्प सांगम’ या नावाने या सर्व पर्यायांच्या जोडणीचा प्रयास मोठ्या तळमळीने आणि अविरतपणे चालला आहे. अनेकानेक पर्यायी स्वरूपाच्या कामांना, मांडणीना एकमेकांशी जोडणे म्हणजे त्यांची फेडरेशन करणे असे नव्हे, तर त्यांचे त्यांचे स्वातंत्र्य मान्य करून अनौपचारिकपणे त्यांच्यात संवाद निर्माण करणे, त्यांना एकमेकांशी जुळविणे अशा रीतीचा हा संगम आहे. जेथे हे पर्याय एकत्र येतील, एकमेकांशी आपल्या समजेची, कामांची, कामातील अनुभवांची मोकळी-ढाकळी देवाण-घेवाण करतील, एकमेकांवर टीका टिपण्णी करतील, आणि या देवाण-घेवाणीतून काही एक सूत्र मांडण्याचा प्रयत्न करतील. आपल्याला नेमके काय मांडायचे आहे आणि काय नाकारायचे आहे त्याची एक भाषा बनत जाईल. त्या दिशेने विकल्प संगमची वाटचाल होत आहे.

फोटो अशीष कोठारी

‘विकल्प संगम’ची कार्यपद्धती विविधांगी आहे. आधुनिक ई-माध्यमे हे त्याचे संवाद, समन्वय आणि प्रसाराचे प्रमुख माध्यम आहे. या माध्यमांतून देशातील व बाहेरीलही पर्यायवाची कामांचा शोध घेणे, त्यांच्याशी संपर्क साधणे, त्यांच्या त्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण करणे ही कामे अविरतपणे केली जात आहेत. इतके की, जणू माणसे एकमेकांच्या अगदी शेजारी असावीत अशा प्रकारे हा संवाद& चालू असतो. या संगमाची खरी सुरुवात प्रादेशिक मेळाव्याने झाली. लडाख, आंध्रप्रदेश, मदुराई, वर्धा इ. ठिकाणी राज्यस्तरीय मेळावे पार पडले, पुढील काळासाठी निर्धारित देखील आहेत. या मेळाव्यात त्या त्या प्रदेशातील प्रयोगाशील गट, व्यक्ती एकत्र येत आहेत. जवळ जवळ असूनही एकमेकांबद्द्ल माहिती नाही अशा स्थितीत असलेले गट, व्यक्ती या निमित्ताने एकमेकांशी जोडले जात आहेत. इतकेच नव्हे तर प्रादेशिक स्वरुपापलिकडे जात खाद्य संगम, युवा संगम, शिकणे आणि शिकविणे संगम अशा स्वरूपाचे विषयाधारित संगम ठरविले, पार पाडले जात आहेत. जेणेकरुन एखाद्या विषयात अधिक खोलात जाणे शक्य होईल. संगमच्या निमित्ताने एकत्र आल्यावर, त्यातून काही सुचल्यावर काही अधिकच्या प्रक्रिया देखिल स्वतंत्रपणे पुढे जात आहेत. जसे की, नुकतीच पाचगणी येथे अहिंसा अभ्यास या नावाने एक बैठक पार पडली, ज्यात अहिंसेवर आधारित जीवन-पद्धतीवर चर्चा झाली.

विकल्प संगमने आजवर देशभरातील पर्यायी स्वरूपाच्या कामांच्या सुमारे ४०० हून अधिक स्टोरीज संकलित केल्या आहेत. हे संकलनाचे काम पुढेही चालूच राहील. हे जे विकल्प  मांडले जात आहेत त्यांच्याकडे अदभूत म्हणून  न पाहता त्यांचे मातीशी, माणसाशी जुळलेले नाते मांडणे हा विचार या संकलनामागे आहे. केवळ भलामण न करता, या पर्यायांच्या लाभ आणि मर्यादा या दोन्ही पातळ्यांवर चर्चा घडविल्या जात आहेत. या चर्चांमध्ये सध्याच्या आर्थिक, राजकीय सामाजिक व्यवस्थेमधील कमजोऱ्यांवर चर्चा करण्यात कमी वेळ खर्च करीत सारे लक्ष पर्यायांच्या मांडणीवर केंद्रित करण्यात येत आहे. पोस्टर, फोटो प्रदर्शन, फिल्म्स, दृक-श्राव्य माध्यमे, नाट्य व अन्य कला या माध्यमांतून या प्रयत्नांची देवाणघेवाण या विकल्प संगमाद्वारे केली जात आहे. या सर्व अर्थाने विकल्प-संगम हे सकारात्मक भूमिकेचे नव्याने उघडण्यात आलेले एक विशाल दालन आहे असेच म्हणता येईल. प्रचलित विनाशकारी व विषमताधीष्ठीत विकासासमोर  यथायोग्य आणि समर्थ असे पर्याय मांडणे, मानवी समूह, दळणवळण, समाज व संस्कृती, उर्जा, शिकणे व शिक्षण, ज्ञान व विज्ञान, प्रसार माध्यमे, पर्यावरणीय अर्थव्यवस्था, अन्न आणि  पाणी, आरोग्य व स्वच्छता, पर्यायी राजकारण, पर्यावरण व परिसंस्था इ. विविध विषयांवरील पर्यायांची  देवाणघेवाण यानिमित्ताने  केली जात आहे.

‘विकल्प संगम’ची कल्पना मांडण्यात पुढाकार घेतला तो पुण्यातील ‘कल्पवृक्ष’ या संस्थेने. अशीष कोठारी हे या ‘कल्पवृक्ष’ संस्थेचे प्रमुख आहेत. त्यांनी ही संकल्पना मांडण्यात पुढाकार घेतला आणि देशभरातील सामाजिक कार्यातील काही अग्रणी गटांनी एकत्र येऊन कोअर गट स्थापन केला. या कोअर गटात कल्पवृक्ष, डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटी (डी.डी.एस.), भूमी कॉलेज, शिक्षांतर, टिम्बक्टू कलेक्टिव, डेव्हलपमेंट अल्टरनेटिव्ज, सोपेकोम, जीन केम्पेन, भाषा, कृती टीम, सेंटर फॉर ईक्विटी स्टडीज (सी.ई.एस.), उरमूल, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, पीपल्स सायन्स इन्स्टिट्यूट (पी.एस.आय.), माटी, अलायन्स फॉर सस्टेनेबल आणि होलिस्टिक अग्रिकल्चर (आशा), एकता परिषद, साउथ एशिअन डायलॉग ऑन इकोलोजीकल डेमोक्रसी (एस.ई.डी.ई.डी.), नॉलेज इन सिविल सोसायटी इ. गटांचा सामावेश आहे. हा कोअर गट लोकतांत्रिक पद्धतीने ‘विकल्प संगम’ची प्रक्रिया साकारीत आहे.

‘विकल्प संगम’मध्ये सामील होण्याचे, त्यात अधिक रंग भरण्याचे आवाहन रुची असलेल्या सर्वांनाच आहे.

विकल्प संगम – संपर्क :
अशीष कोठारी – [email protected]
सुजाता पद्मनाभन – [email protected]
राशी मिश्रा – [email protected]

लेखकाशी संपर्क
९४२३०४७६२०

Story Tags: , , , , , , , , , , , , , , , , ,

Leave a Reply

Loading...