आदिवासींकडून शिकण्या-समजण्यासारखे काही: 'lessons from a tribal community-- Melghat' Vipul Shaha (in Marathi)

By विपुल शहा on Nov. 26, 2017 in Perspectives

(Aadivasinkadoon Shiknya-samajnyaasaarkhe kaahee)

२५ सप्टेंबर २०१६

अमरावती जिल्ह्यातील धामणी व चिखलदरा या दुर्गम तालुक्यांचा, निसर्ग सौंदर्याने नटलेला, सातपुडा पर्वताच्या डोंगर-दऱ्यांचा प्रांत म्हणजे मेळघाट. लहानपणी शाळेमध्ये भूगोल शिकताना या भागाची पुसटशी ओळख झाली होती. नंतर काही सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करताना मेळघाटातील कुपोषण व बालमृत्यू या समस्यांबद्दल ऐकले होते. यंदाच्या पावसाळ्यात मेळघाटात प्रत्यक्ष जाऊन तेथील 'कोरकू' या आदिवासी लोकांसोबत राहण्याची व तेथे आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्याची संधी मला लाभली. पुणे येथील "मैत्री" ही संस्था दर पावसाळ्यामध्ये "धडक मोहिमेचे" आयोजन करते. 

महाराष्ट्रातून युवा स्वयंसेवक दहा-दहा दिवसाच्या तुकडीने या मोहिमेत सहभागी होतात. अशाच एका धडक मोहिमेत सहा जणांच्या तुकडीमध्ये मी सहभागी झालो. 'हिलडा' नावाच्या छोट्याश्या, साधारणतः ३-४ शे लोकवस्ती असलेल्या गावामध्ये एका आदिवासी कुटुंबामध्ये आम्ही राहिलो. तो आमचा 'बेस कॅम्प' होता. त्या गावाच्या आसपास असणाऱ्या सभोवतालच्या पाडयांना (वस्त्यांना) रोज साधारणतः ५ ते १० कि.मी. पायी चालून भेट द्यायची. घरोघरी जाऊन तेथील लोकांशी चर्चा करायची व एकंदरित त्यांना आरोग्यविषयक साधे सोपे घरगुती उपचार सुचवायचे. तसेच गरज भासेल तिथे प्राथमिक औषधे पुरवायची, असे साधारणतः कामाचे स्वरूप होते. आरोग्याबरोबरच शिक्षण, अंधश्रद्धा, कुटुंबनियोजन, प्रशासकीय सुविधा अशा विविध विषयांबाबत जागृती, समुपदेशन व विचारांची देवाणघेवाण होता असे. कोरकू हे आदिवासी तसे मितभाषी, स्वभावाने काहीसे लाजरे व शांत पण तितकेच जिव्हाळा व आपुलकी दाखवणारे, येणाऱ्या व्यक्तीचे आदरातिथ्य करणारे. अमरावती पलीकडचे जगच माहीत नसलेले बहुतांश कोरकू, आम्ही  पुण्याहून आलो आहोत म्हटल्यावर जणू कुठल्या दुसऱ्याच देशाचे रहिवासी असू असा कित्येकांचा समाज. मराठी ऐवजी कोरकू ही त्यांची भाषा तसेच मध्य प्रदेश सीमेनजीकचा प्रदेश असल्याने थोडीफार हिंदीदेखील त्यांना येत होती व आम्ही त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधू शकत होतो. भाषा, प्रांत, संस्कृती यांमध्ये इतका फरक असून देखील त्यांनी आम्हाला चटकन आपलेसे केले. आरोग्य जागृती मोहिमेच्या पुढे जाऊन कित्येकांशी अनौपचारिक जवळीकीचे नाते निर्माण झाले व अल्पशा कालावधीतच एका आगळ्यावेगळ्या अशा, पण आपल्याच बांधवांचा परिचय झाला.

आजपर्यंत ऐकलेल्या मेळघाटाचा शापित, अंधश्रध्दा, दारिद्र्य, अडाणीपणा, कुपोषण, बालमृत्यू यांनी ग्रासलेला प्रांत अशा एका ओळखीला काहीसा तडा गेला व या प्रांतामध्ये, लोकांमध्ये उपजत असणारे गुण, तसेच चांगुलपणाच्या, प्रेरणादायी, सकारात्मक अशा काही गोष्टी समोर आल्या, त्या इथे विशेषतः नमूद कराव्याशा वाटतात. 

 • या आदिवासी गावामध्ये एकाही घराला कुलूप आढळले नाही. भीती व गुन्हेगारी याची कुठे चाहूल सुद्धा भासली नाही. यदाकदाचित काही वाद-विवाद झालाच तर तो गावाची “पंचायत” भरून वडीलधाऱ्या मंडळींच्या मार्गदर्शनाने, सर्वसामंजस्याने मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. स्त्रियांना एक मानाचे व आदराचे स्थान आहे. या समाजामध्ये हुंडा पद्धत नाही. 

 • पिढीजात पद्धतीने हे आदिवासी शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. निसर्गाच्या सान्निध्यात राहून त्यांनी आपली अतिशय निसर्गस्नेही जीवनशैली टिकवून ठेवली आहे. स्थानिक पद्धतीने, उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक संसाधनांचा स्वत:च्या अगदी तुटपुंज्या गरजांपुरताच वापर केल्यामुळे येथील  नैसर्गिक संपत्तीचे जतन झालेले दिसते. ज्याला आपण ‘इको-फ्रेंडली’ किंवा ‘हरित जीवनशैली’ असे म्हणतो ती आदिवासी लोक अगदी स्वाभाविकपणे जगत असतात. 

 • त्यांची छोटीशी पण टुमदार घरे, शेण, बांबू, माती, दगड यांपासून बनविलेली. कचरादेखील नैसर्गिकरीत्या विघटित होणारा व त्यामुळे शेतीमध्ये खत म्हणून उपयोगी पडणारा.

 • पैशाची उणीव असली तरीदेखील स्वयंपूर्ण व स्वाभिमानी असे राहणीमान, स्वतःच्या प्राथमिक गरजा स्थानिक पातळीवर भागविता येतील इतकी कौशल्ये पिढी दरपिढी चालत आलेली. 

 • सारा गाव, शेजारी पाजारी, सगळेच एकमेकांचे सखे सोयरे. आपआपसातील नातेसंबंध, परस्परावलंबन, एकमेकांच्या नडीआडीला लगेच धावून येण्याची वृत्ती हीच यांची मोठी संपत्ती व खरी ‘सिक्युरिटी’ (सुरक्षितता). प्रत्यक्ष उदाहरण सांगायचे झाले तर, एका जणांच्या शेतीमध्ये रानडुकरांचा त्रास होत होता तर त्यांना पकडण्यासाठी ८-१० मंडळी पहाटेपासून प्रयत्न करीत होती. 

 • सर्वच घरे ‘कोरकू’ समाजाची व  एकसारखे राहणीमान असणारी, त्यामुळे कुठे जात-पात किंवा उच्च-नीच असा भेदभाव आढळला नाही. 

 • जीवनाची गती अगदी शांत, संथ, निसर्गचक्रशी मिळती-जुळती असणारी त्यामुळे कुठे ताणतणाव, धावपळ किंवा हेवेदावे नाहीत; अतिहाव यामुळे उद्भवणारे मनोविकार नाहीत. रोजच्या शरीराकाष्टामुळे  त्यांच्यामध्ये काटकपणा तसेच रोगप्रतिकार क्षमता आधिक. 

 • आधुनिक, औपचारिक शिक्षण जरी कमी असले तरीदेखील लहान मुले अगदी कळत-नकळत गावकऱ्यांकडून सहज खेळता बागडता, कामात मदत करता करता अनुभवातून खूप काही सतत शिकत राहतात. दिवसभर मुले कुठे आहेत, काय करत आहेत याची चिंता पालकांना नसते कारण सारं गाव हेच एक कुटुंब असल्यासारखे गुण्यागोविंदाने राहतं. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे: It takes a village to raise a child (एक मूल वाढवणं यासाठी एक गाव लागते.) ती म्हण मेळघाटमध्ये खऱ्या  अर्थाने साकार होताना दिसते. 

 • केवळ बौद्धिक विकास नव्हे तर कित्येक प्रकारे कुशलतेने हातांचा उपयोग करणे आदिवासी लोक जाणतात. बांबू व सागाच्या लाकडांपासून अनेक कलाकुसरीच्या तसेच दैनंदिन उपयोगाच्या वस्तू घरोघरी अजूनही बनवल्या जातात.

 • प्रत्येक गोष्ट बौद्धिक तर्कवितर्क किंवा चर्चा याद्वारे समजून घेण्यापेक्षा हे लोक प्रत्यक्ष अनुभवातून, कृतीतून चटकन  आत्मसात करतात. कदाचित त्याचमुळे कोरकू भाषेत फारफार तर १५०० ते १६०० असे मोजकेच शब्द आहेत. 

 • त्यामुळे आमच्या मोहिमेमध्ये आम्ही गाणी, गोष्टी, पथनाट्ये याद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. 

 • एका तान्ह्या बालकाला ताप आला असता त्यास मीठ टाकलेल्या गरम-गार पाण्याचा लपेट करायचे प्रात्यक्षित जेव्हा त्याच्या आईला दिले तेव्हा तिने ते चटकन अमलात आणले. त्यांची निरागसता व विश्वासू आणि श्रद्धाळू स्वभाव यांमुळे कोरकू लोक खूप लगेच आपलेसे होतात व आलेल्या परप्रांतीयांचे हृदयही जिंकतात. 

 • अशा दुर्गम भागामध्ये जाऊन काम करणारे फार कमी असतात. तेथे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष असते असा माझा समज होता. परंतू इथे विशेष उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे पवन बोके या राहू गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये नियुक्त झालेल्या शिक्षकचा. वय केवळ २८ परंतू गेली चार वर्षे हे शिक्षक राहूमधल्या शाळेमध्ये अक्षरश: वाहून घेऊन काम करत आहेत व त्यांच्या अथक प्रयत्नांतून या शाळेचा पट केवळ ६ विद्यार्थ्यावरून ३५ पर्यंत पोहोचला आहे. तसेच मेळघाटातील पहिली डिजिटल शाळा हा प्रकल्प ते यशस्वीपणे राबवत आहेत. शाळेच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये देखील समाज प्रबोधन घडवून आणण्याचे कार्य पावन यांनी हाती घेतेले आहे. आणखी दोन सरकारी कर्मचाऱ्यांचा इथे उल्लेख करावासा वाटतो, ते म्हणजे डॉ. विद्या व डॉ. किरण वाथोडकर, ज्यांनी निवृत्तीपूर्वीच्या दोन वर्षांसाठी स्वतःहून मेळघाटामध्ये बदली करून घेतली. येथील चुरणी या गावातील प्राथमिक आरोग्यकेंद्राचे नेतृत्व ते समर्थपणे पाहतात. तेथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा तुटवडा असूनदेखील या दांपात्याने होता होईल तेवढे सेवेचे अखंड काम चालू ठेवले आहे व आलेला रुग्ण उपचाराशिवायच माघारी जाता कामा नये या निश्चयाने ते काम करत आहेत. यांच्यासारखे कित्येक unsung heroes मेळघाटात विखुरलेले असणार. ही आम्हा युवा लोकांना मोठी प्रेरणेची बाब आहे. डॉ. सुनील कोल्हे व डॉ. आशिष सातव ही नावेदेखील अशावेळी आशेचे किरण म्हणून समोर येतात. 

 • इतक्या साऱ्या उपलब्धी व चांगुलपणाच्या बाबी असूनदेखील मेळघाटाचे चित्र वेगाने बदलत आहे. 

 • जागतिकीकरण, औद्योगिकरण, शहरीकरण, सुखासीनता, चंगळवाद, आधुनिक विकास याचे वारे या प्रदेशालाही लागले आहेत. येथील मुले इंग्रजी शिक्षणासाठी दूर-दूरच्या सरकारी आश्रमशाळांमध्ये जाऊ लागली आहेत. नोकरीच्या शोधात युवक गाव सोडून मोठमोठ्या शहरांकडे धाव घेत आहे. जसजशी गावांमध्ये वीज पोहोचत आहे तसतसे टीव्ही, मोबाईल व त्याद्वारे बाह्यजगातील चांगल्या-वाईट गोष्टी, जाहिराती यांचा प्रभाव हळूहळू येथील समाजावर होताना दिसतो. पारंपारिक सेंद्रिय शेतीकडून आता रासायनिक शेतीकडचा ओढा येथीही वाढला आहे. वयस्कर लोकांना ठाऊक असलेल्या पौष्टिक रानभाज्या व औषधी वनस्पती यांचे ज्ञान आता तरुण पिढीपाशी दिसणे दुरापास्त  होत चाललेले आहे.

 • ज्यावेळी दोन किंवा अधिक संस्कृती परस्परांना येऊन भेटतात त्यावेळी त्या निश्चितच एकमेकांवर प्रभाव टाकतात. परंतु त्याचे  परिणाम नेहमी चांगलेच असतील याची खात्री देता येत नाहे. 

 • दळणवळण व आधुनिक संपर्क सुविधांमुळे जग जरी जवळ येत असले तरीदेखील एकमेकांकडून चांगले घेणे, तसेच हजारो वर्षे शाश्वत राहिलेल्या संस्कृतीला, भाषेला न गमावणे यासाठी विशेषतः आपल्यासारख्या बाहेरून तेथे जाणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याची गरज आहे. आपण त्यांना काही शिकवण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी, एक उच्चभ्रू/ विकसित आहोत (Superior) या भावनेने  तिथे न जाता, किंवा केवळ पर्यटनाच्या हेतूने तिथे त्यांच्या जीवनाचा समतोल ढासळेल असे वर्तन न  करता खऱ्या अर्थाने एका कुतूहलाच्या, आदराच्या, परस्पर संवाद, जाणीव, संवेदनशीलता वृद्धिंगत होईल व चांगुलपणाची देवाणघेवाण होईल या नात्याने आदिवासी बांधवांशी एकात्मकतेने भेटलो तर खऱ्या अर्थाने असे अनुभव, आपल्या आयुष्याला परिवर्तनशील बनवू शकतात व या पृथ्वीच्या, मानवतेच्या शाश्वतीसाठी आधारभूत ठरू शकतात. तसेच अनिर्बंध विकासातून उद्भवणाऱ्या अनेक विकृती टळू शकतात.

धडक मोहिमेबद्दल अधिक माहितीसाठी “मैत्री” पुणे यांचाशी संपर्क साधावा -०२०-२५४५०८८२   (maitri1997@gmail.com)

लेखकाशी संपर्क

प्रथम प्रकाशन - वनस्थळी मासिक  Story Tags: collectivism, community, community conservation, disprivileged, education, poverty, secure livelihoods, social issues, sustainability, learning, literacy

Comments

There are no comments yet on this Story.

Add New Comment

Fields marked as * are mandatory.
required (not published)
optional
Explore Stories
marginalised secure livelihoods conservation environmental impact learning womens rights conservation of nature tribal human rights biodiversity energy rural economy governance millets agrobiodiversity sustainable consumerism education environmental issues rural seed diversity activist ecological empowerment Water management sustainability sustainable prosperity biological diversity Nutritional Security technology farmer community-based forest food livelihoods movement organic agriculture organic seeds collectivism adivasi traditional agricultural techniques eco-friendly values peace economic security alternative development farmers Food Sovereignty community supported agriculture organic infrastructure indigenous decentralisation forest wildlife farming practices agricultural biodiversity environmental activism organic farming women empowerment farming social issues urban issues food sustainable ecology commons collective power nature seed savers environment community youth women seed saving movement natural resources nutrition equity localisation Traditional Knowledge Agroecology waste food security solar traditional farms Tribals water security food production gender innovation alternative education well-being water alternative learning agriculture ecology self-sufficiency security health participative alternative designs waste management women peasants forest regeneration culture sustainable eco-tourism ecological sustainability art solar power alternative approach community conservation
Stories by Location
Google Map
Events