पुण्यात श्वासासाठी शुद्ध हवा नको का? (in Marathi)

By Shweta Vernekar NavlakhaonJan. 20, 2022in Environment and Ecology

हवेच्या प्रदूषणात देशातल्या एकूण १४२ शहरांची स्थिती Air Quality Index या राष्ट्रीय मानकांनुसार खालावलेली आहे. अशा प्रदूषित हवेच्या शहरांत पुण्याचाही समावेश होतो. त्याविषयी …

पुण्यात जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी बागेच्या बाहेर लावलेला बिल बोर्ड

आपण सतत श्वासोच्छवास करतो; पण श्वासावाटे जी हवा शरीरात घेतो तिचा विचार आपण कितीदा करतो? भोवतालच्या हवेच्या गुणवत्तेवरच आपल्या आयुष्याची गुणवत्ता अवलंबून असते, तरीही हवेच्या शुद्धतेचा विचार फारसा होत नाही. या दुर्लक्षाची फार मोठी किंमत आपण चुकवत आहोत. २०१९ मध्ये हवेच्या प्रदूषणाशी संबंधित कारणांमुळे मृत्यु पावलेल्या भारतातील लोकांची संख्या १.६७ दशलक्ष एवढी मोठी आणि पूर्ण जगात सर्वात जास्त आहे. या मनुष्यहानीबरोबरच प्रदूषणामुळे देशाचे २५०० अब्जांहून अधिक आर्थिक नुकसानही झाले आहे. जगातल्या सर्वाधिक प्रदूषित ३० शहरांत भारतातील २२ शहरांचा समावेश होतो.

कदाचित ही सगळी माहिती तुम्हाला नसेलही. पण त्यामुळे त्याचे दुष्परिणाम होण्याचे थांबत नाही. दरवर्षी हिवाळ्यामध्ये दिल्लीच्या प्रदूषणाच्या बातम्या माध्यमातून दाखवल्या जातात. धूर, धुकं, प्रदूषण मापनाचे आकडे, बंद शाळा, रूग्णांची आणि मृतांचीही वाढती संख्या इत्यादी प्रदूषणाचे भयावह परिणाम समोर येतात. हिवाळा ओसरतो तसं या बातम्या मागे पडतात, प्रश्नाचंही गांभीर्य ओसरतं. सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन व्यवहार चालू राहतात. पण लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येवर तात्कालिक उत्तरं देऊन भागणार नाही.

शहरात चांगल्या पद्धतीने राहता येण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी लागतात, म्हणजे शुद्ध पाणी, चांगले रस्ते, वीजपुरवठा, मैदाने, बागा इत्यादीं आणि यामध्ये शुद्ध हवेचाही समावेश करायला हवा. अलिकडे राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यातही त्याचा उल्लेख असत, पण उपाययोजना वरवरच्याच असतात. प्रदूषणाला अनेक घटक कारणीभूत असल्याने हवा प्रदूषण हा कठीण विषय आहे. शहरांमधील उद्योगधंद्यापासून ते वाहतूक, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन, शहराचे हरित आच्छादन यांचा प्रदूषणाशी घनिष्ठ संबंध आहे. या सर्वांचा विचार करून तज्ज्ञांच्या सहाय्याने शास्त्रीय पद्धतीने नियोजन, कृतीची आखणी करून सातत्याने त्याची अंमलबजावणी केली गेली पाहिजे. याची सुरुवात जाणीवजागृतीपासून होईल. निर्णयकर्ते, लोकप्रतिनिधी यांनी प्रदूषणाविषयी सजग व्हायला हवं आणि लोकांनाही सजग करायला हवं. 

हवा प्रदूषणाचा गुंतागुंतीचा विषय नागरिक, मुले, अधिकारी, लोकप्रतिनिधी आदींना सहज समजावा या हेतूने पुणे महानगरपालिका आणि परिसर संस्थेने फुफ्फुसाची ही मोठी प्रतिकृती शहरात लावण्याचे ठरवले आहे. ह्या बिलबोर्ड चे नाव – ‘स्वच्छ हवा, माझा हक्क’ असे असून, लोकांना अधिक माहिती घेण्यास, या प्रश्नाची चर्चा करण्यास उद्युक्त करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या प्रतिकृतीला जरूर भेट द्या. स्थळ – जंगली महाराज रस्ता, संभाजी बागेच्या बाहेर, २५ डिसेंबर २०२१ ते १० जानेवारी २०२२. वेळ – बिलबोर्ड २४ तास तिथेच असून, कधीही तुम्ही पहायला येऊ शकता.

प्रथम प्रकाशन दैनिक लोकमत २ जानेवारी २०२२

Also read Punekars Are Keen On Reducing Air Pollution In The City Through Sustainable Mobility

Story Tags: , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading...
%d bloggers like this: