क्रांतिकारी परिवर्तनाच्या दिशेने: भारतामधल्या विकल्प संगम प्रक्रियेचे दशक  (In Marathi)

By आशिष कोठारी (Ashish Kothari)onDec. 11, 2024in Economics and Technologies

(Krantikari Parivartanachya Dishene: Bhartamadhlya Vikalp Sangam Prakriyeche Dashak)

(सीमा काकडे यांनी इंग्रजीतून अनुवादित केले आहे) (Translated from English by Seema Kakade)

दहा वर्षांपूर्वी भाषातज्ञ आणि अभ्यासक-कार्यकर्ता गणेश देवी यांच्याशी मी चर्चा करत होतो. भारतामधे पर्यायी विकासासाठी काम करणाऱ्या विविध व्यक्ती, संस्था, गट आणि संघटनांना एकत्र आणण्याच्या, म्हणजेच ‘विकल्प संगम‘ या कल्पनेचा जन्म याच चर्चेमध्ये झाला. अनेक संस्था आणि व्यक्ती मुख्यप्रवाही विकासामुळे होणाऱ्या पर्यावरणीय विनाश आणि स्थानिकांच्या विस्थापनाच्या विरोधात आवाज उठवतात; न्याय आणि पर्यावरणीय शहाणीव यांची कास धरून मानवी गरजा आणि आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचे पर्यायी मार्ग व पद्धती वापरतात, किंवा अशा प्रयत्नांना चालना मिळावी यासाठी प्रयत्न करतात. अशा अनेक संस्था, संघटना आणि व्यक्तींपर्यंत आम्ही ‘विकल्प संगम’ची कल्पना पोचवली. 

लोकतंत्र विकल्प संगम, स्कूल फॉर डेमोक्रेसी, राजस्थान, अक्टूबर 2019

या कल्पनेला भरभरून प्रतिसाद मिळाल्यामुळे अशा संस्थ- संघटनांना एकत्र आणण्याच्या प्रमुख उद्दिष्टाने २०१४ मधे ‘विकल्प संगम’ (विकासाच्या क्षेत्रातील पर्यायांचा संगम) ची स्थापना करण्यात आली, याला आता एक दशक पूर्ण झाले आहे, त्यामुळे या प्रक्रियेचा आढावा घेऊन पुढच्या टप्प्याचे नियोजन करण्याची वेळ आलेली आहे; नोव्हेंबर २०२४ मधे राष्ट्रीय पातळीवरील संगमही त्यासाठीच आयोजित केला होता. त्यानिमित्ताने, या प्रक्रियेतून काय घडले आहे किंवा नाही याची माझ्या दृष्टिकोनातून मांडणी या लेखामध्ये केली आहे. 

विकल्प संगम प्रक्रियेमागील प्रेरणा काय होती? 

पितृसत्ता, भांडवलवाद, जातीयता, वंशवाद आणि पर्यावरणाचा विनाश करणारी, आर्थिक दृष्ट्या अन्याय्य आणि समाजाची वीण विस्कटून टाकणारी मानव-केंद्रितता यासारख्या समाजात घट्ट रुजलेल्या सत्ता-संरचना आणि सत्ता-संबंधांच्या विरोधात जगभरातल्या जन-चळवळी संघर्ष करत आलेल्या आहेत. अधिक चांगल्या जगाच्या शोधाला पूरक अशा प्रचलित जीवन पद्धतींना वाचवण्याचे प्रयत्न करणारा विरोध अतिशय महत्त्वाचा आहे, पण तो पुरेसा मात्र नाही. अनेक पारंपरिक जीवन पद्धतींमधे लिंगभाव (जेंडर), जात, वंश, क्षमता इत्यादींवर आधारित असमानता आहेत; शिवाय, प्रतिकूल अशी सरकारी धोरणं, लोकसंख्येत होणारे बदल आणि नव्या पिढीचे वेगळे दृष्टिकोन यासारख्या घटकांमुळे पारंपारिक जीवन जगण्याच्या मूलभूत गरजा आणि रास्त अशा आकांक्षा पूर्ण होतातच असं नाही. या आणि यासारख्या मुद्द्यांचे निराकरण होण्यासाठी पारंपारिक, तसेच नव्या संकल्पना आणि पद्धतींमधून पुढे आलेले  रचनात्मक पर्याय गरजेचे आहेत. 

अनेक वेळा सामाजिक चळवळी त्यांच्या त्यांच्या विशिष्ट वर्तुळांमध्ये चालू असतात. या वैविध्यपूर्ण चळवळींना, तसेच चळवळींमधील  आंतरछेदिततेला (intersectionality) समजून घेऊन त्यांना एकत्र कसे आणायचे? जागतिक पातळीवरील राजकीय, पर्यावरणीय आणि सामाजिक पेचप्रसंगांना सामूहिकपणे कसे सामोरे जायचे? पृथ्वीची कचऱ्याप्रमाणे वासलात न लावता मानवी गरजा आणि आकांक्षा कशा पूर्ण करायच्या? ‘अधिक चांगल्या उद्या’ ची आपली संकल्पना आणि दृष्टी नेमकी काय आहे? समस्यांची ‘उत्तरं’ समस्या निर्माण करणाऱ्या व्यवस्थेलाच बळकटी आणणारी नसावीत (उदाहरणार्थ हरितक्रांती, कार्बनचा व्यापार, अगदी शाश्वत विकासही जोपर्यंत त्यात वाढीव उत्पादन केंद्री, भांडवली किंवा राज्य(नियंत्रण)वादी दृष्टिकोनांना मुळापासून आव्हान केलेले नसेल) याची खातरजमा कशी करायची? अशा प्रश्नांना भिडणे हा प्रकल्प संगम प्रक्रियेचा गाभा आहे. 

विकल्प संगमचे मुख्य काम 

विकल्प संगम प्रक्रियेच्या कामाचे पाच प्रमुख भाग आहेत: १) दस्तावेजीकरण, २) दृश्यमानता, ३) दूरदृश्यावलोकन (व्हिजनिंग), ४) सहयोग, आणि ५) धोरणवकिली 

१) दस्तावेजीकरण: बहुआयामी अशा पर्यायी विकास-प्रयत्नांना समजून घेण्यासाठी, त्यांना दाद देण्यासाठी आणि या प्रयत्नांमधून शिकण्यासाठी त्यांचे नीट दस्तावेजीकरण करणे अतिशय गरजेचे असते. विकल्प संगम प्रक्रियेच्या दस्तावेजीकरण या भागात अशा पर्यायी विकास-प्रयत्नांबाबत छोटी टिपणे/लेख लिहवून घेणे, किंवा पत्रकार वा संशोधक-लेखकांना, अथवा त्या-त्या प्रयत्नांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींनाच लिहून पाठवायला सांगणे; अशा कामांवरचे लघुपट, ज्या पर्यायी विकास-कामांमधून येणारी तथ्ये आणि प्रक्रिया अशा दोन्ही स्तरांवर खूप शिकण्यासारखे असेल अशा कामांच्या सविस्तर केस-स्टडीज (व्यष्टी अध्ययन) करणे यांचा समावेश असतो. याचे एक उदाहरण म्हणजे, कोविडच्या अवघड काळात न डगमगता, चिकाटीने आणि खंबीरपणे टिकून राहिलेल्या समूहांच्या अनुभवांचे दस्तावेजीकरण; यातील ७० अनुभव कथा ‘सामान्य लोकांचे असामान्य प्रयत्न’ या सदरामध्ये प्रकाशित झाल्या होत्या. 

२) दृश्य मानता आणि विविध गटांपर्यंत पोहोचणे: केवळ दस्तावेजीकरण करणे पुरेसे नसते. अशा नोंदी आणि केस स्टडीज विविध गटांपर्यंत पोहोचणे देखील महत्त्वाचे असते. त्यामुळेच दृश्यमानता आणि विविध गटांपर्यंत पोहोचणे हा विकल्प संगम प्रक्रियेतील कामाचा दुसरा भाग आहे. विकल्प संगमची वेबसाईट हे यासाठीचे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या वेबसाईटवर आजपर्यंत जवळजवळ दोन हजार अनुभव कथा, दृष्टिकोन स्पष्ट करणारी टिपणे/लेख आणि सकारात्मक परिवर्तनाच्या प्रयत्नांवरील शंभरपेक्षा जास्त माहितीपट प्रकाशित झालेले आहेत. या वेबसाईटचा वापर प्रामुख्याने इंग्लिश येणाऱ्यांपुरता मर्यादित राहिला आहे, ही खेदाची गोष्ट आहे; हे सर्व दस्तावेज वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याचे प्रयत्नही चालू आहेत. 

विविध गटांपर्यंत पोहोचण्यासाठी विकल्प संगमच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांमध्ये – फिरते पोस्टर प्रदर्शन, शाळा कॉलेज आणि इतर संस्थांमध्ये सादरीकरण, वेगवेगळ्या पुस्तिका आणि सचित्र कथा-कादंबऱ्या यांचा समावेश आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून विकल्प संगम प्रक्रियेत तयार झालेल्या पुस्तक, फिल्म्स इ.चा वेगवेगळ्या सोशल मीडियावरही प्रसार केला जातो आहे. मुख्यप्रवाही छापील आणि ऑनलाइन माध्यमांपर्यंत हे साहित्य पोचण्याचे प्रमाण आणि स्वरूप मात्र मर्यादित आणि अनियमित आहे. यामागे, माध्यमांचा वेगवेगळे घोटाळे, राजकारण, खेळ फॅशन यासारख्या विषयांवर असलेला भर, त्याचप्रमाणे माध्यमांमधील योग्य संपर्क व्यक्तींपर्यंत पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी, अशी दोन्ही कारणे आहेत.

३) देवाण-घेवाण आणि सहयोग: विकल्प संगम प्रक्रियेच्या कामाचा तिसरा प्रमुख भाग म्हणजे देवाण-घेवाण आणि सहयोग.‌ विविध व्यक्ती, संस्था-संघटनांबरोबर तीन-चार दिवसांचे प्रत्यक्ष संगम – एकत्र भेटणे सगळ्यात जास्त उत्साहवर्धक असते. २०२४ नोव्हेंबर पर्यंत विविध राज्यांमध्ये आणि प्रांतांमध्ये जवळजवळ ३० संगम झालेले आहेत. ऊर्जा, अन्न, युवा, लोकशाही, जगण्याबद्दलचे पारंपारिक दृष्टिकोन, पर्यायी अर्थव्यवस्था, आरोग्य, न्याय आणि सार्वजनिक हित, पारंपारिक शासन पद्धती आणि मध्य भारतातील शांतता अशा विविध विषयांवर हे संगम घेण्यात आले.‌ या संगमांमध्ये गंभीर चर्चांबरोबरच, क्षेत्रीय भेटी, प्रत्यक्ष कृती, पर्यायी उत्पादनांचे प्रदर्शन यांचाही समावेश असतो. विकल्प संगमांमध्ये आतापर्यंत विविध सामाजिक-नागरी संस्था-संघटना, शेती करणारे, पशुपालक भटके, हाताने वेगवेगळ्या वस्तू तयार करणारे आणि जमीन-आधारित उद्योग करणारे विविध समूह, तसेच विविध क्षेत्रातील व्यावसायिक, राजकारणी आणि सरकारी अधिकारी त्यांच्या (वैयक्तिक पातळीवर) आणि पर्यायी उद्योग करणारे गट सहभागी झाले आहेत. 

अनेक गट त्यांच्या बंदिस्त कोषात गुरफटलेले असतात. त्यांच्या बंदिस्तपणाला छेदण्याचा प्रयत्न करत, आंतर-क्षेत्रीय आणि आंतर-सांस्कृतिक देवाणघेवाणीला आणि विचारविनिमयाला चालना देणे हा विकल्प संगमच्या आरेखनाचा मुख्य पैलू आहे. ‘मूलनिवासी आणि इतर समूहांचे जगाकडे बघण्याचे दृष्टिकोन: २०२३’ या विकल्प संगमच्या दरम्यान आदिवासी/मूलनिवासी, तसेच भटके पशुपालक समूह आणि शेती करणाऱ्या बिगर-आदिवासी समूहांशी झालेला संवाद, ही माझ्या ठळक आठवणीपैकी एक. अशीच दुसरी आठवण आहे ‘नॉर्मल’ समजल्या जाणाऱ्यांना `नॉर्मल’ न समजल्या जाणाऱ्यांना कोण-कोणत्या प्रश्नांना सामोरे जावे लागते, याची जाणीव करून देणाऱ्या शारीरिक अक्षमता असणारी एका व्यक्तीची आणि एका LGBTQ+ व्यक्तीबरोबर झालेल्या संवादाची. 

सहभागींच्या प्रतिक्रिया पुरेशा मिळत नसल्याने सहजपणे लक्षात आले नाही, तरी विकल्प संगमच्या निमित्ताने होणाऱ्या गाठीभेटी आणि विचारविनिमयातून भरीव असे सहयोगाचे प्रकल्प उभे राहतात, आणि त्यातून मूलभूत कामे अधिक सखोल आणि व्यापक बनतात; उदाहरणार्थ, पश्चिम हिमालयामध्ये झालेल्या संगमांमधून एकमेकांकडून शिकण्यासाठी एका विचार-विनिमय कार्यक्रमाची सुरुवात झाली; सध्या ही तीन वर्षांची प्रक्रिया तिथले स्थानिक गटच स्वतंत्रपणे चालवतात. युवांना कसा समाज हवा आहे, ते कसा समाज घडवण्यासाठी काम करतायत, हे पुढे आणण्यासाठी विविध क्षेत्रांमधल्या आणि भौगोलिक परिसरांमधल्या, तसेच संस्कृतींमधल्या युवांबरोबरची बहुवर्षीय प्रक्रिया २०१७ मध्ये झालेल्या ‘युवा संगम’ मधून सुरू झाली आहे. 

४) सामूहिक दृश्यमानता: सामूहिक दृश्यमानता हा विकल्प संगम प्रक्रियेच्या कामाचा चौथा भाग आहे. भारतीय समाजातल्या विविध समाज-घटकांमध्यल्या अनेक वर्षांपासूनच्या द्रष्ट्या आवाजांना समान मुद्यांसाठी एकत्र आणण्याचा प्रयत्न या भागात केला जातो. या द्रष्ट्या आवाजांमधे शेतकरी, पशुपालक, मच्छीमार-कोळी, औद्योगिक कामगार, हस्तकला व्यावसायिक यांच्या आवाजांचाही समावेश असतो. हे सगळे ‘ फिल्डवर काम करणारे’, तर केवळ  बौद्धिक काम करणारे शहरी लोक  ‘विचारवंत’ मानले जातात. (अशा आकलनाची मुळे काही अंशी आपल्या समाजात घट्ट रुजलेल्या लिंगभाव आणि जातींच्या उतरंडीतही असतात). ही फसवी दुभागणी मोडून काढणे हे विकल्प संगम प्रक्रियेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. 

असे संकल्पचित्र उभे करण्यासाठी ‘मूलगामी पर्यायांचा शोध: मुख्य पैलू आणि तत्वे‘ हा विकल्प संगम प्रक्रियेतून तयार झालेला) दस्तऐवज एक महत्त्वाचे साधन आहे. २०१४ मध्ये याचा पहिला मसुदा तयार करण्यात आला. तेव्हापासून अनेक संगमांमधून ते आतापर्यंत (सातव्या ‘अवतारा’ पर्यंत) तो उत्क्रांत होतो आहे. या मसुद्यामध्ये एका भागात विकल्प संगमच्या दृष्टिकोनातून पर्याय म्हणजे नेमके काय तसेच परिवर्तनाच्या पाच एकमेएकीत गुंतलेल्या  पाकळ्यांबाबत आणि इतरही आशयाची मांडणी आहे. (अधिक सविस्तर पुढील चर्चेच्या दरम्यान) 

नास (बार्ली) उत्सव सहभागी, विकास संगम प्रक्रिया लडाख, सप्टेंबर २०२२

५) धोरण वकिली: धोरण वकिली हा विकल्प संगमच्या कामाचा पाचवा आणि शेवटचा भाग. धोरण प्रक्रियेवर प्रभावीपणे परिणाम करू शकतील एवढी राजकीय जाण असलेला समूह नसेल, तर प्रस्थापित मुख्यप्रवाही व्यापक अशा राजकीय आणि आर्थिक ताकदींना आव्हान देता येणार नाही, याची विकल्प संगमच्या सदस्यांना जाणीव आहे. आतापर्यंतच्या विविध संगमांमध्ये झालेल्या विचार-विनिमयातही धोरणात्मक शिफारसींचा समावेश होता. उदा. २०१६ मधे झालेल्या राष्ट्रीय अन्न संगममधील सहभागी सदस्यांनी समूह आधारित शेतीच्या बाजूने आणि जनुकीय परिवर्तित (जेनेटिकली मॉडिफाइड) मोहरीला विरोध करण्याचे प्रयत्न करण्याबाबत जाहीरनामा घोषित केला. स्थानिक पातळीवरील पर्यावरणीय आणि सामाजिक न्यायासाठीच्या लढ्यांना पाठिंबा देणारी अनेक निवेदने विविध संगमांमधून जारी करण्यात आली आहेत; उदाहरणार्थ, – कश्मीर आणि लडाखच्या दर्जामध्ये संवैधानिक (घटनात्मक) बदल करणे, लक्षद्वीप मधील जनतेमध्ये सांप्रदायिकता पसरवण्याचे प्रयत्न, आरोव्हिले मधील शासकीय हस्तक्षेप, मणिपूर मधील वांशिक संघर्षग्रस्त परिस्थितीमध्ये शांततेसाठी तातडीने प्रयत्न करण्याची गरज आणि कोविडनिर्मित आपत्तीमध्ये न डगमगता, चिकाटीने आणि जिद्दीने उभे राहणाऱ्या समूहांच्या अनुभवातील तथ्ये. 

२०१९ मधे आणि नंतर २०२४ मध्ये प्रकाशित केलेला ‘Peoples Manifesto for Equitable, Just, Sustainable India’ हा धोरण-वकिलीसाठीचा सर्वाधिक महत्त्वकांक्षी प्रयत्न होता. (‘समतावादी, न्याय्य आणि शाश्वत भारतासाठी जनतेचा जाहीरनामा’ हा या दस्तावेजाचा मराठीतील अनुवादही नुकताच प्रकाशित झाला आहे) या जाहीरनाम्यामधे भारतापुढील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि पर्यावरणीय प्रश्नांबाबत तपशीलवार शिफारसी केलेल्या आहेत. राजकीय पक्षांनी त्यांच्या निवडणूक प्रचारात या मुद्द्यांचा वापर करावा असे अपेक्षित आहे; शिवाय राज्य पातळीवरील निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्था ते राज्य पातळीवरील धोरण वकिली यासाठीही त्या वापरल्या जाव्यात; आणि या शिफारसी आणि त्यामागील विश्लेषण सामाजिक व नागरी संस्था, संघटनांनी त्यांच्या कामामध्ये  मार्गदर्शक म्हणून वापरावे, असा या जाहीरनाम्यामगील उद्देश आहे. 

जन सरोकर प्रक्रियेसारख्या राष्ट्रीय पातळीवरील अन्य नेटवर्क बरोबर देखील विकल्प संगम प्रक्रिया जोडलेली आहे. 

तात्त्विक आणि क्षेत्रीय चाकोऱ्या ओलांडताना 

विकल्प संगमच्या संकल्पनात्मक आराखड्यामध्ये एकमेकींमधे गुंतलेल्या पाच पाकळ्यांच्या ‘परिवर्तनाच्या फुलाची ‘ संकल्पना केलेली आहे. पहिल्या पाकळीचे क्षेत्र लोकशाही व्यवस्थेची सध्याच्या प्रस्थापित उदारमतवादी व्यवस्थेकडून मुक्तता करण्याबाबत आहे, ज्यात राजकीय प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हाती केंद्रित असलेल्या सत्तेकडून ‘स्वराज्याकडे’ किंवा मूलगामी लोकशाहीकडे वाटचाल होणे अपेक्षित आहे. 

जैविक आणि पर्यावरणीय भूभागांशी पर्यावरणीय एकात्मता व जोडलेपणा, आणि मानवेतर निसर्गाचा आदर करणे – ही आहे परिवर्तनाच्या फुलाची दुसरी पाकळी. तिसरी पाकळी आर्थिक लोकशाहीकरण आणि स्थानिकीकरणाची आहे. चौथी पाकळी सामाजिक न्याय आणि समतेसाठीच्या लढ्यांची संघर्षाची आहे; तर संस्कृती, ज्ञान आणि जनसमुहाचे वैविध्य टिकवणे ही परिवर्तनाच्या फुलाची पाचवी पाकळी आहे. 

या फुलाच्या गाभ्यामध्ये मूलगामी परिवर्तनाच्या प्रयत्नांमधे सामावली जाणारी, बढावा दिली जाणारी नैतिक मूल्ये आणि तत्त्वे आहेत; यामधे – सामूहिक जबाबदारी आणि देवाणघेवाण, निसर्गात आणि निसर्गाबरोबर जगणे, ऐक्य, परस्परभाव, वैविध्य, सन्मान आणि समावेशकता, मानवी आणि इतर हक्क यासारख्या मूल्यांचा आणि तत्त्वांचा समावेश आहे. यशस्वी उपक्रम-प्रयत्न जास्तीत जास्त ठिकाणी पोचवणे हा अगदी ठरलेला भांडवली वा राज्यवादी दृष्टिकोन आहे; खेदाची गोष्ट अशी की अनेक एनजीओजनी देखील हा दृष्टिकोन स्वीकारलेला आहे. या  प्रचलित दृष्टिकोनाऐवजी नैतिक मूल्ये आणि तत्त्वांना अनुसरून असे प्रयत्न विविध गटांपर्यंत पोचवायला हवेत; असे हजारो वैविध्यपूर्ण गट एकमेकांकडून त्या-त्या प्रयत्नांमागील तत्त्वे समजून घेऊन त्यांच्या-त्यांच्या खास वैशिष्ट्यपूर्ण संदर्भांशी सुसंगत असे उपक्रम करतील, आणि व्यापक परिणामासाठी त्यांच्या-त्यांच्या पातळीवर विविध व्यक्ती आणि गटांशी जोडूनही घेतील (नेटवर्क करतील). शाश्वत आणि जैविकदृष्ट्या वैविध्यपूर्ण शेती किंवा विकेंद्रीत जलसंधारण, वा अधिक प्रत्यक्ष-थेट लोकशाहीचे प्रयोग यासारख्या उदाहरणांमध्ये असे घडतानाही दिसते.  

विशेष म्हणजे, संगम प्रक्रियेच्या अवकाशात पारंपारिक तात्त्विक निर्बंधही सैलावताना दिसतात. कडवे गांधीवादी,  मार्क्सवादी, स्त्रीवादी, दलित-आदिवासी, नैसर्गिक हक्कवादी आणि इतर कडवे दृष्टिकोन असलेले असे बहुतेक वेळा एकमेकांच्या भूमिकांच्या विरोधात असणारे सहभागी सदस्यदेखील विकल्प संगम प्रक्रियेमध्ये अर्थपूर्ण आणि सकारात्मक संवाद करू शकतात. संगमांमधील वातावरण मतभेदांमधून मार्ग काढण्याचे, किंवा मतभेद मोकळेपणाने मान्य करण्याचे, समान मुद्द्यांच्या, विशेषतः तत्त्वांच्या आधारे पुढे जाण्याचे असते. विकल्प संगम साठी येणारे सहभागी विविधतेचा आदर राखण्याकडे जास्त कल असणारे असतात, त्यामुळेही विभिन्न आणि टोकाच्या भूमिका असलेल्या व्यक्ती व गटांमध्येही संवाद होणे शक्य होत असावे; किंवा असेही असू शकते की, पर्यायांवरील चर्चेत एक प्रकारची सकारात्मकता असते, त्या उलट, प्रश्न आणि टीका यावर भर देणाऱ्या चर्चांमध्ये नकारात्मकता असते. तिसरे आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे, थेट गाव किंवा वस्ती पातळीवर काम करण्याच्या अनुभवांमुळे सहभागींच्या चर्चांना किंवा एकत्र काम करणाऱ्या गटांना चळवळीतील कार्यकर्ते किंवा शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती ज्या विचारधारा किंवा वादांमध्ये (isums) सामान्यतः अडकतात, त्या पलीकडे जाऊन परस्परसंवादी आणि आंतरछेदी होणे भाग पडते.

विकल्प संगम प्रक्रियेत राजकीय हद्दी लवचिक करण्याबाबतची चर्चा आणि संकल्पना -आरेखानाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. थोड्या लवचिक, शिथिल राजकीय हद्दींमुळे दक्षिण आशियातील देशा-राज्यांमधे, आणि भारतातील राज्ये/जिल्ह्यांमधे सध्याच्या कठोर हद्दींमुळे विस्कळीत-खंडित झालेले पर्यावरणीय, सांस्कृतिक, आणि आर्थिक प्रवाह पुनर्स्थापित करायला मदत होईल. ऑक्टोबर २०१९ मधे झालेल्या `लोकशाही’ या विषयावरील विकल्प संगममधे ‘दक्षिण आशिया जैव-प्रादेशिकता कार्यकारी समिती’ स्थापन करण्याचा प्रस्तावही पुढे आला होता; तेव्हापासून विविध राजकीय हद्दींमधील जैव-प्रादेशिकता किंवा जैव-प्रादेशिकतेशी जोडलेल्या बाबींचे दस्तावेजीकरण, तसेच संकल्पना-आरेखन करणारे अहवाल नियमितपणे प्रसॄत होत आहेत. 

विश्लेषण-साधनांच्या विकासाची आणि जागतिक पातळीवरील नेटवर्किंगची सुरुवात 

विकल्प संगम प्रक्रियेच्या याआधी उल्लेख केलेल्या संकल्पना-आरेखनातून २०१७ मधे पर्यायी विकासप्रयत्न करणाऱ्या सर्वांसाठी पर्यायी परिवर्तनाचा आराखडाही पुढे आला आहे. या आराखड्याच्या आधारे त्यांना आपापला पर्यायी विकास-प्रयत्न किती एकात्मिक, सुसंगत, सर्व-समावेशक आहे, त्यात काय उणीवा आहेत आणि अजून काय प्रयत्न करता येतील हे समजून घेणे सोपे होईल. `शैक्षणिक आणि चळवळीतील (प्रतिनिधी द्वारे) पर्यावरणीय न्यायाबाबतच्या ज्ञानाची सहनिर्मिती’ या जागतिक प्रकल्पाचा भाग म्हणून हा आराखडा विकसित केला गेला. विकल्प संगममधील आणि बाहेरील अनेक संस्थांकडून आणि काही विद्यापीठाकडून चिकित्सक आत्मपरीक्षण करण्यासाठी आणि कृती-संशोधनासाठी हा आराखडा वापरला गेला आहे. 

विकल्प संगम प्रक्रिया जगातील वेगवेगळ्या भागातील समविचारी नेटवर्क आणि व्यासपीठांशी देखील जोडलेली आहे; यातूनच २०१९ पासून ‘पर्यायांचा जागतिक (वेल बुट्टीदार) पट ( टॅपेस्ट्री)’ सुरू झाला. आता विकल्प संगमही टॅपेस्ट्रीमधील इतर विणकारांपैकी (कोलंबिया, मेक्सिको, आणि दक्षिण-पूर्व आशिया येथील विणकर) एक आहे, आणि इतर सदस्यांबरोबरच्या सामूहिक कृतींमधे आणि शिकण्याच्या परस्परसंवादी प्रक्रियेमध्ये सहभागी आहे. 

प्रचलित व्यवस्थेला छेद देणारी संरचना आणि प्रक्रिया 

प्रकल्प संगम प्रक्रिया ही संस्था नाही, तर एक नेटवर्क किंवा व्यासपीठ आहे. त्याची संरचना बरीचशी अनौपचारिक आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत  ८५ पेक्षा जास्त संस्था आणि संघटना विकल्प संगमच्या राष्ट्रीय सर्व साधारण सभेच्या सदस्य आहेत. सुरुवातीची काही वर्षे कल्पवृक्ष संस्थेमध्ये या प्रक्रियेचे केंद्र होते. त्यानंतर दहा सदस्यीय ‘संचलन समितीकडे’ समन्वय आणि निमंत्रकाच्या भूमिकांचे काही प्रमाणात विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. प्रत्येक विकल्प संगम चे आयोजन या समितीमधील तसेच बाहेरील एक किंवा त्यापेक्षा जास्त संस्थांकडून (सामान्यतः सदस्य संस्था किंवा संघटनांकडून) केले जाते.

विकल्प संगमच्या अंतर्गत प्रक्रियांमध्ये देखील मूलभूत तत्त्वे आणि मूल्ये अंगिकारली जातात. विकल्प संगमच्या प्रत्यक्ष कार्यक्रमांसाठी पुढील मानके निश्चित करण्यात आली आहेत:- सर्वांचा सहभाग (ज्यात बोलायला घुटमळणाऱ्या सदस्यांवर जास्त भर असेल), प्लास्टिक आणि इतर अविघटनशील कचरा करणाऱ्या वस्तू जास्तीत जास्त टाळणे, स्थानिक खाद्य पदार्थांचा जास्तीत जास्त वापर, सुरक्षित वातावरण, ज्यात लैंगिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या छळाला आणि भेदभावाला थारा नसेल. 

विकल्प संगम प्रक्रियेत ‘सर्वसामान्य’ लोकांची कल्पकता, चिकाटी, नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याची, सहकार-एकत्र येण्याची आणि पेच-प्रसंगांना सामोरे जाण्याची, त्यावर उत्तरे-मार्ग शोधण्याची क्षमता ‘साजरी करण्याचा’ प्रयत्न केला जातो. एवढेच नाही, तर चांगल्या समाजाची संकल्पना मांडणं हा ‘औपचारिक तज्ञांचा विशेष अधिकार’ नाही, हेही या प्रक्रियेत दाखवून दिलं जातं. अगदी कुठेही असलेल्या, कोणत्याही वयाच्या, वैविध्यपूर्ण संस्कृतींमधल्या आणि उपजीविकेची कामं करणाऱ्या, शिकण्याच्या आणि शिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरच्या – निसर्ग किंवा शेत, किंवा शाळा-कॉलेजच्या वर्गातल्या लोकांचं ज्ञान, शहाणपण आणि अनुभव एकत्र करून हे काम करता येऊ शकतं. असं करतानाच ज्ञाननिर्मिती आणि त्यावर आधारित कृती करण्याच्या पारंपारिक, वसाहतवादी आणि केंद्रित-श्रेणीबद्ध पद्धतींनाही तडा जातो. 

गेल्या काही दशकांपासून काही प्रमुख सहभागी सदस्य हे शिकले आहेत, की ‘अंतिम साध्याइतकीच प्रक्रियाही महत्त्वाची आहे’. आपल्याला प्रक्रिया जितकी लोकशाही, सहभागी, वैविध्यपूर्ण आणि उत्साहवर्धक करता येईल, तितकी, अपेक्षित उद्दिष्टांपैकी किमान काही उद्दिष्टे साध्य करण्याची, तसेच काही अनपेक्षित फायदे मिळण्याची शक्यताही जास्त. शिवाय जरी आपल्या कामांपैकी काहींचा भर राज्यस्तरीय धोरणांवर प्रभाव टाकण्यावर असला, तरीही, अंतिमतः सर्वसामान्य जनतेच्या सशक्तिकरणातूनच परिवर्तनाच्या प्रक्रियेला गती मिळू शकते, आणि अर्थपूर्ण सहभागाच्या प्रत्यक्ष प्रक्रियेतच सशक्तिकरण फार मोठ्या प्रमाणात घडून येते. 

लेखकाशी संपर्क साधा. Contact the author.

या लेखाची इंग्रजी आवृत्ती प्रथम 4 सप्टेंबर 2024 रोजी काफ़िलाने प्रकाशित केली होती.

Story Tags: , , , , , ,

Leave a Reply

Loading...