कोल्हापुरात आहे प्रदूषणमुक्तीचे आदर्श मॉडेल; धुण्याची चावी, तलाव (In Marathi)

By उदय गायकवाडonJun. 25, 2022in Environment and Ecology

Kolhapurat Aahe Pradushanmuktiche Adarsh Model; Dhunyachi Chavi, Talav

जगाला मार्गदर्शक ठरू शकेल, अशी ही वास्तू तिच्या मूल्यांसह जपली पाहिजे.

कोल्हापूर :  रंकाळा परिसरातील धुण्याची चावी हे एक बदलत्या काळातही प्रदूषणमुक्तीचे आदर्श मॉडेल म्हणून ओळखले जाते. नदी व तलावाचे प्रदूषण रोखणारी ही आदर्श व्यवस्था जलव्यवस्थापन शास्त्रातील अनुकरण व अभ्यासण्याची बाब असल्याचे डॉ. राजेंद्रसिंह राणा व अनेक दिग्गजांनी पाहिल्यावर नमूद केले आहे. आज फारसा वापर होत नसला तरी जगाला मार्गदर्शक ठरू शकेल, अशी ही वास्तू तिच्या मूल्यांसह जपली पाहिजे.

प्रदूषणामुळे नद्या, तलावांचे अस्तित्व संपत आले, अशी स्थिती देशात आणि देशाबाहेर सर्वत्र आहे. कोल्हापूरने ते अनुभवले आहे. मात्र, येथील लोकांइतकी जाणीव लोकांना इतरत्र नाही. रंकाळ्यासारख्या तलावाचे प्रदूषण होऊ नये, म्हणून तो बांधण्यापूर्वी कोल्हापूरचे राज्यकर्ते सजग होते. 

त्यांनी त्या काळात रंकाळा तलावात लोक आंघोळ करणे, कपडे धुणे, जनावरांना धुणे यासाठी आले तर पाण्याची प्रत चांगली राहणार नाही, याचा विचार केला होता. तलावात अशी कृती करण्यास निर्बंध होते; मात्र पर्यायी व्यवस्था पुरवली होती. १८८३ मध्ये रंकाळा तलावाला भिंत बांधण्याचे काम सुरू झाले. त्याच वेळी तेथील पाणी उताराने शेतीला देण्याचे नियोजन होते. त्याचबरोबर आंघोळ करणे, कपडे धुणे, जनावरांना धुणे या कामासाठी स्वतंत्र जागा निवडली. जाऊळाचा गणपती मंदिर ते दारूभट्टी रस्त्यावर साधारण शंभर मीटर अंतरावर धुण्याच्या चाव्या हा परिसर विकसित केला गेला.

इथे टॉवरखाली असलेल्या वाहिनीतून पाणी उताराने येते. त्याला वीज लागत नाही. ते एका चावीने सोडता येते. त्यानंतर कपडे धुण्यासाठी नळ असून त्या खाली दगडात कोरलेले बादलीसारखे कुंड किंवा चौकोनी कुंड आहे. त्यासोबत कपडे धुण्यासाठी व बसण्यासाठी प्रत्येकी वेगळा दगड आहे. नको असेल तेव्हा कुंडाचे छिद्र लाकडाची खिट्टी, कापड, नारळाची शेंडी घालून बंद करता येत असल्याने पाण्याचा योग्य वापर होतो. जनावरे धुणे व पाणी पाजणे यासाठी बाजूला तीन दगडी हौद आहेत. पूर्वेकडील बाजूस अशीच रचना व पाण्याचा पुरवठा केलेली छोट्या आकाराची उघडी न्हाणीघरे आहेत. त्याला कापडाचा आडोसा करून आंघोळ करता येत असे. या सर्व रचनेत जातीनुसार, स्त्रियांच्या मासिक पाळीच्या काळात वापरासाठी सोय केली जाई, असे सांगितले जाते. वापर झालेले पाणी त्या काळात फारसा साबणाचा वापर नसल्याने पुन्हा पुढे शेतीला वापरले जात असल्याने नदी प्रदूषणात वाढ होत नव्हती.

वास्तूचे मूल्य जपणे गरजेचे

नदी व तलावाचे प्रदूषण रोखणारी ही आदर्श व्यवस्था जलव्यवस्थापन शास्त्रातील अनुकरण व अभ्यासण्याची बाब असल्याचे डॉ. राजेंद्रसिंह राणा व अनेक दिग्गजांनी पाहिल्यावर नमूद केले आहे. आज फारसा वापर होत नसला तरी जगाला मार्गदर्शक ठरू शकेल अशी ही वास्तू आपण तिच्या मूल्यांसह जपली पाहिजे.

संपादन- अर्चना बनगे

प्रथम प्रकाशन ई सकाळ १९ नोव्हेंबर २0२0

Also Read a related story published by Bhavatal on 06 May 2022

Story Tags: , , , ,

Leave a Reply

Loading...