पवित्र निर्माल्य : गणेशोत्सवात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन (In Marathi)

By Manisha ShethonOct. 28, 2025in Environment and Ecology

मनीषा शेठ यांनी विकल्प संगम साठी खास लिहिलेले.

अश्विनी पाटील यांनी इंग्रजीतून भाषांतरित केले आहे.

(Pavitra Nirmalya: Ganeshotsav Nirmaan Honaarya Ghancharyache Vyavasthapan)

मराठीमध्ये निर्माल्याचा अर्थ म्हणजे देवतांना वाहिलेली सामग्री. हा शब्द धार्मिक विधींमध्ये पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यासाठी वापरला जातो, ज्यामध्ये भाविकाची श्रद्धा दडलेली असते. म्हणजे फुले, फळे, मिठाई, वेगवेगळे गंध, धूप आणि वस्त्र या सगळ्यांचा समावेश असलेले साहित्य कचरा होऊ शकत नाही, कारण ते एका भक्ताने श्रद्धेने आणि प्रेमाने देवाला वाहिलेले असते. त्यामुळेच याचे पावित्र्य जपण्यासाठी पारंपरिक पद्धतीनुसार हे साहित्य नद्यांमध्ये विसर्जित केले जाते. 

देवाची मूर्ती ही निर्माल्याचा भाग नसते कारण भक्त तिची विधीवतपणे प्राणप्रतिष्ठा करतात आणि तिला मूर्त स्वरुप प्राप्त होते. दहा दिवसांचा उत्सव संपल्यानंतर, मूर्ती पाण्यात किंवा मातीत विसर्जित करून पुन्हा निसर्गाला बहाल केली जाते. 

पारंपरिक पद्धतीनुसार पूर्वी मूर्ती नैसर्गिक साहित्य वापरून साकारल्या जात होत्या आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी किंवा विसर्जनाच्या दिवशी त्या पाण्यामध्ये विसर्जित केल्या जात होत्या. कारण त्या पाण्यात विघटित होत असत आणि त्यातील घटक नैसर्गिक प्रणालीद्वारे शोषले जात होते. पण अलिकडच्या काळात अनेक बदल झाले आणि मूर्तींसाठी अविघटनशील पदार्थांचा वापर केल्याने त्या पाण्यात विघटित होणे कठीण झाले आहे. विषारी रासायनिक रंगांचा वापर नैसर्गिक जलसाठ्यांना देखील प्रदूषित करतो आणि सागरी जीवांना हानी पोहोचवतो. जर मूर्ती पूर्णपणे विसर्जित झाली नसेल आणि तिचे अवयव ठिकठिकाणी विखुरलेले असतील तर तिची विटंबनाच होते.

शाडू माती ही चिकणमाती असून पश्चिम महाराष्ट्रातील मूर्तीकार मूर्ती तयार करण्यासाठी ती वापरतात. ही माती उन्हामध्ये लवकर सुकते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येते आणि पाण्यात सहजपणे विघटित होते. या मातीचं उत्खनन गुजरात राज्यातून केले जाते. पण आता तिचा पुरवठा कमी होत चालला आहे. पाण्यात विसर्जित केलेली ही माती पुन्हा वापरता येऊ शकते आणि मूर्तीकार मूर्ती तयार करण्यासाठी ती पुन्हा वापरण्याचा प्रयत्नही करू शकतात. 

गणेशोत्सवामध्ये विसर्जनासाठी येणाऱ्या लाखो गणेशमुर्तींचे व्यवस्थापन करणे हे भारतातील प्रमुख शहरांच्या महानगर पालिकांसमोरील मोठे आव्हान आहे, कारण त्या मूर्ती इतर कोणत्याही घनकचऱ्यासारख्या हाताळता येत नाहीत. हिंदू समुदायांकडून त्यांचा आदर आणि काळजी करण्याची मागणी केली जाते. म्हणूनच त्यांची विशेष हाताळणी आवश्यक असते.

ही समस्या मोठी आहे कारण मूर्तींची संख्या लाखोंच्या घरात असते. नद्या आणि तलावांमध्ये मूर्तींचे विसर्जन केले जाऊ नये म्हणून पुणे महानगर पालिकेने सुरुवातील नैसर्गिक जलसाठ्यांच्या काठावर कृत्रिम विसर्जन तलाव बांधले. नागरिकांनी ज्या गणपतीच्या मूर्ती नदीकाठावर विसर्जित करण्यासाठी आणल्या होत्या त्यांना त्या मूर्ती कृत्रिम तलावामध्ये विसर्जित करण्यासाठी प्रोत्साहित केले जात होते. यामुळे दशकभरापूर्वी सरकार आणि धार्मिक समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला होता. कारण या समुदायांना मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन मान्य नव्हते. तर दुसरीकडे शहरातील सांडपाण्याने प्रदूषित झालेल्या नद्यांमध्ये आपल्या मूर्तीचे विसर्जन करणंही नागरिकांना उचित वाटत नव्हते. नैसर्गिक जलसाठ्यांजवळ असलेले हे कृत्रिम तलाव अडचण निर्माण करणारे होते. त्यामुळेच उत्सवाच्या शेवटच्या दिवशी भाविक विसर्जन तलाव वापरण्याला नकार देण्याची आणि नदीकाठी लावलेले बॅरिकेड ओलांडून विसर्जन करण्याची शक्यता होती.

कालांतराने सामाजिक उपक्रम आणि अनेक स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने जागरुकता वाढली आणि भाविकांनी या कृत्रिम तलावांना स्वीकारायला सुरुवात केली. कोविड लॉकडाउन दरम्यान गर्दी टाळण्यासाठी, शहर हद्द परिसरात जास्त विसर्जन तलाव तयार करण्यात आले. या नियोजनामुळे नागरिक तिथपर्यंत सहज पोहोचू शकले. तसेच फिरत्या कृत्रिम टाक्यांचीही व्यवस्था करण्यात आली. ज्यामुळे हा पर्याय अधिकच सोपा झाला. गर्दीवर उपाय म्हणून भाविकांना घरीच गणपती विसर्जन करण्याची विनंती करण्यात आली आणि नदीकाठावर गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले.  

या मूर्तींचे पुढे काय होते?

पुणे महानगर पालिकेकडे अनेक वर्षांपासून या मूर्ती पुरण्यासाठी कचरा डेपो व्यतिरिक्त दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळेच नागरिकांकडून होणारी तीव्र टिका टाळण्यासाठी रात्रीच्या अंधारात या मूर्ती शहराबाहेरील बंद पडलेल्या खाणींमध्ये टाकण्याचे काम केले जात होते.

अलिकडच्या काळात, उत्सव पूर्णपणे कचरामुक्त करण्यासाठी गणेश मूर्तींचा पुनर्वापर आणि त्यांच्यावर पुनर्प्रक्रिया करण्याचे काम सुरू झाले आहे. विसर्जनाच्यावेळी भाविकांनी मूर्ती तीन वेळा पाण्यात बुडवावी आणि अधिकाऱ्यांना ती आदराने बाजूला ठेवावी या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सूचनेला नागरिकांनी प्रतिसाद दिला. मूर्ती हाताळताना घेतलेली काळजी आणि सावधगिरीमुळे भाविकांच्या मनात विश्वास निर्माण झाला आणि त्यांनी या उपक्रमात सहकार्य करायला सुरुवात केली.

तथापि, पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया फक्त अशा मूर्तींसाठी शक्य आहे ज्या खंडलेल्या नाहीत. ५० टक्क्याहून जास्त मूर्ती खराब होतात आणि त्या फेकून द्याव्या लागतात. २०२२ आणि २०२३ मध्ये खाणीला भेट दिल्यावर असे दिसून आले की मूर्ती विसर्जन करताना पावसाळ्याचे दिवस असतात. तेव्हा खाणीत पाणी साचलेले असते. मात्र जेव्हा हे पाणी आटते तेव्हा मूर्ती दिसू शकतात. यासाठी देखील एक वेगळी प्रणाली वापरली जाते ती म्हणजे पाणी आटल्यानंतर मूर्ती दिसू नयेत म्हणून त्या रेती किंवा माती टाकून झाकल्या जातात. 

काही साहित्य पुन्हा मिळवून ते पुरवठा साखळीत परत आणण्याचे हे प्राथमिक प्रयत्न स्रोतापासून वेगळे करून वाढवता येतात. जे नागरिक आधीपासून माती किंवा शेण यासारख्या जैवविघटनशील पदार्थांचा वापर करत आहेत त्यांना स्वच्छ पाण्यात घरी विसर्जन करण्याची विनंती केली जाते. नंतर ते पाणी त्यांच्या बागेत किंवा कुंडीत लावलेल्या झाडांमध्ये टाकण्याची विनंती केली जाते. पण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा प्रश्न तसाच राहतो.

२०१५ मध्ये एनसीएलच्या शास्त्रज्ञांनी प्रोत्साहित करून, पीएमसीने प्लास्टर ऑफ पॅरिसचे गाळात रूपांतर करण्यासाठी अमोनियम बायकार्बोनेट वापरण्याची कल्पना मांडली. गाळ खत म्हणून वापरला जाऊ शकतो आणि पर्यावरणासाठी हानीकारक देखील ठरणार नाही. यासाठी रासायनिक पावडरचे पाकिट मोफत वाटून भाविक ज्या पाण्यात पीओपी मूर्ती विसर्जित करतील त्या पाण्यात टाकण्याचे आवाहन केले जात होते. या कल्पनेची दुसरी बाजू अशी होती की यामुळे पीओपी मूर्तींचा वापर सुरू राहिला आणि पीओपीवर बंदी घालण्याच्या काम करणाऱ्या काही संघटनांनी माघार घेतली. काही वर्षांनंतर मात्र सरकारने ही कल्पना चुकीची असल्याचे आणि मोठ्या प्रमाणात पीओपीचे खतात रूपांतर करणे अशक्य असल्याचे लक्षात घेऊन हा उपक्रम बंद केला.

अखेर २०२० मध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने विसर्जनासाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली ज्यात विसर्जनासाठी असलेल्या मूर्तींमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रासायनिक रंगांचा वापर करण्यास मनाई होती. ही बंदी व्यापकपणे लागू केल्यास, मूर्तींसाठी नैसर्गिक मातीचा वापर पुन्हा होऊ शकतो. माती ही पीओपीपेक्षा अधिक चांगली असते, कारण ती पाण्यासोबत सहजपणे विघटित होते आणि कमी प्रमाणात, नैसर्गिक घटकांद्वारे पुन्हा शोषली जाऊ शकते. तथापि, जेव्हा मातीच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये विसर्जित केल्या जातात तेव्हा त्या जलसाठ्यांच्या तळाशी एक अभेद्य थर तयार करतात.

२०२१ मध्ये इकोएक्झिस्टने पुनर्वर्तन मोहीम सुरू केली. ज्यामध्ये विसर्जनानंतर भक्तांनी ही नैसर्गिक माती गोळा करून मूर्तीकारांना पुनर्वापरासाठी परत पाठवण्याचे आवाहन केले गेले. या प्रयत्नाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि २०२२ मध्ये, स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवकांच्या प्रयत्नांनी सुमारे २३००० किलो माती गोळा करून मूर्तीकारांना परत पाठवली गेली. २०२३ मध्ये, भारतातील ८ शहरांमध्ये ही मोहीम सुरू करण्यात आली आणि त्याला आणखी गती मिळाली.

मुंबईतील मंत्रालयात पुनर्वर्तन प्रदर्शन, २०२३ फोटो: इकोएक्झिस्ट

मूर्तीकारांना नैसर्गिक माती खरेदी आणि मोफत वाटपाचा पर्याय म्हणून पुनर्वर्तन मोहीम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आली. २०२३ मध्ये महाराष्ट्र सरकारने मूर्तीकारांना पीओपी मातीपासून मातीकडे वळण्यास प्रोत्साहित करण्यासाठी मोफत माती वाटण्यासाठी १.८ कोटी रुपये राखून ठेवले. महाराष्ट्राच्या पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांनी प्रोत्साहन देऊन, पुणे महानगरपालिकेने पुण्यातील मोहिमेला पाठिंबा दिला.

पुण्यातील घनकचरा व्यवस्थापन पथकाच्या २०० कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते आणि अशा प्रकारचे संकलन शक्य करण्यासाठी कोणत्या प्रणाली राबवाव्या लागतील याबद्दल चर्चा करण्यात आली. उत्सवादरम्यान सार्वजनिक विसर्जन स्थळांना भेटी दिल्यानंतर लक्षात आले की, या स्वयंसेवकांना प्रत्यक्षात काम करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. मुसळधार पाऊस, गर्दी आणि प्रचंड गोंधळ यामुळे विसर्जन स्थळी येणाऱ्या भाविकांशी कोणत्याही प्रकारची चर्चा करणे अशक्य असते. काही गटांनी पीओपी आणि मातीच्या मूर्तीचे वेगवेगळे विसर्जन करण्याचा मुद्दा मांडला जेणेकरून मूर्तीचे संकलन करणे सोपे होईल. विसर्जन टाक्यांची क्षमता मर्यादित असल्याने उत्सवाच्या दिवशी ते वारंवार रिकामे करावे लागतात. ही प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी मूर्ती संकलन आणि वाहतुकीची एक मजबूत व्यवस्था असणे आवश्यक असते. शहरातील विसर्जन तलावांसाठी पाण्याची आवश्यकता असते. तसेच मातीच्या मूर्ती लवकर विघटित होत असल्याने पाणी देखील वारंवार बदलावे लागते.

तरीही आव्हानांचा सामना करत पुणे महानगरपालिका सार्वजनिक विसर्जन व्यवस्थेद्वारे सुमारे ५ टन मातीचा गाळ गोळा करू शकली. हा गाळ पूर्णपणे स्वच्छ नव्हता कारण त्यात लाल माती, शेण किंवा कागदाचे लगदे आणि बऱ्याचदा काही प्रमाणात पीओपीसारखे इतर विघटन होऊ शकणार नाही असे घटक होते. हे घटक मिसळलेल्या मातीपासून मूर्ती तयार करणे अवघड असते आणि म्हणून इकोएक्झिस्टने इतर पर्यायांचा शोध घेण्यासाठी एक प्रयोग सुरू केला आहे.

अहमदाबादमधील सिरॅमिक कलाकार स्वयंपाकाची भांडी तयार करण्यासाठी त्यांचे कौशल्य पणाला लावत आहेत. अनेक वास्तुविशारद बांधकामात याचा वापर फरशीचे पॅनल, भिंतीचे पॅनल, तलावाचे लायनर, प्लास्टर आणि बांधकाम ब्लॉक्स म्हणून करू पाहत आहेत. चिकणमातीमधील सेंद्रिय घटक, विविध प्रकारच्या चिकणमातीचे मिश्रण, चिकणमाती प्रक्रिया, वाहतूक आणि साठवणुकीची आवश्यकता या आव्हानांमध्ये समाविष्ट आहे. या चिकणमातीचा प्रमुख घटक म्हणून वापर करणारे संमिश्र साहित्य देखील तपासले जात आहे. अंतिम उत्पादनाची किंमत देखील विचारात घ्यावी लागेल. जर हे प्रयोग यशस्वी झाले तर पुनर्वर्तन मोहिमेद्वारे एक नवीन अर्थव्यवस्था स्थापित होऊ शकते.

अखेर प्रत्येक शहरातील महानगरपालिका त्यांच्या घनकचरा व्यवस्थापन योजनांमध्ये या चक्रीय पुरवठा साखळीचा समावेश करू शकतात जेणेकरून सामग्रीचे खरे मूल्य ओळखले जाईल. पुणे महानगरपालिका संकलन प्रक्रियेला मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नांना मार्ग दाखवत आहे. २०२३ मध्ये त्यांनी पुनर्वर्तन राबविण्यासाठी अनेक पावले उचलली ज्यामध्ये,

१. पीओपी आणि मातीच्या मूर्तींसाठी वेगळे तलाव तयार करणे आणि दोन्ही साहित्य एकमेकांमध्ये मिसळणार नाही याची खातरजमा करणे.

२. विसर्जनस्थळी प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे.

३. मूर्ती तसेच मातीसाठी तात्पुरते स्टोरेज शेड निर्माण करणे.

४. मध्यवर्ती स्टोरेज ठिकाणी त्वरित वाहतूक करणे.

५. भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी सर्व पीएमसी प्लॅटफॉर्मद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचणे.

६. साठवणुकीच्या ठिकाणाहून माती गोळा करण्यासाठी कारागिरांना पोहोचवणे किंवा पीएमसीकडून कारागीरांच्या कार्यशाळेत पोहोचवणे.

गणेश चतुर्दशीच्या वेळी देशभरातील महानगरपालिका या आणि तर पर्यायांचा वापर करू शकतात. यामुळे कोट्यवधी रुपये वाचतील आणि उत्सवाचा परिसर स्वच्छ आणि स्वच्छ राहील..

लेखकाशी संपर्क साधा.

Story Tags: , , ,

Leave a Reply

Loading...