मनीषा शेठ यांनी विकल्प संगम साठी खास लिहिलेले.
अश्विनी पाटील यांनी इंग्रजीतून भाषांतरित केले आहे.
(Maativar Punarprakriya Yogya Upaay Aahe? Ganeshotsav Vaparlya Jaanarya Saahityacha Paryavarniya Parinaam Aani Vividh Paryancha Tulnatmak Aadhava)
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०२० मध्ये अखेर गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली आणि प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) व रासायनिक रंगांपासून बनवलेल्या मूर्तींचे नैसर्गिक तलावांमध्ये विसर्जन करण्यावर बंदी घातली. हे एक स्वागतार्ह पाऊल होते कारण अनेक संस्था गेल्या काही वर्षांपासून या घटकांमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येसाठी लढत होत्या. तथापि, ही बंदी धार्मिक उत्सव, विशेषतः गणेशोत्सवाला पूर्णपणे कचरामुक्त उत्सव बनवण्याच्या प्रयत्नांची केवळ सुरुवात होती. या बंदीमुळे अनेक आव्हाने निर्माण झाली आणि आज २०२४ मध्ये, सरकार अजूनही उत्सवासाठी पीओपी मूर्तींच्या निर्मिती आणि वापराला आळा घालू शकले नाही.
सन २०२० मध्ये कोविड लॉकडाउन उठण्याची वाट पाहत असताना, इकोएक्झिस्ट टीमने गणेश मूर्ती बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शाडू मातीचा पुनर्वापर करण्याच्या उद्देशाने प्रयोग करण्यास सुरुवात केली. ही माती प्रामुख्याने नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या बेंटोनाइटपासून तयार होते. ती गुजरात व पश्चिम बंगालमध्ये आढळते आणि तिथून उत्खनन करून महाराष्ट्रात मूर्ती तयार करण्यासाठी आणली जाते. अतिशय मऊ असलेल्या ह्या मातीपासून मूर्ती तयार करण्यासाठी कौशल्य लागते. माती मऊ असल्या कारणाने अनेकदा मूर्तीचे नुकसान होते आणि म्हणूनच ती वापरण्याला कारागीर प्राधान्य देत नाहीत. जेव्हा पीओपी मूर्तींवर बंदी घालण्यात आली तेव्हा मूर्तीकार शाडू मातीचा वापर करण्याला प्राधान्य देतील अशी अपेक्षा होती कारण त्यांना शाडू मातीपासून मूर्ती तयार करण्याची सवय होती.
तथापि, नैसर्गिक चिकणमाती ही पुन्हा तयार करता येत नाही आणि हळूहळू तिचा पुरवठा देखील कमी होत चालला आहे. गणेश मूर्तींसाठी (एक तात्पुरता आणि विल्हेवाट लावता येण्याजोगा) या मातीचा वापर वाढला तरी तिच्या वाढत्या खाणकामामुळे गंभीर पर्यावरणीय परिणामही होऊ शकतात.
असे असूनसुद्धा ही माती पुन्हा वापण्यायोग्य असते, कारण ती भाजली जात नाही. ती केवळ उन्हामध्ये सुकवली जाते जेणेकरून मूर्ती पाण्यात विघटित होऊ शकेल. चौकशी केल्यावर आढळून आले की, कारागीर नियमितपणे मातीचा पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया करतात परंतु मूर्ती तयार करतानाच अनेकदा नुकसान होते. खंडलेल्या मूर्ती पाण्यात भिजवून किंवा सुकलेल्या मूर्तींचे पुन्हा मातीमध्ये रुपांतर करून या चिकणमातीचा पुनर्वापर करणे शक्य होते. या कारागीरांनी माती पुन्हा वापरण्याची तयारी दर्शवली पण, गणशोत्सवानंतर मूर्ती संकलनात सहभागी होण्याची त्यांची परिस्थिती नव्हती.
कारागीरांसाठी या मूर्ती संकलनाचे काम कोण करेल?
या प्रश्नामुळे इकोएक्झिस्ट टीमच्या नेतृत्वाखाली पुनर्वर्तन (पुनर्निर्मिती) नावाची एक नवीन मोहीम सुरू झाली. या माध्यमातून भाविकांना विसर्जन विधीनंतर मातीचा गाळ सांभाळून ठेवण्याचे आणि ते कारागिरांना परत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले. २०२१ मध्ये या आवाहनाला काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि सुमारे ३० किलो माती संकलित करण्यात आली. त्यानंतर पुनर्वापर केलेल्या मातीपासून बनवलेल्या मूर्ती बाजारात स्वीकारार्ह आहेत की नाही हे पाहण्यासाठी कारागिरांना परत करण्यात आली. पुनर्वापर केलेल्या या मूर्तींना भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यातूनच २०२२ मध्ये स्वयंसेवी संस्थांच्या मोठ्या सहभागातून कारागिरांसाठी सुमारे २३००० किलो माती संकलित करण्यात आली. (या मोहिमेविषयी www.punaravartan.org वर अधिक जाणून घ्या). २०२३ मध्ये या नेटवर्कचा अधिक विस्तार करण्यात आला आणि भारतातील ४ राज्यांमधील ८ शहरांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली.
या मातीचा पुनर्वापर करणे हा या समस्येवर योग्य उपाय आहे का?
प्रथमदर्शनी, तात्पुरत्या वापरासाठी पुन्हा तयार केल्या जाऊ न शकणाऱ्या वस्तूंचा वापर करणे योग्य वाटत नाही. पण आपण इतर नवीन तयार केल्या जाऊ शकणाऱ्या विघटनशील आणि कम्पोस्ट करता येऊ शकणाऱ्या पर्यायांचा विचार करायला हवा जसे की शेण किंवा कागदाचा लगदा.
तथापि, अशा उद्योगात साहित्य वापरात टप्प्याटप्प्याने बदल होत जातात, कारण त्यात सहभागी असलेल्या भागधारकांची संख्या जास्त असते आणि त्याचा उपजीविकेवर परिणाम होतो.
मूर्ती तयार करण्यासाठी वापरले जाणारे संभाव्य घटक आणि त्यांच्या भौतिक गुणधर्मांचा तुलनात्मक आढावा खाली पहा.

या साहित्याचा तुलनात्मक आढावा घेतल्यास लक्षात येते की, पीओपीवर बंदी घातली गेली तर कारागीर नैसर्गिक चिकणमातीचा वापर पुन्हा सुरू करण्याची शक्यता आहे, कारण त्यांना या मातीपासून मूर्ती तयार करण्याचा अनुभव आहे आणि त्यासाठी कामगारांना पुन्हा नवीन कौशल्य अवगत करण्याचीही आवश्यकता नाही.
यासाठी, गणेशोत्सव संपल्यानंतर ही माती संकलित करून पुन्हा वापरण्याचा प्रयत्न करणे हा पुढील टप्पा स्पष्ट होतो. भाविकांनी मातीच्या गाळाचा पुनर्वापर करण्याची कल्पना स्वीकारल्याचे दिसून येते आणि त्यांच्यामध्ये उत्सवामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय परिणामांविषयी जागरुकता देखील वाढली आहे.
सन २०२२ आणि २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणात केलेल्या माती संकलनातून माती कशी हाताळली जावी याचेही धडे देण्यात आले ज्यामध्ये पुढील बाबींचा समावेश होता.
नाजूकपणा : पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून काही कारागीर पीओपीच्या मूर्ती संकलित करून त्यांचे नूतनीकरण करून भाविकांना कमी खर्चात उपलब्ध करून देत आहेत. या प्रयत्नांना आता चालना मिळाली असून जुन्या मूर्ती पुन्हा वापरात आणल्या जात आहेत. परिणामी पीओपीच्या मूर्तींची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. मातीच्या मूर्ती मुळात नाजूक असल्याने त्या पीओपीच्या मूर्तींसारख्या अखंड स्वरुपात संकलित करणे शक्य नसते. खंडलेल्या मूर्तीने धार्मिक भावना दुखावतात म्हणूनच गणपती मूर्तींचे संकलन आणि त्यांची हाताळणी हा एक नाजूक विषय ठरतो.
विसर्जन आणि गाळ : यासाठी मातीच्या मूर्तींचे विसर्जन करणे आणि त्याचे गाळात रुपांतर करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेसाठी पाणी आणि जागा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. लहान कारागीरांना हे शक्य नाही त्यामुळे ते विनंती करतात की या मातीवरील प्रक्रिया एकत्रितपणे केली जावी आणि तिचे पुन्हा वितरण करण्यापूर्वी मातीच्या पावडरमध्ये रुपांतर केले जावे.
गुणवत्ता : अंतिम वापरकर्त्यांकडून कापडी पिशव्यांमध्ये थेट माती गोळा केल्याने, माती स्वच्छ ठेवणे आणि ती जवळजवळ नवीन म्हणून कारागिरांना पुनर्वापरासाठी परत करणे शक्य झाले. तसेच महापालिकांकडून व्यवस्थापित केलेल्या कृत्रिम विसर्जन तलावांमधील सार्वजनिकरित्या विसर्जन केले जाते, त्यामुळे त्यात लाल माती, पीओपी, शाडू माती यासारखे विविध घटक मिसळायचे. सार्वजनिकरित्या संकलित केलेली ही माती कारागिरांना पुनर्वापरासाठी योग्य नव्हती त्यामुळे त्यासाठी इतर घटकांद्वारे चाचणी घ्यावी लागली.
वाहतूक : संकलन प्रक्रियेमध्ये अंतिम वापरकर्त्यांकडील माती आणि सार्वजनिक विसर्जन तलावांमधील माती कारागिरांपर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतूकही मोठ्या प्रमाणात करावी लागते.
पुनर्प्रक्रियेचा खर्च : पुनर्प्रक्रियेतील खर्च हा मूर्ती तयार झाल्याच्या शेवटच्या खर्चामध्ये समाविष्ट करावा लागतो किंवा त्यासाठी सरकारकडून अनुदान द्यावे लागते. काही राज्यांमधील सरकार पीओपीचा वापर थांबवण्यासाठी कारागिरांना विनामूल्य माती उपलब्ध करून देत असत. सरकारकडून त्यांना विनामूल्य माती मिळत असल्याने वापरलेली माती वापरण्यासाठी उत्सुक नव्हते. अखेर पीओपीची जागा घेण्यासाठी पुनर्प्रक्रिया केलेल्या उत्पादनाची क्षमता पीओपीच्या बरोबरीची असणे आवश्यक आहे. परंतु हे शक्य नाही.
या आव्हानांना न जुमानता केलेल्या सर्व प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि आता ही मोहीम इतर शहरांमध्येही वाढते आहे. प्रत्येक शहराची स्थिती आणि मूर्तीसाठी वापरली जाणारी माती देखील वेगवेगळी असू शकते. उदा. बंगळुरुमध्ये लाल माती वापरली जाते जी महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या चिकणमाती सारखी नसते. त्यामुळे मोहीम ज्या परिस्थितीत राबवली जात आहे त्यानुसार त्यात बदल करावे लागतील.
अखेरीस, संकलन आणि पुनर्प्रक्रियेची ही पद्धत सरकारच्या घनकचरा व्यवस्थापन प्रणालींमध्ये समाविष्ट केली गेली पाहिजे. पुणे, ठाणे आणि अहमदाबाद या महानगरपालिकांनी पुनर्वर्तन मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली आणि पुण्यामध्ये त्यांच्या महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन टीमने सुमारे ५ टन माती संकलित केली. मातीच्या मूर्तींसाठी स्वतंत्र तलाव, प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण आणि थेट सार्वजनिक संपर्क यासारख्या प्रयत्नांमुळे ही संख्या वाढेल यात शंका नाही. सध्या पुणे महानगरपालिका विसर्जन तलावांमधून संकलित केलेली साहित्य शहराबाहेरील बंद पडलेल्या खाणींमध्ये पाठवून तिचे व्यवस्थापन करते आहे. जर या साहित्याचा पुनर्वापर करण्याचा समावेश या चक्रामध्ये केला तर सरकारची कोट्यवधींची बचत होऊ शकते.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळासाठी, प्रथम विषारी रासायनिक पदार्थांचा वापर पूर्णपणे बंद करणे आणि दुसरे म्हणजे नव्याने तयार करता न येणारे घटक नवीन घटकांमध्ये बदलणे हे प्राधान्य आहे. त्यांना संपूर्ण विसर्जन व्यवस्थापन प्रक्रियेची पुनर्रचना करण्याची आणि भाविकांना विसर्जनाची नवीन पद्धती स्वीकारण्यासाठी प्रेरित करण्याची आवश्यकता आहे. भाविकांच्या श्रद्धेला तडा न जाऊ देता हे काम पूर्ण व्हावे यासाठी धार्मिक संघटना आणि नेते यांच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे.
पर्यायी दृष्टिकोन
तात्पुरत्या मूर्तीकडून कायमस्वरूपी मूर्तीला प्राधान्य देणे हा अखेरचा आणि आदर्श बदल आहे. यामुळे विसर्जनाद्वारे कोणताही परिणाम होणार नाही याची खात्री मिळू शकेल. हिंदू समुदायाने स्वतःच अनेक संभाव्य पर्याय शोधून काढले आहेत ज्यांना शास्त्रानुसार आधीच मान्यता आहे.
पूजेदरम्यान मुख्य मूर्तीजवळ ठेवलेल्या सुपारीचा वापर. ज्यामध्ये फक्त सुपारी विसर्जित केली जाते आणि मूर्ती पुन्हा कायमस्वरूपी वापरासाठी परत घेतली जाते.
विसर्जनाचे प्रतीक म्हणून पाणी शिंपडल्याने प्रत्यक्ष विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते.
मूर्ती ज्या मातीपासून तयार केली जाते त्या मातीचा वापर करून बियाणे लावणे.
गणेश मूर्ती सर्जनशील स्वातंत्र्याला प्रोत्साहन देते आणि दरवर्षी अशा अनेक कल्पनांतून साकारलेल्या गणेशमूर्ती दिसून येतात. काही कलाकार केळी आणि चॉकलेट सारख्या अन्नपदार्थांचा वापर करून मूर्ती बनवतात आणि उत्सव संपल्यानंतर गरजूंना त्याचे वाटप करतात.
या वर्षी, कारागीर स्वतः मातीचे मिश्रण शोधत आहेत ज्यात पीओपीचा समावेश असला तरीही ती पूर्णपणे जैवविघटनशील असेल. अशा नवकल्पनांना सरकारने निधी उपलब्ध करून द्यायला हवा आणि त्यासाठी प्रोत्साहनही दिले पाहिजे जेणेकरून मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय परिणाम असलेल्या समस्यांसाठी स्थानिक घरगुती उपायांच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळेल.
मातीचा पुनर्वापर करणे हा अनेक पर्यायांपैकी एक पर्याय आहे परंतु त्याहूनही चांगली गोष्ट म्हणजे मातीची पूर्णपणे विल्हेवाट लावण्याची गरज दूर करणे. दरम्यान, माती वितरित केल्यामुळे कारागिरांना या उत्सवासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर थांबवण्यास प्रोत्साहित केले जाऊ शकते.
लेखकाशी संपर्क साधा.
Read more by the same author