मूळ लेख (The Retyrement Plan: Using Waste Materials for Crafting Furniture) विकल्प संगम साठीच लिहिलेला आहे.
औद्योगिक आणि वस्तुनिर्मितीच्या क्षेत्रात, आराखडा बनवणे आणि प्रशिक्षण देणे ह्यांच्या बाबतीत पर्यावरणाची शाश्वतता आणि सामाजिक जबाबदारी ह्यांबाबतची जाणीव अगदी अलीकडे निर्माण झालेली आहे. कोणत्याही कलेमागचा प्राथमिक उद्देश ‘आत्मप्रकटीकरण’, किंवा ‘सर्जनशीलता’ हा मानला जात असे. तथापि, नैसर्गिक पर्यावरणात – किंबहुना सर्वत्रच – जी अवनती घडताना दिसून येत आहे, तिने वस्तुनिर्मात्यांना संसाधने आणि वस्तू ह्यांकडे, त्यांच्या लोकजीवनांवर आणि पर्यावरणावर होणाऱ्या दीर्घकालीन आघाताच्या दृष्टीकोणातून बघण्यासाठी बाध्य केले आहे.
अनू टंडन वियेरं ह्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन’च्या पदवीधर आहेत. फर्निचरची निर्मिती करताना त्यांनी पर्यावरणाची शाश्वतता आणि सामाजिक जबाबदारी ही तत्त्वे शिरोधार्य मानली आहेत. भारतातील कचऱ्याच्या गंभीर परिस्थितीवरचा उपाय म्हणून त्यांनी The Retyrement Plan (बाद टायरांच्या पुनर्वापराची योजना) तयार केली आहे. आपल्या कामात त्या गाड्यांचे जुने टायर; तसेच कापडाच्या चिंध्या, ॲल्युमिनियमचे कागद आणि टाकऊ प्लॅस्टिक ह्यांपासून बनवलेले दोर वापरतात.
आपण ह्या विचाराकडे कसे वळलो ह्याविषयी सांगताना अनू म्हणतात: “औद्योगिक कचरा, वाहनांमुळे निर्माण होणारा कचरा, किंवा आवेष्टनांचा कचरा ह्यांच्याकडे आम्ही ‘कचरा’ म्हणून बघतच नाही. तो ‘समस्या’ नसून ‘संसाधन’ आहे; किंबहुना तेच त्यांचे बलस्थान आहे. एखादे टायर खूप झिजल्यानंतर गाडीसाठी वापरण्याजोगे राहत नाही. तथापि, त्या अवस्थेतहि त्याच्यात खूप ताकद असते, आणि ते फर्निचरच्या चौकटीचा मुख्य आधार सहज होऊ शकते. नव्या भागापेक्षा त्याची किंमतही खूप कमी असते. जे जुने टायर नुसतेच फेकून दिले, तर विघटित होण्यास हजारों वर्षे लागतील – ते विघटित होते असे मानल्यास, – ते एखादी दणकट, टिकाऊ आणि न मोडू शकणारी वस्तू म्हणून पुनरुज्जीवित होऊ शकते. वेष्टनासाठी वापरलेल्या पातळ प्लॅस्टिकच्या कागदाचे दोर वळल्यास, त्यांची ताकद पोलादी दोरांइतकी असते. जुन्या टायरांवर त्यांचे विणकाम केल्यास सार्वजनिक ठिकाणच्या, लोकांना बसण्यासाठीच्या आरामशीर बैठका तयार होऊ शकतात.”

नव्या साधनसामग्रीऐवजी अशा जुन्यापान्या, टाकऊ साहित्याचा वापर करणे, ह्याला अशा साहित्याचे संकलन आणि स्वच्छता ह्यांचेही एक परिमाण आहे. पुनर्वापरातून स्वच्छता तर होतेच; पण, वस्तूचा उत्पादन खर्चही घटतो.
NID मध्ये मिळालेली सौंदर्यदृष्टी आणि उपजत असलेली पर्यावरणाविषयीची तळमळ ह्यांतून अनू शहरांमध्ये कामासाठी स्थलांतरित झालेल्या कारागिरांपर्यंत पोहोचल्या. शहरांमध्ये कामे तंत्रज्ञानाधारित असतात; नि परिणामत: अशा कारागिरांना हस्तकौशल्याची कामेच न मिळाल्याने त्यांना अकुशल कामगार म्हणूनच एखादे श्रमाचे काम पत्करावे लागते. अन अशा कामगारंना आपल्याकडे घेऊन येतात आणि मुळात असलेल्या हस्त कौशल्याचा उपयोग करुन नव्या साहित्याच्या आधारे निर्मिती करण्याचे प्रशिक्षण त्यांना देतात.

कचरा व्यवस्थापनाची कलेशी सांगड घालण्याच्या आवश्यकतेविषयी बोलताना त्या म्हणतात: “भारताला, कमी-अधिक गुणवत्तेच्या हस्तकौशल्यांची समृद्ध आणि वैविध्यपूर्ण परंपरा आहे. दुसरीकडे, गरिबांकडे, टाकाऊतून काहीतरी टिकाऊ बनवण्याची हुशारी – कदाचित गरजेपोटी – असते. ह्या दोन्हींची सांगड घातल्यास, कारागिरांमधील वाढती बेकारी आणि सातत्याने वाढणारी औद्योगिक कचऱ्याची समस्या ह्या दोन्हींवर समाधानकारक उत्तर मिळू शकते; तशा प्रकारची एक नवी रचना अस्तित्वात येऊ शकते.”
तयार होणाऱ्या कचऱ्याचे औद्योगिक पद्धतीने मोठ्या प्रमाणावर पुनर्घटन होऊ शकते; पण, बेकारीच्या समस्येवरचा तोडगा म्हणून त्या कचऱ्याचा वापर हस्तकौशल्य वापरुन करणे, हे अनू ह्यांना आवश्यक वाटते. अशा कारागिरीचे प्रमाण वाढवून त्याचा लाभ मोठ्या जनसंख्येपर्यंत पोहोचविता येऊ शकेल, असे त्याचे मत आहे. त्या असे दाखवून देतात की, वस्तूंच्या उत्पादनासाठी विविध स्तरांवरची कौशल्ये आवश्यक असतात; आणि केंद्रीकृत यांत्रिक प्रक्रिया व विकेंद्रित श्रमाधारित प्रक्रिया ह्यांत समतोल साधल्यास उत्पादनाचे मान किती तरी पटीने वाढू शकते.


अनू तयार करीत असलेल्या फर्निचरचे वैविध्य मोठे आहे: सोफा सेट, झोपाळे, स्टुले, बैठका, इत्यादि. ह्या साऱ्या वस्तू झगमगाटी रंगांच्या तर असतातच; पण, तितक्याच दणकटही. त्यांनी अजुन दुकान थाटलेले नसले तरी त्यांच्याकडे सातत्याने नव्या मागण्या नोंदवल्या जात आहेत. त्यांच्या कामाची ही पावतीच म्हणावी लागेल.

अनूंना असे वाटते की, वस्तुरचनेचे शिक्षण अधिकाधिक धंदेवाईक पद्धतीचे बनत आहे; आणि ते कलेपासून दूर जात आहे, ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी अहे; कारण त्यामुळे भारतातली हस्तकालांची समृद्ध परंपरा मृत्युपंथास लागत आहे. दुसरीकडे, शहरांतली कचऱ्याची समस्याही हाताबाहेर जात आहे. अशा वेळी वस्तुरचनाकारांनी आपले समस्यानिराकरणाचे कौशल्य हे ह्या दोन्ही समस्यांवर एकाच वेळी उपाय शोधण्यासाठी वापरण्याची एक मोठी संधी उपलब्ध आहे. हे उपाय रचनात्मक, डोकेबाज, समुचित आणि सौंदर्यपूर्णही असायला हवेत.
आपण अनूंशी ह्या इ-पत्त्यावर संपर्क साधू शकता. त्यांना आपण फेसबुकवरही भेटू शकता.
हा लेख ‘पुनर्घटनातील सुंदरता’ ह्या हरित संकल्पनाधारित अभियानाचा एक भाग आहे. हे अभियान eCoexist आणि Studio Alternatives ह्यांनी आयोजिले असून महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने ते पुरस्कृत केले आहे. पुनर्घटनाच्या आर्थिक आणि सौंदर्यात्मक क्षमतांविषयी जागृती निर्माण करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.