कोकणातील डुगवे : खवले मांजरांना देवाचे स्थान देऊन संवर्धन करणारे जगातील पहिले गाव (in Marathi)

PostedonMar. 18, 2020in Environment and Ecology

खवले मांजर अर्थात पँगोलिन हा प्राणी दिवसाला सुमारे वीस हजार कीटक खात असल्याने शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो; मात्र त्याच्या खवल्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, तसेच चिनी औषधांसाठी प्रचंड मागणी असल्याने या प्राण्यांची शिकार आणि तस्करी होते. कोकणातील चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग मित्र ही संस्था गेल्या चार वर्षांपासून खवले मांजराच्या संवर्धनासाठी जागृती आणि अन्य प्रयत्न करत आहे. त्यांच्या प्रयत्नांना ग्रामस्थांची, पोलिसांची आणि वन विभागाची चांगली साथ आहे. १५ फेब्रुवारी हा जागतिक खवले मांजर दिन. या निमित्ताने, आज डुगवे (चिपळूण, जि. रत्नागिरी) येथील ग्रामस्थ खवलोत्सव साजरा करत आहेत. ग्रामदेवता वाघजाईच्या मंदिरात खवले मांजराच्या प्रतिकृतीचे पूजन करून, तिला पालखीत घालून ती पालखी सहाणेवर नाचवण्यात आली. नंतर ती पालखी गावातील घरोघरी गेली आणि तिचे पूजन करण्यात आले. अशा प्रकारे खवले मांजरांचे पूजन करून त्यांचे संवर्धन करणारे डुगवे हे जगातील पहिले गाव ठरले आहे. खवले मांजरांसंदर्भातील एक डॉक्युमेंटरीही सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने तयार केली आहे.

‘खवले मांजरे वाळवी आणि कीटक खाऊन माणसाची सेवा करतात. त्यामुळे ती आम्हाला देवासमान आहेत. आम्ही त्यांना वंदन करतो. आमची ग्रामदेवता वाघजाईचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत. आमचे देव निसर्गामध्येच आहेत. त्यांचे आमच्या गावात वास्तव्य आहे. आम्ही त्यांच्या रक्षणासाठी एकत्र आलो आहोत. आम्ही आमच्या गावात त्याचे संरक्षण, संवर्धन करत आहोतच. परंतु, जगभर त्याचे संरक्षण व्हावे म्हणून प्रार्थना करतो आहोत,’ अशी भावना डुगवे गावाच्या ग्रामस्थांनी व्यक्त केली.

खवले मांजराच्या आठ जाती जगभरात आढळतात. त्यापैकी चार जाती आफ्रिकेत, तर चार आशियात आढळतात. चायनीज पँगोलीन आणि इंडियान पँगोलीन (भारतीय खवले मांजर) या दोन जाती भारतात आढळतात. ईशान्य भारत आणि हिमालय वगळता संपूर्ण भारतीय उपखंडात भारतीय खवले मांजर आढळते.

खवले मांजरांचे खवले अतिशय मजबूत असतात. शिवाय काही धोका वाटतो, तेव्हा ही मांजरे स्वतःचे शरीर एखाद्या चेंडूसारखे रूपांतरित करतात. त्यामुळे त्यांचे नैसर्गिक शत्रू कमी आहेत; पण मानवी हस्तक्षेपामुळे त्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. आययूसीएन अर्थात इंटरनॅशनल युनियन ऑफ काँझर्व्हेशन ऑफ नेचर या संस्थेच्या अहवालानुसार हा प्राणी नामशेष होण्याचा धोका असल्याच्या यादीत आहे. त्यामुळे वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्याला वाघाइतकेच संरक्षण आहे. त्यामुळे ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ने विविध समाजघटकांच्या मदतीने हा संरक्षण-संवर्धनाचा उपक्रम राबविला आहे, असे संस्थेचे संस्थापक भाऊ काटदरे यांनी सांगितले.

मूळ प्रकाशक Bytes of India

Read the same (in English)

Story Tags: , , , , , , , , ,

Leave a Reply

Loading...