मी, लोकनृत्य आणि वृक्षदिंडी (in Marathi)

By जाई देवळालकरonOct. 25, 2017in Perspectives

विकल्प संगम साठी विशेष लेख 

मी लहान असताना ताई कथक शिकायला जात असे. मी ही वर्ष दोन वर्षं  तिच्यासारखे कथक शिकायला गेले. मूळ ओढा गाणं शिकण्याकडे असल्यामुळे ते सोडून गाण्याचा मार्ग धरला. कुठे तरी शास्त्रीय नृत्यातली शिस्त शिकताना तेच श्रेष्ठ आणि इतर सगळं म्हणजे धांगडधिंगा असेच वाटायला लागले. आपल्या हालचाली या धांगडधिंगा नाचानी प्रदूषित  होऊ नयेत म्हणून  या नृत्यांगना स्वतःला जपत.

युनिव्हर्सिटीच्या लीडरशिप  कँपमधे आमच्या काॅलेजची प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले. उत्स्फूर्तपणे संध्याकाळी सर्व मुली फेर धरून नाचायला लागल्या. मलाही सामील होण्याचा आग्रह झाला परंतु काय करणार, स्वतः आखलेली लक्ष्मण रेषा ओलांडता आली नाही. पुढे व्हॅली स्कूलला आले. तिथले एकूणच मोकळे वातावरण भावले. चित्रकला शिक्षणाबरोबरच संगीत, नृृत्य, नाट्य आणि सगळ्याच विषयांवर सखोल चर्चा होत. त्यातच आमचे लाडके सतीश अंकल (आमच्या शाळेचे डायरेक्टर) नेहमीच सांगत, “लोककला या सर्व समावेशक आहेत. लोकनृत्यात, गाण्यात सहजपणे दुजाभाव विसरून एकत्र येतात. विषेशतः आदिवासी समाजात. त्यामुळे या लोककला मुलांपर्यंत पोचल्या पाहिजेत.” ह्यातला ‘coming together’ हा भाव फारच आवडला.

दर वर्षी 17 जुलैला आमच्या शाळेचा वाढदिवस सुरेख वृक्षदिंडी काढून साजरा केला जातो. मुलांनी कोवळ्या नारळाच्या झावळ्यांपासून बनवलेली नक्षीदार तोरणे हेच डेकोरेशन. ही तोरणे आदल्या दिवशी हणमंतअप्पांकडे बनवायला शिकणे हा एक सोहळा आणि मोठ्या मुलांनी नैसर्गिक साधनांपासून पंधरा तीनवार राबून बनवलेली सुबक पालखी हा दुसरा सोहळ्यापू पुर्वीचा सोहळा. शाळा सोडून जाणार्‍या दहावी बारावीच्या मुलांचाच पालखी वाहून नेण्याचा आणि वृृक्षारोपणाचा मान. तेच या समारंभाचे मानकरी. ही मुले वृक्षारोपणानंतर या चिमुकल्या रोपांभोवती फेर धरून सुरेख नाच करतात. शिक्षकही या आनंदात सहभागी होताना एखादा नाच, एखादे गाणे गातात. पालखीबरोबर चालताना वेगवेगळ्या भाषांतली  गाणी (मुख्यतः लोकगीते, जी सर्व शाळा रोज असेंब्लीमधे गाते) गायली जातात. कधी कधी पूर्ण शाळाच या मिरवणुकीत नाचत सामील होते .

इथे नाच करणे म्हणजे खरोखरच दरवर्षी पावसाळ्यात येणार्‍या नव्या पाहुण्याचे (छोट्या झाडूल्याचे) स्वागत. या नाचाच्या, गाण्याच्या तयारीसाठी महिनाभर गडबडीतूनही शिक्षक वेळ काढतात. हेवेदावे, वय सगळं विसरून नाच शिकतात. इथे नृत्य करता येण्याची आवश्यकता  नसून ‘नृत्य करावेसे वाटणे’ हे महत्त्वाचे  मानले जाते.

सुरूवातीला बिचकत मी ही यात सहभागी होऊ लागले. शाळेतल्या पासष्ठ वर्षांच्या जेष्ठ शिक्षिकाही गुढगेदुखी विसरत पंचविशीतल्या माझ्याबरोबर तेवढ्याच उत्साहानी नाचायला लागल्या तेव्हा माझ्या मनातल्या नृृत्याच्या संकल्पनाच बदलल्या. दरवर्षीच्या या नृत्यशिक्षणाची मी वाटच पाहू लागले. “या स्टेप्स् लक्षात ठेवणे हे फाॅर्म्यूला पाठ करण्यापेक्षा जास्त challenging आहे,” इती रसायनशास्त्र शिक्षिका! नृत्य शिकणे खरोखर त्रिमितीय आहे हे लक्षात आले. आमच्यापैकी IIM वा तत्सम मोठ्या संस्थांमधे उच्चशिक्षण घेतलेल्या अनेक शिक्षकांना अचानकपणे ‘लर्निंग डिफिकल्टी’चा अर्थ समजायला लागला. उजवा, डावा अशा साध्या गोष्टीही समजायला भल्याभल्यांची तारांबळ उडते हे लक्षात आल्यावर बिचार्‍या मुलांना सर्व विषय ठासून भरून त्यात तरबेज करण्याच्या अट्टहासाविषयी नव्याने विचार करावासा वाटायला लागले. मुलांविषयी सह-अनुभूती वाटायला लागली. हो, आमच्या शाळेत कुठल्याही सांस्कृृतिक कार्यक्रमात निवड प्रक्रिया नाही. सर्वांना संधी दिली जाते. काही मोठी मुले स्वतःच शिक्षकांच्या मदतीशिवाय स्वतःच्या वर्गाचा नाच बसवत. खरं तर मुलांविषयी मनात आदरच निर्माण व्हायला लागला.

या वर्षी तर निराळाच अनुभव होता. कलाक्षेत्रमधे भरतनाट्यमचे शिक्षण घेतलेला, ऋषी व्हॅली शाळेत शिकलेला, जगभर फिरून विविध लोकनृृत्यांचा अभ्यास केलेला महेश महिनाभर आमच्या शाळेत वर्कशाॅप घ्यायला आला. या सर्व नियोजनाची जबाबदारी माझ्यावर. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ मला यासाठी देता येणार म्हणून  मी खुश. 

महेशनी महिनाभरात मुलांचे 9 आणि शिक्षकांचा 1 असे 10 folk dance शिकवले. हे दहा नृत्य प्रकार म्हणजे देशाच्या संस्कृृतीची सफरच. त्यातले कपडे, वेगवेगळ्या पोताचा आवाज, वाद्ये, ऋतू, भाषा असे दर्शनच आम्हाला घडवले.

या पलिकडे एक दिवस संध्याकाळी कँपसमधल्या लोकांना पाश्चिमात्य लोकनृत्य करून पहाण्याची संधी मिळाली. 

या प्रत्येक नाचामागे काहीतरी गोष्ट आहे. ही गोष्ट उलगडत महेश नाच शिकवे. भारतीय काय किंवा पाश्चिमात्य काय, काही लोकनृत्ये ही काम करताना केली जातात. जसे इज्राएलमधे कोल्ह्यांना शेतातून हकलायचे व शेतावर पहारा ठेवायचे काम नृत्य करता करताच केले जाते. म्हणजे पहारा करणार्‍याला कुठला ताण नको. वाईन बनवतानाचा नाच तर प्रसिद्धच आहे. आपल्याकडेही सौराष्ट्रात लग्नाघरांत, पायानी दाबून अंगण ठोकून देणार्‍यांचा नाच असतो, असे एक मैत्रीण सांगत होती. ह्यावरून जात्यावरच्या ओव्यांचीच आठवण आली!

दुसरा प्रकार म्हणजे दिवसभराची कामे आटपून थकलेल्या मनाला आणि शरीराला विसावा देण्यासाठी एकत्र येऊन केले जाणारे नृृत्य. थकल्यावर पुन्हा नृत्य? खरोखरच आम्हालाही मनाला आणि शरीराला उभारी देणारा अनुभव महेश कडून शिकताना आलाच. महेश म्हणतो, “जितकी ताकद वापराल तितकीच भरून येत राहिल.” कुठल्याही जिम मधे जाऊन निघणार नाही एवढा घाम आम्ही गाळला आणि शरीरात किती निरनिराळे स्नायू काम करत असतात हे आम्हाला ‘जाणवले.’ अनेकांना सुरूवातीला असलेल्या अर्धशिशी, चक्कर, बी. पी., गुडघेदुखी, पाठदुखी इ. कुरबूरी शेवटच्या दिवसापर्यंत विसरायलाच झाल्या. हे सर्व सहज नाचता नाचता!!

रेखाचित्र – जाई देवळालकर
रेखाचित्र – जाई देवळालकर

‘शास्त्रीय संगीतात कला हे आत्मशोधाचे माध्यम मानले जाते, स्वतःशी तादात्म्य पावणारे, स्वत्व विसरून जायला लावणारे. ही गोष्ट सामुहिक लोकनृत्यात कुठून येणार? मग केवळ मनोरंजन हाच त्याचा  उद्देश का?’ या माझ्या प्रश्नाला महेशनी छान उत्तर दिले. “प्रत्येक लोकनृत्याच्या शेवटी बहुतेक संस्कृतींत वाकणे, नमस्कार इ. एकमेकांप्रती आदर व्यक्त केला जातो. नृत्य करताना माझा प्रकाश (ऊर्जा म्हणू  हवे तर) मी देते (देतो) व समोरच्याचा प्रकाश घेते (घेतो) अशी भावना असते. दिव्याने दिवा प्रज्वलित करण्यासारखे. आपण सर्व एकाच उर्जेचा भाग आहोत ही  जाणीव बहुतेक आदिम संस्कृृतींत असलेली दिसते.”

एका हौशी, सोप्या वाटणार्‍या लोकनृत्यातून जगण्याचं तत्वज्ञानच उभं राहिलं!

“आम्हाला जरा अवघड, सर्वांहून जास्त स्टेप्स द्या” असा लकडा लावणार्‍या बारावीच्या विद्यार्थ्यांची ऊर्जा महेशनी ज्यांच्यासाठी त्या स्टेप्स अवघड आहेत त्यांना मदत करण्याकडे वळवली. आहेत त्याच हालचालींमधे अजून डौल कसा आणता येईल याकडे पाहण्याचा दृष्टीकोन दिला. या गटाचा नाच होता ‘करम’. कर्मा या मध्यप्रदेश, छत्तीसगढमधल्या जमातीत केले जाणारे नृृत्य. मुलांना नृृत्याची कथा समजावली.  “आपण नेहमीच निसर्गाकडून, झाडाकडून ‘घेत’ असतो तेव्हा या झाडाला आपण परत काय ‘देणार?’ या झाडाभोवती फेर धरून नाचायचे आणि चांगल्या पावसासाठी प्रार्थना करायची, झाड मोठे होऊन बहरावे म्हणून  सद्भावनांचा वर्षाव या रोपावर करायचा अशी पद्धत आहे. हाच नाच आपल्या वृक्षारोपणाच्या समारंभाचा मुख्य नाच.”

हे ऐकताना अंगावर शहारेच आले. लोकनृत्यात माणसातल्या ऊर्जेचा आदर तर आहेच त्या पलिकडे जाऊन माणूस हा निसर्गाचा स्वामी नाही तर तो त्याचे  देणेही लागतो अशी नम्र भावनाही आहे.

ही कथा ऐकून तर मुलांचा नूरच बदलला.

आपण शहरी माणसे या सहज, नैसर्गिक भावनांपासून, एकत्र येण्यापासून किती दूर चाललो आहोत, नाही?

मला खात्री आहे या वर्षी ‘व्हॅली जमातीच्या’ नृत्यानी नवी रोपटीच नाही तर आजुबाजूचा झाडझाडोराही जोमाने वाढेल….. आणि कदाचित अनेक कोवळ्या मनांना सृजनाची पालवी फुटेल!!

लेखिकेशी संपर्क 

Story Tags: , , , , , , , ,

Leave a Reply to सरिता आवाड Cancel reply

Loading...
Vipul Shaha November 9, 2017 at 2:51 pm

Great to read this one Jaai, especially since I was part of the dances too!–and can relate with how dance movement was a stretch-zone for me!

Rajan Indulkar November 6, 2017 at 1:36 pm

पारंपारिक, आदिवासी नृत्याविषयी आपल्या लेखात छान माहिती मिळाली. धन्यवाद ! आमच्या ‘प्रयोगभूमी’ त संगीत, नृत्य हे नित्याचे आहे. पण आमच्या परीने चालते. कातकरी आदिवासींचा बांदगी नाच, कुणबी समाजाचे जाखडी, धनगरांचा गजा इ. चालतात शिवाय इतरत्रचे नाचही शिकतोय. एकदा जरूर भेट द्या. आम्हालाही नृत्यातील शास्त्र समजून घ्यायचेय… राजन इंदुलकर चिपळूण

सरिता आवाड November 4, 2017 at 12:40 pm

मला हे फारच आवडले. आपल्या लग्नांमध्ये नाच फारच कमी असतात. घोलक्याघोल्क्यात इथे तिथे बसून निरर्थक बोलत बसण्याचा अगदी कंटाळा येतो. नाच आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग झाला तर किती बर होईल…मुलांना नाचायला शिकवणारी शाळा कुठे आहे ? मला पाहायला आवडेल…….सरिता

%d