देशातील पहिला धरा चित्र उत्सव (in Marathi)

By श्वेता भट्टड (अनुवादित)onDec. 08, 2016in Food and Water

मित्रांनो,

ग्राम आर्ट प्रकल्प हा समविचारी लोकांचा गट मध्य प्रदेशातील पारडसिंगा गावात तेथील रहिवासी व शेतकरी यांच्याबरोबर तीन वर्षांपासून कलेचे वेगवेगळे उपक्रम राबवीत आहे.

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटाला ग्राम धरा चित्र उत्सवाच्या दरम्यान आम्ही बीज महोत्सव भरावीत आहोत. या लँड आर्ट साठी आम्ही समाज सेवक, कलाकार आणि स्थानीय शेतकरी यांना एकत्र आणून सद्ध्याच्या स्थितीत शेतीविषयीच्या  प्रश्नांवर ७ शेतांमध्ये ७ वेगवेगळी चित्रे साकारण्यात आली आहेत. ती पाहायला येणाऱ्या पाहुण्यांमुळे गावाची भरभराट होईल.

शेतांत चित्रे जोपासणाऱ्या विद्यार्थ्यान्ची व स्त्रियांची नावे :
परविंदर सिंग, मालती कापसे, राधा लोही, पूजा लोही, आदर्श ढोके, नवकेश टाकेडे, पार्थ सूर्यवंशी, कुणाल हुमणे व संदेश कानडे.

या प्रकल्पात सहभागी झालेल्या सुनंदा जोशी यांच्या डायरीतील काही मजकूर येथे पाहावा.


सुनंदा जोशींच्या डायरीतून (श्वेता भट्टडच्या ईमेल मधून, साभार)

उत्सव.. ग्राम धरेचा..गावातील भूमिचा.. शेतकऱ्याच्या काळ्या आईचा चित्रोत्सव! अतिशय आगळी वेगळी,काव्यात्मक कल्पना!

4 नोव्हेंबर 2016.. श्वेताचे नागपूरचे घर.. मुंबईची कल्याणी, कोलकत्याची प्रियांका, आगरतळा-त्रिपूराची गोपा, ओडीशाचा बिभू, पंजाबची मनजोत.. हे पाच तरुण चित्रकार, शिल्पकार, भारताच्या पाच प्रांतातून आलेले पाच कलाप्रवाह मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील व नागपूर – महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेल्या पारडसिंगा नावाच्या छोट्याश्या गावात, तिथल्या भूमिवर – धरेवर आपल्या चित्रांच्या सोहळ्यासाठी – ग्राम धरा चित्र उत्सवासाठी जमा झाले.

ललित विकमशी ( प्रथितयश चित्रकार व शिल्पकार ) आणि श्वेता भट्टड (चित्रकार, शिल्पकार व “ग्राम”ची संस्थापक) ह्या दोन तरुण कलाकारांच्या मनातील संवेदनशीलतेचे प्रकटीकरण म्हणजेच “ ग्राम धरा चित्र उत्सव”! आपल्या कलेला केवळ पैसे कमावण्याचे साधन न समजता कलेकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघून तिला चार भिंतीत बंदिस्त न करता सामान्य माणसाशी विशेषतः ग्राम जीवनाशी जोडून समाजाभिमुख केले. गावातील लोकांच्या, शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत चांगल्या, वाईट गोष्टी कलेतून उजागर करुन इतरांपर्यंत त्या पोहोचवणे हे महत्वाचे काम “ ग्राम ” करत आहे. त्यासाठी देशातील व विदेशातील कलाकारांना, वेगळ्या वाटेने जाणऱ्या शोधकांना ( explorers), पारडसिंगा ( श्वेताचे पैत्रिक गाव) येथे आमंत्रित करुन त्यांच्या Art residencies – निवासी कला प्रकल्प राबविले जातात. ह्याच उपक्रमातील “ ग्राम धरा चित्र उत्सव” ह्या प्रोजेक्ट साठी हे पाच तरुण चित्रकार पारडसिंग्याला आले आहेत.

नेदरलँड या देशाची मथिल्डा नावाची तरुणी जी सायकॉलॉजिस्ट आहे ती पारडसिंग्याला काही दिवसांपासून अभ्यासासाठी आली आहे. आलेल्या चित्रकारांकडून स्फूर्ती घेऊन ती सुद्धा ह्या ग्राम धरा चित्र उत्सवात सहभागी झाली आहे.

तसेच पारडसिंगा गावातील एक उत्साही तरुण शेतकरी – गणेश ढोके – जो गेल्या तीन वर्षांपासून “ ग्राम” शी जोडला गेला आहे, तो सुद्धा त्याच्या शेतात एक धरा चित्र ( Land art) करणार आहे. मे 2016मध्ये “ग्राम” ने Land art केले होते व त्यात त्यांनी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींचा चेहरा बनवला होता व त्याखाली ‘Grow in India ‘ असे लक्षवेधक वाक्य लिहीलेली प्रतिमा (image) बनवली होती. ह्या प्रोजेक्ट मध्ये गणेशचा सक्रीय सहभाग होता.

ह्या वेळेसच्या residency चे वैशिष्ट्य म्हणजे ह्या वेळेस ह्या चित्रकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी पाच वेगवेगळ्या क्षेत्रात अत्यंत चांगले काम करणारे, समाज उभारणीसाठी झटणारे असे पाच जाणते जन ही होते. हे पाच तज्ज्ञ पुढीलप्रमाणे –

  1. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरण विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी, त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारे श्री विलास भोंगाडे सर – ह्यांनी त्यांच्या आंदोलनाची माहिती दिली. धरण विस्थापित शेतकऱ्यांच्या, गावकऱ्यांच्या समस्यांची ओळख करून दिली. त्यांच्या creative आंदोलनांबद्दल ऐकताना आपल्या समस्या, प्रश्न किती कल्पकतेने आंदोलनातून मांडून संबंधितांपर्यंत पोहोचवता येतात ह्या बद्दल माहिती मिळाली.
  2. Airport authority of India मध्ये मोठ्या हुद्द्यावर असताना नोकरी सोडून पूर्ण वेळ शेतीसाठी देणारे श्री अमिताभ पावडे सर यांनी कृषि अर्थकारण (agrarian economy ) व शेतकऱ्यांचे हक्क ह्या विषयांवर प्रकाश टाकला. संपूर्ण जगाच्या अन्नधान्यावर मूठभर धनदांडग्यांच्या कंपन्यांचे नियंत्रण राहण्यासाठी,त्यांच्या तिजोरीत आणखीन भर पडण्यासाठी अन्न निर्मात्याला – शेतकऱ्याला कसे जाणूनबुजून कंगाल केले जात आहे हे समजावून सांगितले.
  3. प्राजक्ता उपाध्याय आणि
  4. अतुल उपाध्याय – हे दोघेही त्यांच्या श्रमातून,उद्योगातून मिळणारा पैसा सामाजिक कार्यासाठी वापरणारे संगणक तज्ञ व उद्योजक. सध्याच्या शैक्षणिक संस्थांमधून मुलांची सर्जनशीलता कशी संपवली जाते व अशा शाळांमधून बाहेर पडणाऱ्या मुलामध्ये तो मोठा होईपर्यंत किती संवेदनशीलता, सर्जनशीलता, सूजाणता शिल्लक असेल, या विचार करायला लावणाऱ्या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे शिक्षण म्हणजे ज्ञान मिळवणे ( learning ) हे न राहता मुलांमधील नैसर्गिक उत्सुकता व सर्जनशीलतेला दडपणारे ( curbing of children’s natural curiosity & creativity ) साधन झाले आहे हे सांगितले.
  5. सतत शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार व निसर्गपूरक पद्धतीने जीवन जगणारे वर्ध्याचे श्री वसंत भाऊ फुटाणे यांनी सेंद्रीय शेती व ती पिकवणारा सेंद्रीय शेतकरी ह्यांच्या समस्या काय आहेत हे समजावून सांगितले. तसेच विकासाच्या नावाखाली निसर्गाचा समतोल कसा बिघडत चालला आहे व त्याचे मानवावर व पशू,पक्ष्यांवर किती घातक परिणाम होत आहेत ह्या बद्दल माहिती दिली.

कल्याणी, गोपा, बिभू, मनजोत व प्रियांका हे चित्रकार हटके आहेत. ह्यांनीही आपल्या कलेला केवळ पैसे कमावण्याचे साधन न बनवता निसर्ग, माणूस व प्राणी ह्यांच्यातील समन्वय कलेच्या माध्यमातून साधला आहे. तसेच सामाजिक प्रश्नांनाही त्यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून मांडले आहेत. तसेच त्यांच्या कलेतून ते जमिन व जमिनीवरच्या माणसासोबतचे नाते व्यक्त करतात. म्हणूनच ह्यातील काही जणांनी ह्या ग्राम धरा चित्र उत्सवात सहभागी होता व्हावे म्हणून आपली नोकरी सोडली आहे. काही जण त्यांचे art exhibition सोडून तर काही जण नोकरीतून रजा काढून आलेले आहेत.

सुरुवातीचे तीन दिवस आलेल्या तज्ञांनी ह्या चित्रकर्त्यांना शेती, शेतकरी व एकूणच त्याबद्दलचे समाजकारण, राजकारण व अर्थकारण काय आहे व कसे आहे ते समजावून सांगितले. अशाप्रकारे artistsना चांगलाच बौद्धिक खूराक मिळाला. तज्ज्ञांकडून मिळालेले मौलिक व मूलभूत ज्ञान व त्यांची स्वतःची कल्पनाशक्ती ( imagination ) ह्यातून ह्या कलाकारांनी अतिशय समर्पक अशा प्रतिमा तयार केल्या. ह्या चित्रांचे आलेख ( graph ) सात वेगवेगळ्या शेतांमध्ये टाकून त्यात हिरव्या व लाल भाज्यांच्या बियाणे टाकले जाईल. जेंव्हा त्या बिया अंकूरित होऊन लाल व हिरव्या रंगाच्या भाज्या उगवतील तेव्हा ह्या प्रतिमा – images ठळकपणे दृश्यमान होतील.

पाच चित्रकार, एक नेदरलँडची सायकॉलॉजिस्ट आणि गावातलाच एक प्रयोगशील तरुण शेतकरी ह्यांच्या रोपांच्या स्वरूपात दृश्यमान होणाऱ्या प्रतिमा पुढील विषयांवर आहेत …

  1. गोपा राय – शेतकऱ्यांसाठी त्यांच्या हिताचा राष्ट्रीय आयोग स्थापन करून त्याची अंमलबजावणी करावी.
  2. मनजोत कौर – शेतीला व महिला शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळाली पाहिजे.
  3. बिभूति नाथ – जनुकीय परावर्तित (genetically modified – GM) बियाण्यांच्या वापरामुळे शेतकरी कंगाल होऊन शेवटी आत्महत्येस प्रवृत्त होत आहे
  4. प्रियांका कुमार – देशी बीजापासून पिकवलेले अन्नधान्य हे सकस, चांगले असते. GM बीजापासून पिकवलेले अन्नधान्य हे अपायकारक, हानीकारक असते.
  5. कल्याणी उदय – सेंद्रिय शेती, देशी पद्धतीच्या शेतीमुळे छोटे शेतकरी, मोठे शेतकरी, महिला शेतकरी यांच्यात साहचर्य साधले जाऊन त्यांच्यात एकता व समानता निर्माण होऊन सर्वांचाच विकास होतो.
  6. मथिल्डा – शेतकरी मोठया कष्टाने आपल्या देशाच्या अर्थकारणाचा गाडा ओढत आहे पण त्याची स्वतःची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे.
  7. गणेश ढोके- भारत हा कृषिप्रधान देश आहे व त्याचे स्थान मध्यवर्ती व महत्त्वाचे आहे.

ह्या प्रतिमा प्रत्यक्ष जमिनीवर काढण्यासाठी या चित्रकर्त्यांना प्रत्यक्ष शेतात जाऊन त्यांना वाटून (allot ) दिलेल्या जमिनीवर आलेख ( graph) काढावा लागतो आणि हे काम खूप अंग मेहनतीचे आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत, थंडीत, उन्हात, रात्री लाईट लाऊन सर्वजण शेतात ग्राफ टाकतात. त्यामुळे हे सर्व चित्रकार जमिनीशी, शेतीशी प्रत्यक्ष जोडले जात आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या मेहनतीची कल्पना येत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिमा ह्या खऱ्या अर्थाने ” धरा चित्र” आहेत. जेव्हा ह्या चित्रांमधून बीज पेरले जाईल व ते अंकुरित होईल तेव्हा 15 दिवसांनी हिरव्या व लाल भाज्यांमधून या प्रतिमा दृश्यमान होतील आणि खऱ्या अर्थाने ” ग्राम धरा चित्र उत्सव” साजरा केला जाईल. साधारण डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रतिमांच्या आकारात उगवलेल्या भाज्या तयार होतील व तेव्हापासून साधारण पुढचे 15 दिवस हा उत्सव असेल. ह्यात सहभागी होण्यासाठी गावातील, आसपासच्या परिसरातील, देशातील तसेच विदेशातील रसिकांनाही आमंत्रित केले जाईल. ह्या चित्रमय भाज्यांची जेव्हा काढणी होईल तेव्हा सर्व मिळून त्याचे सेवन करतील व हे सहभोजन म्हणजे जमीन व शेतकऱ्याच्या हिताप्रती अनोख्या पद्धतीने सर्वांनी व्यक्त केलेली बांधीलकी होय. तेव्हा ग्राम आर्ट प्रोजेक्ट राबवत असलेल्या ह्या अनोख्या ” ग्राम धरा चित्र उत्सवा” साठी सर्वजण आमंत्रित आहेत. आपण सर्व जण मिळून या सोहळ्याचे साक्षीदार होऊ या व आपल्या आईच्या – धरेच्या व शेतकऱ्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करु या !!


श्वेता भट्टड यांच्या ई-मेल मधून लेखिकेशी संपर्क करावा

Story Tags:

Leave a Reply

Loading...