मुक्काम पोस्ट लामकानी (in Marathi)

By केतकी घाटे on May 3, 2017 in Environment and Ecology

लामकानी हे छोटंसं  गाव धुळे जिल्ह्यात आहे. उत्तम नेतृत्व, तरुणांची साथ आणि वडिलधा-यांचा पाठिंबा याचं फलित लामकानीत दिसतं आहे. डॉ. नेवाडकर स्वतः यशस्वी व्यावसायिक आहेत. स्वतःच्या  व्यवसायापलीकडे जाऊन त्यांनी गावातल्या तरुणांसोबत पर्यावरण संवर्धनाचा प्रेरक प्रयोग केला. हे पाहून इच्छाशक्तीच्या बळाची दुर्दम्य ताकद लक्षात येते. या प्रयोगातून आपल्यालाही प्रेरणा मिळावी यासाठी...

फोटो धनंजय नेवाडकर 

हो ... लामकानी  हे एका गावाचं नाव आहे. प्रथम ऐकता गमतीदार  वाटावं  असं. परंतु स्थानिक लोकांकडून कळलं की पूर्वीपासूनच कुरणांनी व्यापलेल्या या भागात लांब कानांचे ससे मोठ्या संख्येने होते. म्हणून लामकानी!  धुळे शहरापासून साधारण चाळीसेक किलोमीटरवर असलेलं हे गाव. साधारण ८००० लोकवस्ती असलेलं. अत्यंत कमी पावसाचा प्रदेश २५० ते ३०० मि.मी. वार्षिक सरासरी गाठणारा हा पाऊस. एवढ्याशा  पावसाने नदीदेखील वाहत नाही. असं स्थानिकांचं  म्हणणं  आणि म्हणूनच की काय इथल्या नदीचं नाव आहे 'बुराई'! इथल्या परिसराची, निसर्गाची सद्यस्थिती बघता पूर्वीचा सोनेरी इतिहास समजून घेताना मजाच वाटली. स्वातंत्र्यपूर्व काळात किंबहुना नंतरही ६०-७० पर्यंत इथे चांगलीच सुबत्ता होती. दूध-दुभतं भरपूर होतं. चारा भरपूर होता. कारण जाणून घेतल्यावर लक्षात आलं, पूर्वी महसूल व वनविभाग एकत्र काम करत असत. गवताळ कुरणांवरच्या चराईसाठी काही विशिष्ट योजना राबवल्या जात असत. चक्राकार चराई (रोटेशनल ग्रेझिंग) ही त्यातलीच एका पद्धत. म्हणजे काय तर काही ठरावीक काळच एखादया भागावर चराईला परवानगी असायची. मग तो भाग बंद करायचा. त्याला म्हणायचे 'बंद भाग'. अहिराणीत त्याचा अपभ्रंश झाला बनभाग. पुढे पुढे लोक बनभाग म्हणजे वनविभाग असं म्हणू लागले. परंतु हा खरं तर जुना बंद भाग. कुरण संरक्षित राहिल्याने चांगल्या गवतांची वाणंही त्यात टिकून होती. गुरांची संख्यादेखील मर्यादित होती. शासनही उत्तम होतं. यामुळे गवताळ कुरणांचं व्यवस्थापन उत्तम राखलं जाऊन दूध-दुभतं भरपूर होतं. ७२च्या  दुष्काळानंतर मात्र परिस्थिती बदलली. अनेक बनभाग खुले केले गेले. काही ठिकाणी परिस्थिती आटोक्यात आल्यानंतरदेखील गैरफायदा घेतला गेला आणि वाढत्या चराईमुळे कुरणाचं नुकसान होत गेलं. जी काय थोडी फार जंगलं होती ती कापली गेली. आणि सुबत्ता संपुष्टात येऊ लागली.

गवताळ रानं कमी झाल्याने, निकृष्ट दर्जाची झाल्याने गुरांचा प्रकार बदलला. गाई कमी झाल्या. शेळ्या-मेंढ्या वाढल्या कारण त्याच या निकृष्ट दर्जाच्या चाऱ्यावर वाढू शकतात. त्यांची संख्या खूपच वाढू लागली. पूर्वी जे मेंढपाळ  स्थलांतरित व्हायचे त्यातले काही स्थानिकच झाले. त्यालादेखील अनेक कारणे असावीत. त्यातलंच एक म्हणजे लाचखोरी वाढली होती. मेंढपाळाना एखाद्या भागात गुरं चारण्याकरता 'चराईची पावती फाडावी लागते.' म्हणजेच काही एक मोबदला वनविभागाला द्यावा लागतो. तो गुरांच्या संख्येवर ठरवला जातो. त्यामुळे ही संख्या कमी सांगण्यावर, कमी मांडण्यावर भर दिला जाऊ लागला. प्रत्यक्षात कागदावर दिसणाऱ्या चराईपेक्षा किती तरी पट जास्त चराई प्रत्यक्ष होत राहिली. या सगळ्याचा दुधाच्या धंद्यावर तर परिणाम झालाच,  परंतु तो ज्या निसर्गावर अवलंबून होता तोच उतरंडीस लागला आहे. हे कोणीहि लक्षात घेतले नाही. शेवटी एक काळ असा आला, की गावातल्या लोकांनी गुरं विकायला सुरुवात केली. ऊसतोडणीकरता स्थलांतर सुरु झालं. विहिरी आटल्या. त्यामुळे शेतीवर परिणाम झाला. तरुणदेखील धुळ्याला अथवा अन्य ठिकाणी उपजीविकेसाठी बाहेर पडू लागले. गाव ओकंबोकं व्हायला लागलं. त्यात भर म्हणून ९०च्या दशकात विषम पाणीटंचाई झाली. २००० साल उजाडलं. आणि या गावातल्याच एका तरुणाला ही परिस्थिती पूर्णतः पालटायची प्रबळ इच्छा निर्माण झाली. आणि त्याकरता सर्व ताकदीनिशी तो कामालादेखील लागला. या तरुणाचं नाव डॉ नेवाडकर. खरं तर नेवाडकरांची धुळ्यात उत्तम सेवा चालू होती, आहे. हॉस्पिटल आहे. २००० मध्ये डॉक्टरांचा मोठाच अपघात झाला आणि सहा महिने बेड-रेस्ट घ्यावी लागली. या काळात बिछान्यावर पडून राहता राहता त्यांच्या मनात गावात क्रांतिकारी बदल करायचे विचार घोळू लागले. दुखण्यातून बाहेर पडल्या पडल्या त्यांनी  राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, इ. प्रयोगांचा सखोल अभ्यास केला. स्वतःकडच्या  हॅन्डीकॅमेऱ्यावर या सगळ्यांचे चित्रीकरण केलं आणि लामकानीच्या ग्रामग्रामस्थांना ते टीव्हीवर दाखवलं.  इथून सुरु झाली लामकानीची यशोगाथा.

गावातलाच एक यशस्वी तरुण हे सांगतोय म्हटल्यावर गावकऱ्यांनीही लक्ष द्यायला सुरुवात केली. नेवाडकरांनी वनविभागाशीदेखील चर्चा केली. त्यांच्या मदतीने २००१ साली गावात संयुक्त वनव्यवस्थापन समिती नेमण्यात आली. आणि सुमारे ४०० हेक्टर क्षेत्रावर जल व मृद्संधारणाची कामे राबविण्याचा ठराव पास करण्यात आला. सुरुवातीला गावातल्याच तरुणांनी  श्रमदान करून काही एक भागावर काम सुरु केलं. नंतर मात्र नेवाडकरांनी रोजगार हमी योजना आणण्यासाठी जोरदार खटपट केली. आणि दरवर्षी ५० हेक्टर याप्रमाणे काही वर्षांत ३१० हेक्टरवर समतल चर, बांधबंदिस्ती, ओढयांवरती दगडी बंधारे इत्यादी कामे करण्यात आली. या सर्व कामांचा उद्देश पाणलोटक्षेत्र विकास आणि पर्यायाने गवताळ कुरणांची वाढ असा होता. हे का?  तर पूर्वीची पाणी जिरविण्याची निसर्गाची संस्था नष्ट झाल्याने. जमिनीची प्रत सुधारण्याकरता, तिच्यातला ओलावा वाढवण्याकरता, भूजल पातळी वाढवण्याकरता याप्रकारची काही तंत्रं उपयोगी ठरतात. मग ही तंत्रं नक्की कुठे व कशी राबवायची याकरता 'वॉटर (WOTR)' या संस्थेने इंडो-जर्मन सोसायटीच्या निधीमार्फत मदत केली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथवर आता गावकयांच्या मनातदेखील संवर्धनाची कल्पना चांगलीच रुजली होती. त्यांनीदेखील सुमारे ६५,०००/- रुपये निधी या प्रकल्पाकरती गोळा केला. एखाद्या दुष्काळप्रवण क्षेत्रावरून एवढा निधी गोळा होणे हेदेखील महत्त्वाचं आहे. परंतु केवळ जमिनीवरती काम करुवून भागणारं नव्हतं. चराईबंदी आवश्यक होती, हे नेवाडकरांनी जाणलं आणि दरवेळच्या ग्रामसभेत हा विषय मांडू लागले. सुरुवातीला त्याला विरोधदेखील झाला. परंतु अखेरीस टप्प्या-टप्प्याने चराईचे क्षेत्र कमी करण्याचे ठरले. चराई बंद झाल्याबरोबर एक-दोन वर्षांतच गवताची वाढ उत्तम झाली. चाऱ्याचं  प्रमाण कितीतरी पट वाढलं.  आणि गावकऱ्यांचा विश्वास दुणावला. बरोबरीने जनजागृतीचे कार्यक्रमही चालूच होते. लोकसहभाग वाढवण्यासाठी नेवाडकरांनी कीर्तनाचादेखील आधार घेतला. तज्ज्ञांची व्याख्यानं आयोजित केली. वृक्षदिंडी, बी रोपण, रोपांची लागवड असे काही उपक्रम शाळेतल्या मुलांबरोबरदेखील घेण्यात आले. २००५ सालापर्यंत गावात व झाडोरा खूपच चांगला फोफावला. रोजगार मिळाल्याने गावकरीदेखील खूष होते. जमीन विकायची वेळ आली होती ती टळली.  बरोबरीने विहिरीचं पाणीदेखील वाढायला सुरुवात झाली. काही विहिरींची वर्षभर पाहणी करून नोंदी ठेवण्यात आल्या. २००८ पर्यंत तर लक्षणीय बदल दिसू लागले. पूर्वीची निकृष्ट जातीची 'कुसळी' नावाची गवते जवळ जवळ पूर्णतः नाहीशी झाली. त्यांची जागा उत्कृष्ट जातीच्या 'पवन्या', 'मारवेल', 'डोंगरी'  या गवतांनी घेतली. यालाच आम्ही पर्यावरणीय भाषेत म्हणतो ecological succession, म्हणजेच परिसंस्थेची सुद्दढतेकडे वाटचाल. मातीवरचं आच्छादन वाढल्याने तिचं तापमान नियंत्रित झालं. उन्हाळ्यातही काही एक झाडोरा जमिनीवर राहिल्याने तिची सुपीकता, बीजांकुरण क्षमता टिकून राहण्यास व वाढण्यास मदत झाली. गवताबरोबरच अकेशिया म्हणजेच बाभूळ वर्गातली झाडंही आपसूकच वाढीस लागली. यातली काही सदाहरित आहेत. प्राणी-पक्ष्यांचे आसरे स्वाभाविकच वाढले. कीटकांच्या  संख्येत लक्षणीय वाढ झाली. अन्नसाखळीचा पाया भक्क्म झाला. गरुड जातीतले पक्षी तिथे दिसू लागलेत, याचाच अर्थ परिसंस्थेतील अन्नसाखळी एकसंध झाली आहे! या परिसंस्थेला शास्त्रीय परिभाषेत म्हणतात सव्हाना (savannah). आपण डिस्कव्हरी चॅनेलवर आफ्रिकेतील बघतो तसले. ज्यात वाटांबरोबर इतर झुडपांचं देखील प्रमाण राखलं जातं. अशा रीतीने लामकानी ग्रामस्थांनी गवत पाण्याकरता राखलेल्या या भागावर एक प्रकारे पर्यावरणीय पुनरुज्जीवनच (ecological restoration) केले. 

या प्रयोगातली आकडेवारी पाहिली की त्याचं यश चटकन लक्षात येईल. २००८ साली परिसरातच भीषण दुष्काळ पडला होता. कुसळी गवत देखील उपलब्ध नव्हतं. त्या वर्षी परिसरातील २५ खेड्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळून ४०० टन एवढा उत्कृष्ट प्रतीचा चारा उपलब्ध करून देण्यात आला. याच वर्षी या प्रयोगाला संत तुकाराम जनग्राम पुरस्कार जाहीर झाला. सध्या गावात ७०० गाई, १५० म्हशी एवढी जनावरं आहेत. आणि ५०० हेक्टर संरक्षित प्रदेशातून सुमारे १५०० टन एवढी चाऱ्याची उपलब्धता आहे. गम्मत म्हणजे हा १५०० टन चारा पुरून उरतो. चराईबंदी चालूच आहे. गवत कापून गोठ्यात जनावरांना दिलं जातं. चक्राकार पद्धतीने कापणी सुरु असते. त्यामुळे पूर्वीची निसर्गाची स्थिती येऊ घातली आहे. विहिरी, कूपनलिका उन्हाळ्यातदेखील ओसंडून वाहताना दिसतात. या सगळ्यापुढे तरुण परत गावाकडे परतून शेती करताना दिसू लागले आहेत. ओसाड पडलेलं गाव पुन्हा जागृतावस्थेत आलं आहे. नेवाडकर या प्रकल्पाचं यश एका वाक्यात सांगतात. ते म्हणतात, "१५ वर्षांपूर्वी भावाच्या साखरपुड्याकरता एक खट्टी (१० लिटर) दूधदेखील गावात मिळालं नव्हतं. धुळ्याहून आणावं लागलं. आणि आता मात्र दरदिवशी जवळ जवळ ३००० लिटर दूध धुळ्यात पाठवलं जातं." निसर्गसंवर्धन संरक्षणाच्या या प्रयोगातून गावाची आर्थिक परिस्थितीदेखील बदलली. ही या प्रयोगाच्या यशस्वितेची सर्वात मोठी पावती. 

उत्तम नेतृत्व, तरुणांची साथ, वडीलधाऱ्यांचा पाठिंबा  यातून निर्माण झालेला हा यशस्वी प्रयोग निसर्ग संवर्धनाचं एक उत्तम प्रतिमान आहे. महत्त्वाचं म्हणजे गावातले तरुण इथेच थांबले नाहीत. जिल्ह्यातलं सर्वात मोठं मानलं जाणारं लळींग येथील कुरण पुनरुज्जीवित करायची योजना आखली जात आहे. या वर्षी लामकानीतल्या 'पवन्या'चं बी धरून ते लळींगच्या कुराणात पसरलं देखील... 

प्रथम प्रकाशन - मिळून साऱ्याजणी (जून २०१५)  Story Tags: community-based, comunity conservation, ecological, farming practices, rural economy

Comments

There are no comments yet on this Story.

Add New Comment

Fields marked as * are mandatory.
required (not published)
optional
Explore Stories
marginalised secure livelihoods conservation environmental impact learning womens rights conservation of nature tribal human rights biodiversity energy rural economy governance millets agrobiodiversity sustainable consumerism education environmental issues rural seed diversity activist ecological empowerment Water management sustainability sustainable prosperity biological diversity Nutritional Security technology farmer livelihood community-based forest food livelihoods organic agriculture organic seeds adivasi traditional agricultural techniques eco-friendly values economic security alternative development farmers Food Sovereignty community supported agriculture organic decentralisation forest wildlife farming practices agricultural biodiversity environmental activism organic farming women empowerment farming social issues urban issues food sustainable ecology commons collective power nature seed savers environment community youth women seed saving movement natural resources nutrition equity localisation Traditional Knowledge Agroecology waste food security solar traditional Climate Change Tribals water security food production innovation alternative education well-being water alternative learning agriculture ecology creativity self-sufficiency security health participative alternative designs waste management women peasants forest regeneration culture sustainable eco-tourism tribal education ecological sustainability art solar power alternative approach community conservation
Stories by Location
Google Map
Events