निसर्गव्रती हेमाताई (in Marathi)

By विद्याधर कुलकर्णी/दिनेश गुणेonJun. 13, 2016in Environment and Ecology

ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरापासून तुळशीबागेकडे जाणाऱ्या रस्त्यावर शीतलादेवीचा पार आहे.

गेल्या साठ वर्षांपासून त्यांच्या घरामध्ये विजेचा वापरच केला गेलेला नाही. त्यामुळे घरात साधा दिवा म्हणजे बल्बदेखील नाही. वीजच नाही त्यामुळे दूरचित्रवाणी संच, रेफ्रिजिरेटर, वॉटर हिटर, मायक्रोवेव्ह, मिक्सर यांसारखी आधुनिक उपकरणे आणि त्यांचा वापर ही तर अतिदूरची गोष्ट. निसर्गाशी सन्मुख होऊन पक्षी आणि प्राण्यांसमवेत सहजीवन जगण्याचा आनंद लुटणारे आणि त्यासाठी प्रसंगी जननिंदेलाही सामोरे जाणारे असे पुण्यातील एक अस्सल निसर्गप्रेमी व्यक्तिमत्त्व म्हणजे ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ डॉ. हेमा साने. निसर्ग आणि पर्यावरण याविषयी बोलणारे खूप असतात, लिहिणारेही खूप असतात, पण प्रत्यक्षात कृती करण्याची वेळ आली की अनेक जण मागे हटतात. निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो. आपण मात्र निसर्गालाच ओरबाडत असतो. आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने माणसाची निसर्गावर मात करण्याची चढाओढ सुरू असली तरी निसर्ग आपल्याला हिसका देतोच. त्यामुळे निसर्गाला वश करणे कठीण आहे.. ही आहे हेमाताईंची जीवनधारणा.

पंचाहत्तरी ओलांडलेल्या हेमाताईंचे या वयातही शिक्षण आणि लेखन याच गोष्टींना प्राधान्य आहे. मी अशा पद्धतीने राहते हा माझ्या आनंदाचा भाग आहे. विज्ञानाचा पुरस्कार करीत असले तरी मी माझी जीवनशैली बदलली नाही हा काय माझा दोष आहे का, असा प्रश्न हेमाताई विचारतात. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत दिवसभर सूर्यप्रकाशामुळे भरपूर उजेड मिळतो. मग त्याच वेळेचा उपयोग वाचन आणि लेखनासाठी का करू नये, अशी त्यांची धारणा आहे. पर्यावरण प्रत्यक्ष जगण्याच्या या असिधाराव्रताचा पुरेपूर आनंद हेमाताई साने घेत आहेत.

पुण्यनगरीची ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरापासून तुळशीबागेकडे जाणाऱ्या रस्त्यावर शीतलादेवीचा पार आहे. शहराच्या मध्य भागातील अगदी जुनाट आणि पडका वाटावा असा वाडा (१२१ बुधवार पेठ) हे हेमाताई साने यांचे निवासस्थान. या गजबजलेल्या भागामध्ये त्यांच्या घरी जाताना आपण कोकणातील निसर्गरम्य ठिकाणी जात आहोत, याची प्रचीती मिळावी असा घराकडे जाणारा रस्ता. वाडय़ाबाहेर प्रचंड रहदारी आणि रस्त्यावर अगदी कशीही वेडीवाकडी लावलेली वाहने असा अडथळा पार करूनच त्या वाडय़ामध्ये प्रवेश मिळवावा लागतो. शहरातील अगदी दाट लोकवस्तीच्या या परिसरामध्ये वाडय़ात अगदी नीरव शांतता असते आणि कानी विविध पक्ष्यांचे मंजूळ स्वर पडतात. हे अनुभवले की आपण गजबजलेल्या पुण्यामध्येच आहोत का, असा प्रश्न कोणालाही पडतो. वाडय़ामध्ये पाऊल टाकल्यानंतर एकाच कुटुंबातील चार मांजरे आणि भारद्वाज, साळुंकी, नाचण, दयाळ, वटवटय़ा अशा पक्ष्यांचा कानावर पडणारा सूर साठवत पुढे गेले की वनस्पतीशास्त्र विषयाच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक आणि लेखिका डॉ. हेमा साने यांचे घर आपल्याला दिसते.

मी काही एकटीच अशा पद्धतीने राहत नाही. ही आमच्या घराण्याची परंपरा आहे. आपले पूर्वज असेच राहत होते ना? पूर्वी वीज नव्हती तेव्हा कंदील, मशाल किंवा केरोसिनची चिमणी अशा प्रकाशामध्ये त्यांनी आयुष्य काढलेच ना? मग मीही तीच जीवनपद्धती अनुसरली म्हणून बिघडले कोठे, असा हेमाताईंचा रोकडा सवाल प्रत्येकालाच अंतर्मुख करून जातो. मागच्या पिढय़ांचे कुठे अडले? मग आपल्यालाच सुविधांचा सोस कशाला! इतका साधा आणि सोपा विचार त्या केवळ बोलूनच दाखवत नाहीत, तर प्रत्यक्ष कृतीमधून आचरणातही आणत असल्याचे आपल्याला समोरच दिसत असते. गेली किमान साठ वर्षे या घरामध्ये वीज नाही. आम्हाला त्याची खंत वा खेद नाही. वीज वापरली नाही म्हणून काही अडलेदेखील नाही, असाही अनुभव त्या सांगतात. आता काळाची पावले ओळखून त्यांनी सौर ऊर्जेवर चालणारे दिवे घेतले आहेत. शिधापत्रिकेवर मिळणारे केरोसिन बंद झाल्यामुळे त्यांनी गॅस देखील घेतला आहे. पण या गॅसचा वापर एवढा मर्यादित आहे की एक सिलिंडर त्यांना चार-पाच महिने पुरतो. केरोसिनचा कोटा बंद झाला नसता तर गॅस घेण्याची वेळच आली नसती, असेही त्या सांगतात.

जुन्या वाडय़ाचे बांधकाम काही वर्षांपूर्वी कोसळले आणि या वाडय़ामध्ये असलेले भाडेकरू तेथून दुसरीकडे वास्तव्यास गेले. त्यामुळे आता हेमाताई साने या वाडय़ामध्ये एका खोलीत एकटय़ाच राहतात. पण मी एकटी नाही असे त्या आवर्जून सांगतात. माझी चार मांजरे, दोन कुत्री आणि भल्या पहाटेपासून झाडांवर येणारे वेगवेगळे पक्षी हे माझे सखे-सोबती आणि गणगोत आहेत, अशीच त्यांची भावना आहे. त्यांच्या खोलीला लागूनच वाडय़ामध्ये एक विहीर आहे. घरामध्ये महापालिकेची नळाची तोटी आहे. या नळाचा वापर केवळ पिण्याचे पाणी घेण्यापुरताच केला जातो. बाकी वापरण्याचे पाणी त्या विहिरीतून शेंदून काढतात. अर्थात तेही आवश्यक तेवढेच. पाणी ही संपत्ती आहे आणि या संपत्तीचा विनाकारण नाश करू नये किंवा ही संपत्ती वारेमाप पद्धतीने उधळून देऊ नये, असेही त्या सांगतात. पहाटेला वेगवेगळ्या पक्ष्यांचे होणारे गुंजारव त्यांना झोपेतून जागे करते. घरातील कामे आणि स्नान उरकल्यानंतर सूर्योदयालाच त्यांचा दिवस सुरू होतो. दिवसभर लख्ख सूर्यप्रकाशामध्ये त्यांचे लेखन आणि वाचन ही कामे सुरू असतात. त्यातूनच वेळ काढून स्वयंपाक करायचा आणि भोजन करून घ्यायचे. त्या म्हणतात, ‘मला एकटीला असा किती स्वयंपाक लागतो? पण माझी मांजरे उपाशी राहू नयेत म्हणून मी स्वयंपाक करते. दुधाचे पातेले चमच्याने खरवडायला घेतले की दयाळ पक्षी साय खाण्यासाठी सरसावून पुढे येतो. हा परिपाठ गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. दयाळ पक्ष्याला घडय़ाळ थोडीच ठाऊक, पण साय खाण्यासाठी तो आतुर असतो. माझी मांजरं दूध-भात, पोळीचा तुकडा खातात. तिन्हीसांजेनंतर अंधार पडू लागला की केरोसीनची चिमणी पेटवून त्याच्या उजेडामध्येही माझे लेखन आणि वाचन सुरू असते आणि रात्री साडेअकरानंतर मध्यरात्री मी झोपी जाते. पूर्वी आमच्याकडे एक मुंगूसही होते. माझ्या भावाने शिट्टी वाजविली की ते बिळातून बाहेर यायचे आणि चक्क नाचायला लागायचे. काही काळ मी दोन कावळे आणि पायात मांजा अडकून जखमी झालेली घारही पाळली होती. उपचार करून बरी झाल्यानंतर ती घार उडून गेली.’

एम. एस्सी. आणि पीएच. डी. संपादन केलेल्या हेमा साने या १९६२ मध्ये पुण्यातील एमईएस कॉलेजमध्ये (आताचे गरवारे महाविद्यालय) प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या. अभ्यास, लेखन आणि वाचन या ध्यासापोटी त्या अविवाहित राहिल्या. शरीराला व्यायाम हवा आणि बस किंवा रिक्षा या वाहनांचा वापर करावयाचा नाही म्हणून त्या घरापासून महाविद्यालयामध्येही पायीच जात असत. एकीकडे अध्यापन सुरू असताना त्यांचे अध्ययनही सुरूच होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून इंडॉलॉजी विषयामध्ये त्यांनी बी. ए., एम. ए. आणि एम. फिल या पदव्या संपादन केल्या. सन २००० मध्ये सेवानिवृत्त झाल्यापासून त्यांना लेखन आणि वाचन करण्यासाठी मोकळीक मिळाली. या मोकळ्या वेळेचा फायदा त्यांना अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी झाला. केवळ वनस्पतिशास्त्र आणि पर्यावरण या विषयांवरच नव्हे, तर इतिहास, प्राच्यविद्या अशा विषयांवर मिळून तीसहून अधिक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे आणि नुकतेच त्यांनी ‘सम्राट अशोक’ या विषयावरील पुस्तकाचे लेखन पूर्ण केले.

हेमाताई साने यांच्या पर्यावरणपूरक जीवनशैलीचे समाजातील विविध स्तरांतून कौतुक होत असते तशीच त्यांच्यावर टीकाही होत असते. त्याबाबत त्या बोलायला लागल्या की त्यांचे विचार आपण ऐकतच राहतो. या अशा वेगळ्या जीवनशैलीबद्दल त्या म्हणतात, “निंदकाचे घर असावे शेजारी” असे तुकाराम महाराजांनी म्हणूनच ठेवले आहे ना! त्यामुळे अशा टीकेची मी फारशी दखल घेत नाही, असे त्या सहजपणे सांगून जातात. त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या टीकेला त्यांनी दिलेले उत्तरही फार मार्मिक आहे. त्या म्हणतात, ‘माझ्या घरामध्ये वीज नाही म्हणून किंवा मी विजेचा वापर करीत नाही म्हणून मला मूर्खात काढणे योग्य आहे का? बरं, वीज नाही म्हणून मी मोर्चा नेला नाही. मी संपही केला नाही. मी साधा निषेधसुद्धा कधी नोंदविलेला नाही. अशा राहणीमुळे मी आदिवासी आहे अशीही टीका केली जाते. असू दे मी आदिवासी. तुमचे काही बिघडले नाही ना! मी कधी कोणालाही त्रास द्यायला जात नाही. या उलट वाडय़ातील झाडांमुळे ऑक्सिजन मिळतो म्हणून आजूबाजूच्या लोकांनी माझे आभारच मानले पाहिजेत. तुम्हाला हवे तसे वागले म्हणजे मी चांगली असे कसे म्हणता येईल? आधीपासून जशी राहत होते तशीच मी राहते ही लोकांच्या दृष्टीने चूक आहे का? प्रवाहाबरोबर तर सगळेच पोहत असतात, पण प्रवाहाविरुद्ध पोहायला खूप ताकद खर्च करावी लागते. माझ्या राहणीमानामुळे तुमचे नुकसान तर केले नाही ना मी? मग मला माझ्या आनंदामध्ये राहू द्या की! आनंद कशामध्ये मानायचा याची संकल्पना ही मी माझ्यापुरती निश्चित करून घेतली आहे. प्रत्येकाची आनंदाची मानकं वेगळी असतात. लेखन ही माझी विश्रांतीच आहे. ‘चेंज ऑफ ऑक्युपेशन इज रेस्ट’ म्हणजे कामातील बदल हीच विश्रांती असते. त्यामुळे वाचन करून दमले की लेखन आणि लेखन करून दमले की शास्त्रीय संगीताचे श्रवण हीच माझी विश्रांती असते.’

लोकसत्ता लोकरंग पुरवणीतून


Keeping it simple, by choice, a piece by Ananya Dutta, describes the simple lifestyle chosen by Dr Hema Sane in consideration of ecological impacts of consumerism. She refuses to be a slave to machines, draws water from a well and uses only solar powered lamps – she maintains a home without a connection to the power grid.
Keeping it simple, by choice, a piece by Ananya Dutta, describes the simple lifestyle chosen by Dr Hema Sane in consideration of ecological impacts of consumerism. She refuses to be a slave to machines, draws water from a well and uses only solar powered lamps – she maintains a home without a connection to the power grid.

Story Tags: , , , , , , ,

Leave a Reply

Loading...